आंतरराष्ट्रीय संरक्षण लाभलेल्या 'कासवा'ची ठाण्यात तस्करी

    दिनांक  16-Oct-2019 12:31:05ठाणे वन विभागाने स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव तस्करीसंदर्भात धोरण ठरविणाऱ्या 'सायटीस' या संस्थेने नुकतेच 'इंडियन स्टार' प्रजातीच्या कासवांच्या जागतिक तस्करीवर बंदी आणली आहे. असे असताना मंगळवारी ठाण्यातून स्टार कासवांची तस्करी उघड झाली. ठाणे वन विभागाच्या वन्यजीव विभागाने चार स्टार कासवांची विक्री करणाऱ्या इसमास अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे तीनशे रुपयांना विकत घेतलेली ही कासवे हा इसम बाहेर तीन हजार रुपयांना विकणार होता.

 
 

 
 
 

दक्षिण भारतातील जंगलांमध्ये अधिवास असणाऱ्या स्टार प्रजातीच्या कासवांना वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी मागणी आहे. घरामध्ये हे कासव पाळल्यास आर्थिक भरभराट होते, अशी यामागे अंधश्रध्दा आहे. त्यामुळे हवाई मार्गासह रेल्वेव्दारे या कासवांची तस्करी होते. मात्र, वाढत्या तस्करीमुळे या प्रजातीला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, 'सायटीस' या संस्थेने नुकतेच यांना आंतरराष्ट्रीय संरक्षण दिले आहे. 'भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत स्टार प्रजातीच्या कासवांना प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. परंतु, या कासवांना बाहेरील देशात कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने त्यांची परदेशी (एक्झाॅटिक) पशु-पक्ष्यांच्या नावाखाली विक्री होते. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने 'सायटीस' संस्थेसमोर या प्रजातीच्या तस्करीवर जागतिक बंदी आणण्याची मागणी केली होती. गेल्या महिन्यात पार पडलेल्या 'सायटीस' परिषदेेत स्टार प्रजातीच्या कासवांना संरक्षणाच्या प्रथम परिशिष्टामध्ये समावेश करुन त्यांच्या जागतिक तस्करीवर बंदी आणली. मात्र, मंगळवारी ठाण्यातून वन विभागाने चार स्टार कासवांची विक्री करणाऱ्या इसमास अटक केली.

 

 
 

ठाणे येथील वसंत विहार परिसरातील 'बालाजी अॅक्वेरीयम' दुकानात स्टार कासवांची विक्री होत असल्याची माहिती वन विभागाच्या हाती लागली होती. त्यानुसार या दुकानावर धाड मारली असता वनकर्मचाऱ्यांना बादलीमध्ये लपून ठेवलेली चार स्टार कासवे आढळून आली. दुकानाचा मालक शीवा नाडार याची अधिक चौकशी केली असता, काही मुलांनी येऊर येथील तलावामधून पकडून ही कासवे आपल्याला दिल्याचे त्याने सांगितले. आरोपीने चार कासवे तीनशे रुपयांना विकत घेतल्यानंतर ती तीन हजार रुपये जोडी दराने पुढे विकणार होता, अशी माहिती वन विभागातील एका कर्मचाऱ्याने दिली. आरोपी नाडार विरोधात वन्यजीव कायद्याअंतर्गत वन्यजीव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला २२ आॅक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नरेन्द्र मुठे, वनपाल पवार, परदेशी यांनी केली. या कारवाई पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मुठे करणार आहेत.