वैश्विक दारिद्र्य निर्मुलातील प्रयोगजन्य दृष्टीकोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |
 



केवळ आर्थिक वृद्धी आणि विकासाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) आकड्यांद्वारे विश्लेषण करून दारिद्र्यासारखा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी जे- पाल या संस्थेने सुचविलेले विविध उपाय लक्षात घेऊन आर्थिक धोरणही तसे राबवावे लागेल. जागतिक दारिद्र्याच्या ग्लोबल समस्येवर लोकल उत्तरे शोधावी लागतील. असो, एका भारतीयांस हा सन्मान मिळाला याचा आनंद आहेच परंतु मराठी वाचकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांचा मातोश्री निर्मला बॅनर्जी पूर्वाश्रमीच्या निर्मला पाटणकर या अस्सल मुंबईकर.




समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी एक बातमी मिळाली ती म्हणजे यंदाचे अर्थ विज्ञान विषयातील नोबेल पारितोषिक. भारतीय असलेले, मुंबई येथे जन्मलेले डॉ. अभिजित बॅनर्जी आणि आणि त्याची पत्नी एस्थर डफ्लो यांना जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक ते हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक मायकल क्रेमर यांच्याबरोबर प्राप्त करणार आहेत. जगभरातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेल्या प्रयोगशील संशोधन आणि प्रयत्न यासाठी त्यांना या पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी अमर्त्य सेन या भारतीय अर्थतज्ञाला त्यांच्या कल्याणाच्या अर्थशास्त्रातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.

 

अभिजीत बॅनर्जी यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल प्रशंसा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी म्हणते की, 'या तिघांच्या अनुभवजन्य संशोधनामुळे लक्षावधी भारतीय विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक (रेमेडियल) शिकवणीचा फायदा झाला व जगभरातील अनेक देशातील सरकारांना त्यांच्या देशातील आरोग्यविषयक योजनांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली.' बॅनर्जी, डफ्लो आणि क्रेमर यांचे संशोधन अर्थशास्त्राच्या अगम्य चाकोरीबाहेरचे असून त्यामुळे दारिद्र्याची विभागणी सूक्ष्म स्तरीय समस्यांमध्ये करून त्या समस्यांची सोडवणूक करणे सोपी झाल्याचे दिसून येते. यामध्ये गरिबांना पुरेसा आहार घेता येणे शक्य होते का? ते आवश्यक अशा लस आणि औषधांची खरेदी करू शकतात का? कुटुंबातील मुलांची संख्या आणि त्या कुटुंबाच्या दारिद्र्याचे प्रमाण याच्यात काही आंतरसंबंध आहे का?, अशा मूलभूत प्रश्नांवर केवळ प्रकाश टाकणारे नव्हे तर त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल याबाबत प्रभावी प्रकारचे संशोधन या अर्थतज्ज्ञांनी केल्याचे दिसून येते.

 

बॅनर्जी हे स्वतः अब्दुल जमील पोवर्टी ऍक्शन लॅब (जे-पल ) या संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक असून त्यांच्या पत्नी सुद्धा याच संस्थेच्या एमआयटी येथील प्राध्यापक आहेत. या संस्थेमार्फत दहा देशांमध्ये पाचशेहून अधिक प्रयोग करून आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण, इत्यादी बाबतीत सार्वजनिक धोरणाचा प्रभावीपणा अभ्यासण्यात आला. विशेष म्हणजे यात भारतातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (NREGS) आणि गुजरात येथील प्रदूषण नियंत्रण याचबरोबर तमिळनाडू सरकारच्या विविध कल्याणकारी योजना यांचे सुद्धा चिकित्सकपणे अध्ययन करण्यात आले.

 
 
 

अभिजीत बॅनर्जी आणि इस्थर डफ्लो यांनी पुअर इकॉनॉमिक्स, गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स, मेकिंग एड वर्क अशा विविध पुस्तकांचे लेखन केलेले आहे. यापैकी पुअर इकॉनॉमिक्स या पुस्तकास विविध वृत्तपत्रांनी आणि संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरविलेले पुस्तक आहे. 'फायनान्सियल टाइम्स'चा म्यॅकिन्सी बिझिनेस बुक ऑफ थे इयर हा त्यातील महत्वाचा पुरस्कार होय. बॅनर्जी यांचे संशोधन अर्थशास्त्राच्या चाकोरीबाहेरचे अशासाठी म्हटले पाहिजे की, संशोधनादरम्यान त्यांना पडलेले प्रश्न हे वेगळ्या धाटणीचे आहेत. त्यामध्ये गरिबांना मिळणारा आहार खरोखर चांगल्या दर्जाचा आणि पुरेसा आहे का?, दारिद्रयातील लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरेशा आहेत का? गरिबांची मुले शाळेत प्रवेश घेऊनसुद्धा त्यांचे शिकणे योग्य पद्धतीने का होत नाही? कुटुंबातील मुलांची संख्या मोठी असल्याकारणाने त्या कुटुंबाच्या अर्थकारणाला आणि पर्यायाने दारिद्र्य निर्मूलनाला मर्यादा येतात का? मुल जन्माला घालण्यात बाबतच्या निर्णयाशी दारिद्र्याचा संबंध आहे का? सूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या योजना प्रभावी ठरत नाहीत का? इत्यादी.

