तुमचीच अवस्था लाजिरवाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |


 


खरे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारमुळे लाजिरवाणी अवस्था भारताची नव्हे तर अरुंधती रॉय यांच्यासारख्यांचीच झाली आहे. ना सरकारी पाठबळ ना जनतेचा पाठिंबा, ना कोणी विचारणारे ना कोणी पुसणारे, ना कोणी पुरस्कार देणारे ना कोणी पदांची खैरात करणारे. त्यामुळे त्यांना लाजिरवाणे वाटणारच.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताची जगभरात प्रतिष्ठा वाढत असताना इथल्याच सोयी-सुविधांचा मनसोक्त उपभोग घेणाऱ्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना स्वदेश महान नसल्याचा साक्षात्कार झाला. स्वदेश महान राहिला नाही, याचाच अर्थ तो हीन झाला, असाच होतो आणि याच आशयाचे विधान माओवाद्यांच्या प्रेमाची उबळ येणाऱ्या, फुटीरतावाद्यांची-दहशतवाद्यांची तळी उचलणाऱ्या, पाकिस्तानी लष्कराला स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या लेखिका अरुंधती रॉय यांनी केले. भाजपच्या सत्तेमुळे देशाची अवस्था लाजिरवाणी झाली असून आपला देश महान ठरत नाही, असे त्या म्हणाल्या. त्याला पार्श्वभूमी होती, जेएनयुतील नजीब अहमद या विद्यार्थ्याच्या गायब होण्याची, मुस्लिमांच्या झुंडबळींची, गौरी लंकेश यांच्या हत्येची, मानवाधिकार उल्लंघनाची, अर्थव्यवस्थेच्या पिछाडीची आणि हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या प्रसाराची. मुळात अरुंधती रॉय यांनी वरील मुद्द्यांच्या आधारे केलेल्या आरोपांतील सत्य व तथ्य निराळे आहे. परंतु, केवळ मोदी सरकारच्या बदनामीची सुपारी घेतलेल्यांना ते कसे दिसणार व समजणार? तसेच पंतप्रधानांपासून सरकारातील सर्वांनीच, कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. जिथे गरज आहे तिथे तपासयंत्रणांमार्फत चौकशी, न्यायालयीन कार्यवाहीदेखील सुरू आहे. पण ते काहीही लक्षात न घेता केवळ मोदींना, भाजपला व हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य केल्याचा आनंद साजरा करायला मिळतोय ना म्हणून अरुंधती रॉय वगैरेंसारखी मंडळी उरबडवेगिरी करत असतात. अर्थात अरुंधतींसारख्या एखाद्या 'क्ष' व्यक्तीने हजारो वर्षांचा गौरवशाली, वैभवशाली इतिहास असलेल्या देशाला महान ठरवले नाही, तर देश हीन होत नाही. मात्र, देशाला हीन म्हणणाऱ्या प्रवृत्ती इथे उजळ माथ्याने हिंडत-फिरत असल्याचे सर्वांसमोर आणलेच पाहिजे.

 

मागील पाच-साडेपाच वर्षांत सर्वत्रच एक आश्वासक, विश्वासू, प्रगतिशील देश म्हणून भारताची प्रतिमा निर्माण झाली. जागतिक पातळीवरील मुत्सद्देगिरी असो वा सौरऊर्जेसारखा मुद्दा, दहशतवादाच्या विरोधाचा विषय असो वा जम्मू-काश्मीरचा, अर्थव्यवस्थेचा मुद्दा असो वा परकीय गंगाजळीचा, शस्त्रास्त्र बळाचा विषय असो वा अंतराळ संशोधनाचा, या प्रत्येकच ठिकाणी भारताच्या नावाचा डंका वाजला. मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरकारच्या काळात ज्या देशांशी भारताचे धड संबंध नव्हते त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यात मोदींनी पुढाकार घेतला. 'मेक इन इंडिया' सारख्या योजनांमुळे अन्य देशांतील गुंतवणूकही वाढती राहिली. तसेच जनधन योजना, लाभार्थ्यांना थेट अनुदान, हस्तांतरणसारख्या क्रांतिकारी निर्णयांमुळे गरिबी निर्मूलनात, भ्रष्टाचाराला आळा घालण्यात भारताने आघाडी घेतली. ही सर्वसामान्य भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट-पण जे सर्वसामान्य नाहीत त्यांचे काय? स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजणारी जमात भारतात बऱ्यापैकी अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या आमदानीत वर्षानुवर्षे सरकारी पैशांवर, पुरस्कारांवर, पदांवर पोसलेली ही मंडळी भारतातले दारिद्य्र, भीती विकून परदेशात मोठेपणा मिरवत आली. ठिकठिकाणी आपापल्या मालकीच्या स्वयंसेवी संस्था काढून, त्याला मानवाधिकार, पर्यावरणाधिकार रक्षणाचे नाव द्यायचे आणि देशातली कैफियत इतरांसमोर मांडण्यासारखे करायचे. त्यातून स्वतःचे हित कसे साधेल, हे पाहायचे आणि ऐशोआरामात दिवस कंठायचे, असा या सर्वांचाच खाक्या होता. पण आता ते सगळेच उद्योग बंद झाले, परिस्थिती बदलली, परदेशातून केल्या जाणाऱ्या कोडकौतुकावर गदा आली आणि अशा लोकांना भारताचे मोठेपण खुपू लागले. अरुंधती रॉय यांना म्हणूनच भाजपमुळे देशाची अवस्था लाजिरवाणी झाली, असे म्हणावेसे वाटले.

