निसर्गधर्म परंपरेचे पाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019   
Total Views |


 

 

वडिलांकडून मिळालेला निसर्गधर्म जोपासून आरे वसाहतीत स्वबळावर फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केलेल्या संदीप आठल्ये यांच्याविषयी....


मुंंबई ( अक्षय मांडवकर ) -  केवळ वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन कधीच होत नाही, तर लावलेल्या वृक्षांना बहर येईपर्यंत त्यांचा सांभाळ करणे म्हणजे खरा निसर्गधर्म. आठल्ये कुटुंबीयांनी हा धर्म पाळला आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये तो रुजवला. गोरेगावच्या कुशीत वसलेल्या आरे दुग्ध वसाहतीच्या जागेत या कुटुंबाने सुमारे सहा हजार झाडे केवळ लावलीच नाही, तर ती जगवलीसुद्धा. या कुटुंबातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप आठल्ये यांनी एक पाऊल पुढे टाकत आरेमध्ये फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली. त्यासाठी पडिक जागेवर बाराशेहून अधिक झाडं लावली. आज या नंदनवनात ६० ते ७० प्रजातीची फुलपाखरे बागडत आहेत.
 
 
 

 
 
 
 
 
आठल्ये कुटुंबीय फाळणीनंतर भारतात आले आणि पुढे ते मुंबईत स्थायिक झाले. तर संदीप आठल्येंचा जन्म दि. २८ जानेवारी, १९८० रोजी मुंबईतच झाला. आठल्ये कुटुंबाच्या वृक्षप्रेमाची सुरुवात होते ती म्हणजे संदीप यांचे वडील विनय आठल्ये यांच्यापासून. निसर्गधर्म जोपासणारे विनय आठल्ये हे गोरेगावमधील आरे कॉलनीत सांजभ्रमंतीसाठी जायचे. मोकळी जागा पाहून २००० साली त्यांनी युनिट १६ मध्ये १०० झाडे लावली. त्यासाठी वड, पिंपळ, बेल, आवळा आणि अशोक या भारतीय झाडांची निवड केली. वर्षभर त्या झाडांची राखण केली. या दरम्यान संदीपही त्यांच्यासोबत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जायचे. मात्र, त्यामध्ये हिरीरीने त्यांचा सहभाग कधीच नव्हता. २००० पासून पुढील चार वर्षे संदीप यांच्या वडिलांनी वृक्षारोपणामध्ये सातत्य ठेवले. त्यांनी लावलेले एक-एक झाड जगवले. २००४ साली त्यांनी आरेमध्ये 'पंचवटी नक्षत्र' वनाची स्थापना केली. वृक्षारोपणाचा निसर्गधर्म त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला. २०१५ मध्ये विनय यांचे निधन झाले. तोपर्यंत त्यांनी सुमारे पाच हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे रक्षण केले होते. वृक्षारोपणाची ही परंपरा जोपासण्याची जबाबदारी त्यानंतर संदीपनी उचलली.
 
 
 

 
 
 
 
संदीपना वडिलांनी निसर्गप्रेमाचे बाळकडू पाजले तर होतेच; ते पचायला काहीसा कालावधी जावा लागला इतकेच. एम.कॉम आणि एमबीएचे शिक्षण झाल्यानंतर संदीप नोकरीत व्यस्त होते. वडिलांच्या निधनानंतर वृक्षारोपणाची जबाबदारी ओळखून त्यांनी या कामात उडी घेतली. नोकरीतून मिळणारी शनिवार-रविवारची सुट्टी त्यांनी आरेमध्ये घालवण्यास सुरुवात केली. या कामामध्ये त्यांना आई आरती आणि पत्नी वरदायिनी आठल्ये यांची साथ मिळाली. या कामासंदर्भात काहीच कल्पना नसल्याने त्यांनी प्रथम फिरून जागेचा अभ्यास केला. आरे प्रशासनाशी संपर्क साधून वृक्षारोपणाकरिता परवानगी मिळवली आणि २०१६ पासून झाडे लावण्यास सुरुवात केली. पण, वडिलांच्या मनातील एक इच्छा संदीपना शांत बसू देत नव्हती. विनयना आरेमध्ये फुलपाखरू उद्यान तयार करण्याची इच्छा होती. वडिलांच्या या इच्छेने त्यांनी फुलपाखरू उद्यानाच्या अनुषंगाने आरेमध्येच जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली.
 
 
 

 
 
 

फुलपाखरू उद्यानासाठी जागा तर निवडली गेली. पण, फुलपाखरांचा अधिवास, स्वभाव म्हणजेच जीवशास्त्राविषयी संदीप यांना काहीच कल्पना नव्हती. शिवाय फुलपाखरांना त्या ठिकाणापर्यंत आकर्षित करण्याकरिता काय करावे? याबाबतही जाण नव्हती. असेच एकदा भटकताना त्यांना आरेमधील स्थानिक वनवासी भेटला. फुलपाखरे पाहिजे असतील, तर त्यांना आकर्षित करणारी झाडं लावा, असा सल्ला त्यांनी संदीपना दिला. या सल्ल्यावर त्यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली. त्यासाठी फुलपाखरू अभ्यासकांना भेटून फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतींची माहिती घेतली. या खाद्यवनस्पतींची स्वखर्चाने खरेदी करुन त्याचे दोन एकरच्या जागेवर रोपण केले. झाडांची वाढ होत गेल्यावर फुलपाखरेदेखील त्यावर आकर्षित होऊ लागली. या फुलपाखरांची नावे संदीपनी तोंडपाठ करून घेतली. दोन एकरवर पसरलेल्या या फुलपाखरू उद्यानात आज सहजगत्या ६० ते ७० प्रजातींची फुलपाखरे दिसून येतात. ही फुलपाखरे केवळ येथे बागडत नाहीत, तर या झाडांवर अंडी घालतात. त्यातून त्यांची जन्माला आलेली नवी पिढीदेखील याच उद्यानात पोसते. महाराष्ट्राच्या राज्य फुलपाखराचा दर्जा मिळालेले 'ब्लू मॉरमोन' हे फुलपाखरूदेखील आठल्ये यांच्या उद्यानात दिसते. फुलपाखरांव्यतिरिक्त विविध प्रजातीचे कोळी, चतुर, 'टाचणी', पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या काही प्रजातीही या उद्यानात पाहावयास मिळतात. आठल्ये कुटुंबाची निसर्गधर्माची ही परंपरा आज तिसऱ्या पिढीतही रुजली गेली आहे. संदीप यांचा चिरंजीव मल्हारही आपल्या वडिलांबरोबर फुलपाखरू उद्यानात झाडे लावण्यास मदत करतो. झाड लावताना त्याचे चिमुकले हात चिखलाने माखलेले पाहून आनंद होत असल्याची भावना संदीप व्यक्त करतात. निसर्गधर्म जोपासणाऱ्या संदीपना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा...!

 
 
 
 
 
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@