छत्रपती शिवरायांचा 'इतिहास' सहावीच्या पुस्तकात

    दिनांक  17-Oct-2019 19:11:30
पुणे
: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास योग्य वयात मुलांपर्यंत पोहोचावा, या हेतूने महाराष्ट्र शिक्षण मंडळाने 'शिवछत्रपती' हा अभ्यासक्रम सहावीच्या वर्षात शिकवला जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सहावीतील विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अधिक प्रेरणादायी, विचारास प्रवृत्त करणारा ठरेल, असे मत महाराष्ट्र शिक्षण मंडळाने व्यक्त केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनाठायी, असल्याचे मत मंडळाने व्यक्त केले आहे.

 

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगळला, असा बिनबुडाचा आरोप करत विरोधकांनी या मुद्द्यावरून रान उठवले होते. मात्र, संपूर्ण विषयाची पडताळणी न करताच टीका केल्याने महाराष्ट्र शिक्षण मंडळाने असा कोणताही प्रकार न झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने सांगितले कि, " यापूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या अभ्यासक्रमात होता. आता यापुढे तो सहावीच्या अभ्यासक्रमात शिकवण्यात येईल. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे विविध पैलू पाहता तो इतिहास योग्य वयात मुलांपर्यंत पोहोचावा असा सर्वोतोपरी प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे इतिहास पुसला जाणार ही निव्वळ चुकीची समजूत आहे.",

 

यंदाच्या वर्षी राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने इयत्ता पहिली ते चौथीची पाठ्यपुस्तके छापली होती. त्यात चौथीऐवजी सहावीच्या पुस्तकांमध्ये शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आला. राज्यातील मुलांना महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतराष्ट्रीय शिक्षण मिळावे याकरिता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात करण्यात आला होता. यानंतर अनेक सत्तांतरे झाली परंतु हा इतिहास अजूनही पाठ्यपुस्तकात तसाच आहे. यावेळेस ही इतिहासात कोणतीही बदल न करता फक्त इयत्ता बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिले आहे. 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगळे पैलू उलगडणार या मथळ्याखाली दिलेले स्पष्टीकरण

 

राज्याच्या आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाने शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्याचा प्रयत्न केला, यासंदर्भात टीका करण्यात आली आहे. परंतु ही टीका पूर्ण अभ्यास न करताच केल्याचे निदर्शनास येते. खरे पाहता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा संकल्पनाधीष्ठीत आहे. पहिली ते चौथी या स्तरावर विविध संकल्पना निश्चित करून त्यांच्याभोवती सर्व विषयांची गुंफण केलेली आहे. त्यामुळे कोणताही विषय चौथीपर्यंत स्वतंत्र नाही. महाराष्ट्र राज्याच्या एस.एस.सी बोर्डाच्या अभ्यासक्रमात विविध विषय स्वतंत्रपणे देण्यात आलेले आहेत.

 

मुळात आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संकल्पनाधारित अभ्यासक्रम तयार करण्यामागे एक वेगळी भूमिका आहे. प्राथमिक स्तरावर मुलांचे संबोध, अवबोध स्पष्ट करण्यावर या मंडळाचा भर आहे. त्यानुसार इतिहासाची पार्श्वभूमी तयार करताना समाज निर्मिती, शासन-प्रशासन, राज्य आणि राज्यकर्ते या संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतिहासाची मांडणी करताना कालमापन पट्टीही डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते. या सर्वाचा विचार करता. इतिहासाच्या नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार इतिहास केवळ युद्ध आणि संघर्षांपुरता मर्यादित नसून त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक आयाम असतात. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन इतिहासाची ओळख एक विषय म्हणून इयत्ता पाचवीपासून करून देण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात इतिहास हा विषय, विषय म्हणून इयत्ता पाचवी पासून सुरू होणार आहे. प्रादेशिक अस्मिता कायम ठेवून राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इयत्ता सहावीमध्ये मांडण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता पाचवीमध्ये महाराष्ट्रातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य अशी प्राचीन आणि शिलाहार, राष्ट्रकूट, यादव अशी मध्ययुगीन राजघराणी यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे. खरे पाहता कोणत्याही राज्यव्यवस्थेच्या उदयाला एक नेमकी पार्श्वभूमी असते हा विचार मांडणे आवश्यक असते. त्यामुळे इतिहासाची नव्या या दृष्टिकोनातून मांडणी मंडळ करीत आहे इयत्ता चौथी मधे जितका उल्लेख आहे,तो आहेच. त्या शिवाय इयत्ता सहावी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या अंगाने देण्याचे मंडळाने ठरविले आहे.

 

यानुसार शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्यासाठी केलेल्या संघर्षाबरोबरच त्यांची आदर्श प्रशासन व्यवस्था, जी आजच्या काळातही अतिशय उपयुक्त आहे, ती मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलूही सहावीच्या पाठ्यपुस्तकातून उलगडण्यात येतील. थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्रातील प्राचीन व मध्ययुगीन काळातील समृद्ध राजसत्ता, छत्रपती शिवरायांचे कार्य , त्यांचे प्रशासन, त्यांची तत्वे, नीती आणि शिवचरित्र आजही आदर्श का आहे, याबाबतचा विचार यांची ओळख इयत्ता सहावीमध्ये स्वतंत्रपणे करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सहावीचा वयोगट हा मुलाच्या किशोरवयीन अवस्थेची सुरुवात असल्याने याच संस्कारक्षम वयात वेगळ्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक असते म्हणूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास हा या वयोगटाला अधिक प्रेरणादायी आणि विचारास प्रवृत्त करणारा ठरेल. त्यामुळे राज्याच्या आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे ही भीती अनाठायी आहे.