 

देशाच्या फाळणीनंतर सत्तेच्या, राजकारणाच्या केंद्रस्थानी नसलेल्या हिंदुत्वविचारावर भारतीय जनतेने एकदा नव्हे तर दोनदा शिक्कामोर्तब केले. ज्या पक्षाच्या आणि त्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावर आतापर्यंत हिंदुत्वाचा द्वेष केला गेला, तेच तत्त्व सर्वानुमते मान्य होत असल्याचे पाहून अरुंधती रॉय वगैरे मंडळींच्या पायाखालची वाळू सरकणे साहजिकच. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करूनही हे असे कसे झाले म्हणून कपाळावर मारून घेणारे हे लोक. त्यांना हिंदुत्वाचा होत असलेला प्रसार जाचणारच. पण मग याआधी कोणता विचार की विखार पसरवला जात होता? तो धर्मनिरपेक्षतेचा होता की, हिंदूंच्या मनात न्यूनगंड, अपराधगंड पसरविण्याचा होता? तर निश्चितच पुरोगामित्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंनाच हिंदू असल्याची लाज वाटली पाहिजे, अशाच प्रकारची वातावरण निर्मिती, साहित्यनिर्मिती आणि विचारनिर्मिती व नंतर त्याच्या प्रसाराची कृत्ये केली गेली. तेव्हा अरुंधती रॉय यांना लाजिरवाणे वाटले नाही का? काश्मिरातून हिंदू पंडितांना हाकलून लावले, त्यांच्यावर अत्याचार केले गेले, केरळ, पश्चिम बंगालमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्या गेल्या, त्यावेळी अरुंधती रॉय यांना देशाची अवस्था लाजिरवाणी झाल्याचे समजले नाही का? अरुंधती रॉय असेही म्हणाल्या की, "भारतीय संविधानानुसार देशाचा कारभार सुरळीत चालत नाही, तोपर्यंत देश महान ठरणार नाही." पण मग आता देशाचा कारभार नेमका कशाच्या आधारावर सुरू आहे? की काँग्रेसची राजवट असली की ती राज्यघटनेनुसार चालणारी असते आणि भाजप सत्तेवर आला की लगेच घटनाधिष्ठित कारभार संपतो? यावरूनच अरुंधती रॉय यांचा आधार कोणता, हे लक्षात येते. तसेच आर्थिकदृष्ट्या भारत पिछाडीवर गेल्याचेही अरुंधती रॉय म्हणाल्या. पण मग मनमोहन सिंग यांच्या सत्तेत भारत कोणत्या गोष्टींत आघाडीवर होता. भ्रष्टाचाराच्या, कर्जाच्या, लाचखोरीच्या, अनागोंदीच्याच ना? पण त्यावर कधी अरुंधती रॉय बोलल्याचे दिसत नाही. म्हणजेच आताची त्यांची ही सगळीच नौटंकी केवळ राष्ट्रवादी विचारांची देशावर सत्ता असल्यानेच सुरू असल्याचे दिसते. म्हणूनच त्यांना देशाची अवस्था लाजिरवाणी झाल्याचे वाटते. पण खरी लाजिरवाणी स्थिती अरुंधती रॉय यांच्यासारख्यांचीच झाली आहे. ना सरकारी पाठबळ ना जनतेचा पाठिंबा, ना कोणी विचारणारे ना कोणी पुसणारे, ना कोणी पुरस्कार देणारे ना कोणी पदांची खैरात करणारे. त्यामुळे लाजिरवाणे वाटणारच.

@@AUTHORINFO_V1@@