बालवयात कलकत्त्यात राहत असताना आजूबाजूच्या परिसरातील दारिद्र्यात जगणाऱ्या मुलांचे जीवन बॅनर्जी यांनी अतिशय जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे शहरी भागात वातानुकूलित कार्यालयात बसून अनाकलनीय आकडेवारीचे गुऱ्हाळ चालून कोणत्याही खात्रीपूर्वक निर्णयाप्रत न येणाऱ्या तथाकथित पाश्चिमात्य जगातील प्रशिक्षित विकासवादी अर्थतज्ञांपेक्षा प्रत्यक्ष जनमानसात जाऊन, त्यांचे जीवन जवळून पाहून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि गरजांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन केलेले खरे संशोधन हा बॅनर्जी यांच्या अर्थविषयक चिंतनाचा मूलाधार आहे. या तीनही अर्थतज्ज्ञांच्या मते जागतिक दारिद्र्य दूर करण्याची सुरुवात हे दारिद्र्यात पिचलेल्या माणसाला समजून घेण्याच्या क्षणापासून होते. जगभरातील ५० देशातील सरासरी दारिद्ररेषा लक्षात घेता, बहुतेक लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असताना दर दिवशी फक्त १६ भारतीय रुपये एवढा खर्च करू शकतात.



 

२०१४ चा विनिमय दर लक्षात घेता त्याची किंमत ३६ अमेरिकन सेंट्स इतकी होते, परंतु विकसनशील देशातील किंमत पातळी कमी असल्याने बॅनर्जी ती मर्यादा ९९ सेंट्स पर्यंत वाढवतात. म्हणजेच ९९ सेंट्स दरदिवशी खर्च करू ना शकणारे दारिद्र्यात आहेत असे म्हणावे लागेल. याच प्रकारे जागतिक आरोग्य संघटनेने दारिद्र्याची व्याख्या करताना दरडोई दरदिवशी एक अमेरिकन डॉलर पेक्षा अधिक खर्च न करण्याची क्षमता असा केला होता. व्यक्ती दारिद्र्यात असली तरीसुद्धा त्या व्यक्तीची इच्छा-आकांक्षा, विविध गरजा आपल्यासारख्याच असताना इतक्या किमान पातळीवरील उत्पन्नातून त्यांचा जीवनसंघर्ष किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी. ९९ सेंट्स पेक्षा कमी खर्च म्हणजेच त्यांच्याकडे उपलब्ध असणारी माहिती सुद्धा मर्यादितच राहणार आहे. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ,मोबाइल, पुस्तके यासाठी असे लोक खर्च करूच शकणार नाहीत. विविध साथींच्या रोगांच्या निर्मूलनासाठी लसीकरण आवश्यक असते यांचीही कदाचित त्यांच्यापर्यंत माहिती असणार नाही. याच बरोबर त्यांना विम्याची कल्पना असणार नाही अशाप्रकारचे एक दुष्टचक्र दारिद्र्याचे प्रमाण जास्त राहण्यास कारणीभूत असेल.

 

केवळ आर्थिक वृद्धी आणि विकासाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) आकड्यांद्वारे विश्लेषण करून दारिद्र्यासारखा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी जे- पाल या संस्थेने सुचविलेले विविध उपाय लक्षात घेऊन आर्थिक धोरणही तसे राबवावे लागेल. जागतिक दारिद्र्याच्या ग्लोबल समस्येवर लोकल उत्तरे शोधावी लागतील. असो, एका भारतीयांस हा सन्मान मिळाला याचा आनंद आहेच परंतु मराठी वाचकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांचा मातोश्री निर्मला बॅनर्जी पूर्वाश्रमीच्या निर्मला पाटणकर या अस्सल मुंबईकर.

 

- प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई.

९४२२४९०७०५

somnath11@gmail.com

@@AUTHORINFO_V1@@