पुढे प्रचार, मागे कचरा

    दिनांक  17-Oct-2019 22:12:51   सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडवून दिला आहे. प्रचाराचे तंत्र म्हणून समाजमाध्यमांच्या वापराबरोबरच पारंपरिक पद्धतीने प्रचार करतानादेखील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते सहज दृष्टीपथात येतात. यात आकर्षक पत्रके, कटआऊट्स, झेंडे, गळ्यात वापरण्याचे कापडी पट्टे अशा नानाविध प्रचार साहित्याचा वापर सर्रास होताना दिसतो. नाशिकमध्येदेखील सध्या प्रचार शिगेला पोहोचला असून अशाच पद्धतीने विविध उमेदवार आपला प्रचार करत आहेत. यावेळी नाशिकमध्ये प्रचार रॅलीदरम्यान उमेदवार गळ्यात फुलांचे हार परिधान करून पुढे व त्याच्यामागे प्रचार साहित्य आणि पेपर ब्लास्ट, फुलांच्या पाकळ्या उधळणारे असंख्य कार्यकर्ते असे चित्र दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या या उत्साही प्रचारामुळे मात्र, शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. 'स्वच्छ भारत अभियाना'साठी सरकारी स्तरावर विविध मोहिमा राबवत प्रसार आणि प्रचार सुरू असताना उद्याचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन कसे काय करू शकतात, हा प्रश्न सुज्ञ नाशिककरांना नक्कीच भेडसावत असणार. आपल्या जाहीरनाम्यातून किंवा मतदारांशी वार्तालाप करताना शहर स्वच्छता आणि विकासकामे यांचे आश्वासन देणारे उमेदवार आपल्यामागे होणाऱ्या कचऱ्यावर मात्र नियंत्रण का ठेऊ शकत नाही, असा भाबडा प्रश्न अनेकांना सतावत आहे. विकासाचा मार्ग हा स्वच्छतेच्या माध्यमातून जाणे सगळ्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे विकासाचे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहर स्वच्छतेची किमान काळजी घ्यावी, हीच अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत. त्याचबरोबर प्रचारावेळी फोडण्यात येणारे फटाके, कर्कश्श आवाज यामुळेदेखील शहराच्या ध्वनिप्रदूषणात वाढच होत आहे. मोठ्या चौकात किंवा मैदानावर आवाज होणे स्वाभाविक असू शकते. मात्र, चिंचोळ्या गल्लीतून प्रचार करताना किंवा रुग्णालये, शाळांच्या समोरून जाताना आपण नेमके काय करत आहोत, याचे सामाजिक भान असणेदेखील आवश्यक आहे, असे वाटते. कार्यकर्ते उत्साही असतात मात्र, नेता हा प्रगल्भ असावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे आपण पुढे प्रचार करत असताना आपल्यामागे काय सुरू आहे, यावर उमेदवारांनी लक्ष ठेवणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे.

 

प्रचाराविना काँग्रेस

 

नाशिक शहरात काँग्रेस पक्ष आहे काय, अशी अवस्था सध्या विधानसभेच्या निमित्ताने दिसून येत आहे. अनेक वर्ष ज्या शहरातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, राज्यातील मंत्रिपदे प्राप्त झाली, त्याच शहरात आज काँग्रेसला स्टार प्रचारक मिळत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. नाशिक शहर व जिल्ह्यात काँग्रेसने एकूण पाच विधानसभा मतदारसंघांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, अद्याप काँग्रेसच्या प्रचारासाठी पक्षश्रेष्ठींकडून कुठल्याही स्टार प्रचारकांचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण भिस्त ही स्थानिक नेते आणि उरलेले काही कार्यकर्ते यांच्यावरच असल्याचे दिसते. उमेदवारांचे प्रचाररथदेखील शहराच्या एखाद्या ठिकाणी कोपरा पकडून पक्षासारखेच निवांत उभे असल्याचे दिसते. दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष व भाजप यांच्या माध्यमातून प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. शहरात युतीकडून राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय नेते यांच्या सभा आणि पत्रकार परिषदा यांची मालिकाच सुरु असल्याचे दिसून येते. मात्र, त्याचवेळी काँग्रेसला आलेली मरगळ सर्वांच्याच आश्चर्याचे कारण ठरत आहे. केवळ औपचारिकता म्हणून काँग्रेस या निवडणुकीत शहरात उभी आहे काय, असा सवाल या निमित्ताने काँग्रेसच्या हितचिंतकांनाही सतावत आहे. नाशिक शहरातील मध्य मतदारसंघ, पूर्वमध्ये कवाडे गटाला सोडण्यात आलेली जागा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व इगतपुरी व चांदवड मतदारसंघ अशा पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. येथील उमेदवार स्थानिक कार्यकर्त्यांची मोट बांधून रॅली, व्यक्तिगत गाठीभेटींवर जोर देत आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे उमेदवार असल्याने ते त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसत आहे, तर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष व इतर प्रदेशांचे पदाधिकारी फारसे प्रचारात सक्रिय नसल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. त्यातही चांदवड, मालेगाव बाह्य या मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या सभा उमेदवारांकडून घेतल्या जात आहेत. मात्र, पक्षाचीच नेतेमंडळी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक पदाधिकारी व अध्यक्षांच्या कामकाजावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.