चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केला कोथरुडचा 'संकल्पनामा'

    दिनांक  16-Oct-2019 18:21:23


 
 


पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राजस्थानचे खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव राजेश पांडे, पुणे भाजप अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना नेते शाम देशपांडे, नगरसेवक आणि भाजप शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उज्जवल केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संकल्पनामा प्रकाशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे. यामध्ये अनेक गोष्टी नव्याने समाविष्ट होतील. त्या निश्चतपणेच पूर्ण करु. रस्ते, पाणी, वीज आदी सुविधांसोबतच शहरात मेट्रोची सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करुन, त्यामध्ये ई-व्हेईकल समावेश करणे आदी विषयांवर काम करणार असल्याचे सांगितले.
 

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य

शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगतानाच पाटील म्हणाले की, "कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासोबतच अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धधांसाठी सेवा केंद्र उभारण्याचा माझा संकल्प आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने त्यांच्यासाठी एखादे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा मानस आहे. या पर्यटन केंद्रामध्ये चार दिवसाची वयोवृद्ध मंडळींची सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून देणार" असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

कोथरूडमध्ये सांस्कृतिक विद्यापीठ उभारणार

पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यासोबतच सांस्कृतिक केंद्र देखील असल्याचे सांगून, भारतीय संस्कृतीची जगाला ओळख व्हावी, यासाठी कोथरूडमध्ये सांस्कृतिक विद्यापीठ उभारण्याचा मानस यावेळी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

शिवसृष्टीसाठी पाठपुरावा करणार

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प अद्याप का कार्यन्वित झाला नाही, कोणत्या टप्प्यावर यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत याचा पाठपुरावा करु," असे यावेळी त्यांनी आश्वस्त केले. झपाट्याने वाढलेल्या कोथरूड करांना पुरेशा व दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा देण्यात येतील असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले.