प्रत्येकाच्या मनात दडलेला 'जोकर', याकरिता पाहिला पाहिजे हा चित्रपट...

    दिनांक  16-Oct-2019 10:57:08
तुमच्या आमच्या मनात दडलेला "जोकर"

प्रत्येक चांगल्या माणसाच्या आत एक भयंकर वाईट माणूस दडलेला असतो आणि एक सैतानातही. एक असा माणूस असतो: जो सैतान असण्याच्या आधी भला माणूस होता. जपानच्या झेन संस्कृतीमधली काळ्या आणि पांढऱ्या रंगछ्टांमागच्या गोल आकृतीचे हेच तत्वज्ञान आहे. आणि याच तत्त्वावर फिरणाऱ्या या कलाकृतीचे नाव आहे 'जोकर'.


हा बहुचर्चित सिनेमा, एकदाचा रिलीज झाल्यावर डीसी युनिव्हर्स प्रेमींनी बॉक्स ऑफिसवर उड्या टाकल्या नसत्या तर नवलच. त्याउपरही हा सिनेमा हा बॅटमॅनमधला लाडका व्हिलन असणाऱ्या, जोकरवरच आधारित असल्याने उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. त्यामुळे बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोकरच राज्य करणार, हे निश्चित.

पुर्वरहस्य उलगडणारा 'जोकर'


हॉलिवूडपटांची सर्वात उत्कंठा वाढवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे प्रिक्वेल. प्रिक्वेल म्हणजे चित्रपटातील गूढ अशा उकल न होणाऱ्या पात्रांची आणि घटनांच्या आधीचीही पार्श्वभूमी उलगडून दाखवणारे चित्रपट. ज्याला मराठीमध्ये पुर्वरंग असं म्हणलं जातं. तसा हा जोकरचा पुर्वरंग आहे. जो जोकर बॅटमॅन मध्ये खलनायक म्हणून दाखवला होता; तो तसा का झाला, हा त्याचा चित्तथरारक प्रवास या चित्रपटात उलगडला आहे.


का पाहावा चित्रपट?

१. मुळातच एखादा माणूस खलनायक का होतो यामगचं कारण जेव्हा कळतं तेव्हा खलनायकाबद्दलही सहानूभूती वाटल्याशिवाय राहत नाही. पटकथेची हीच मांडणी मनाला भावून जाते.

२. मुळात जोकर हा लाडका खलनायक आहे. तो सामान्य माणसाला सहजासहजी चुकीचा वाटत नाही. जोकर हा सामान्य माणसाच्या मनात असलेल्या खदखदीचं मुर्त आणि व्यक्त होणारं रूप असल्याने जोकर या पात्रावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव झालेला आहे. आणि जोकर हा मुळातच जोकर का झाला, याचा प्रवास सांगणारा चित्रपट असल्याकारणाने तो पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.

३. २००८ मध्ये हिथ लेजरने पेललेलं जोकरचं शिवधनुष्य हे पुन्हा कोणाला पेलता येईल का? ही कल्पनाच कोणाला करवत नव्हती आणि लेजर ऐवजी कोणाला पाहण्याची मानसिक तयारीही नव्हती. तरीही हे आव्हान जोॲक्वीन फिनीक्सने स्वीकारलं आणि हे शिवधनुष्य लीलया पेललं सुद्धा! पृथ्वी बहुरत्ना वसुंधरा आहे, हेच यातून शब्दशः सिद्ध होतं. चित्रपटात फार पल्लेदार वाक्य नाहीत. त्यामुळे शब्दफेकीच्या जोरावर नटाला छाप पाडायला फारसा वाव नाही. कायिक अभिनय आणि चेहऱ्यावरचे हावभाव यावरच प्रेक्षकांना साद घालायची आहे. आणि हे काम जबरी झालंय फिनीक्सच्या अभिनयासाठी नक्कीच पहा.

४. चित्रपटाची एकूण मांडणी आणि कमी वेळेत फार आशय पोहोचवण्याची हातोटी याबाबतीत दिग्दर्शकाने एकदम उच्चप्रतीचे काम केले आहे. चित्रपट बघताना कधीही भरकटल्यासारखे वाटत नाही. चित्रपटाची अप्रतिम बांधणी याचासुद्धा चित्रपटाच्या यशामध्ये मोठा वाटा आहे. १९८० च्या दशकाची अमेरिकाही चांगल्या प्रकारे दाखवण्यात यश आलं आहे.

५. चित्रपटात 'प्रस्थापित विरुद्ध सामान्य' असा लढा दाखवण्यात आला आहे. जिथे शेवटी चिडलेले सर्वसामान्य रस्त्यावर उतरून 'न भूतो न भविष्यति' असा दंगा करताना दिसतात. हा चित्रपट राजकीय नसला तरीही राज्यशास्त्राचा थोडासाही अभ्यास असणाऱ्या माणसाला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते. चित्रपटातून मार्क्स डोकावल्याशिवाय राहत नाही. 'आहे-रे' आणि 'नाही-रे' मधील संघर्षाची आठवण येतेच येते. प्रस्थापितांचा जमिनीशी तुटलेला संपर्क आणि सर्वसामान्यांची प्रस्थापितांविरोधी असलेली खदखद याचे मुर्तीमंत प्रतीक म्हणजे जोकर. ही कहाणी रंगवण्यात कलाकार, दिग्दर्शक आणि संपुर्ण टीमला यश आलं आहे.

६. जोकर या पात्राने याआधी हीथ लेजरला ऑस्कर मिळवून दिला आहे परंतू हीथ लेजरचा जीवदेखील घेतला आहे. या पात्राने दिलेला मानसिक धक्का आणि यामुळे घेतले गेलेले ड्रगचे ओवरडोस सहन न झाल्याने लेजरचा मृत्यू झाला. आता फीनिक्ससुद्धा या पात्राने दिलेल्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेत आहे आणि त्यातून तो सावरतही आहे. असं पात्र प्रभावीपणे साकारणं ही एक मोठीच कसरत आहे आणि प्रचंड अपेक्षांचं ते ओझं आहे. ते पेललं गेलंय की नाही, यासाठी तरी 'जोकर' पाहायलाच हवा.
कोणती काळजी घ्याल?


१. जुन्या जोकरचा 'द डार्क नाईट' हा सिनेमा पाहवा. अन्यथा कथानक संपूर्णपणे कळणार नाही. 'जोकर'बद्दल थोडीतरी माहिती ठेवावी.

२. मित्रमंडळींसोबत जा. एकटादुकट्याने पाहण्यासारखा सिनेमा नाही. A सर्टिफिकेट असल्याने लहान मुलांना घेऊन जाऊ नका.

३. मानसिक तणावाखाली असाल तर हा सिनेमा पाहणे टाळा.

४. प्रत्येकाच्या मनात एक जोकर असतोच. फक्त हा सिनेमा पाहून आल्यावर जोकरच्या जागी तुम्ही असता; तर कोणाला मारले असते याची यादी बनवू नका. बाकी चित्रपट झकास आहे. एकदा तरी नक्की पहावा.
-राहुल रामदास महांगरे