ठाण्यात रंगणार दुरंगी लढत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |



लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची महायुती झाली आणि अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. अशा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. भाजप-शिवसेना महायुतीचा बालेकिल्ला म्हणूनही या मतदारसंघाला ओळखले जाते. २०१४ साली महायुती झाली नाही आणि शिवसेनेशी झालेल्या थेट लढतीत भाजपने या मतदारसंघावर आपली मोहर उमटवली आणि शहरातील अनेक वर्षांचा आमदारकीचा अनुशेष भरून काढला.

 
शिवसेनेच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. आता शिवसेना रिंगणात नसल्याने इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या मताधिक्क्याच्या विजयी होण्याच्या आकांक्षेने येथे भाजपचे उमेदवार संजय केळकर रिंगणात उतरले आहेत. शांत, संयमी, स्वच्छ, पारदर्शक, अभ्यासू, उच्चशिक्षित आणि घटनेच्या चौकटीत राहून प्रत्येक प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो सोडविण्याचे कसब अशा अनेक गुणांमुळे ठाणे शहर मतदारसंघासाठीचा योग्य उमेदवार म्हणून संजय केळकर यांची प्रतिमा शहरात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवसेना संजय केळकर यांच्या विजयासाठी सर्वतोपरी मेहनत घेणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील नाराजी विसरून महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते केळकरांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे विजय नक्की मानला जात असला तरी गाफील न राहता संजय केळकर पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारांना भेटत आहेत. विविध भाषिक मतदारांपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचवण्यासाठी राज्य व केंद्राकडूनदेखील ‘स्टार’ प्रचारकांची कुमक केळकर यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप उपाध्यक्ष जे. पी. नड्डा, खा. पूनम महाजन, विनोद तावडे, अ‍ॅड. आशिष शेलार, मनोज तिवारी अनेक वरिष्ठ नेते ठाण्यात संजय केळकर यांच्या विजयाच्या पायाभरणीसाठी येऊन गेले. मफतलाल कामगारांचा प्रश्न, कोपरी पुलाचा प्रश्न, पोलीस वसाहतीचा प्रश्न, धोकादायक इमारतींचा प्रश्न, टाऊन हॉलचा प्रश्न असे असंख्य प्रश्न केळकर यांनी मार्गी लावल्यामुळे मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
 

संजय केळकर यांना कडवे आव्हान देण्याच्या उद्देशाने मनसेचे अविनाश जाधव रिंगणात उतरले आहेत. अभिजित पानसे की अविनाश जाधव अशा कात्रीत अडकलेल्या मनसेने अखेर जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. तरीही नाराजी न पत्करता पानसे यांनीदेखील अविनाश जाधव यांच्यामागे प्रचारासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून जाधव यांना मार्ग प्रशस्त करून दिला आहे. इतकेच काय, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अविनाश जाधव यांना त्यांच्याकडून कुमक पुरवली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रसिद्धीप्रमुख ठाणे शहर मतदारसंघासाठी मनसेचे प्रसिद्धी प्रमुख म्हणूनदेखील काम करीत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एकूणच ठाणे शहर मतदारसंघात भाजप-मनसे अशी सरळ लढत होणार, हे नक्की आहे. सगळ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचे मनसुबे भाजप बाळगून आहे, तर धक्कादायक निकाल देण्याचा मनसेकडून प्रयत्न सुरू आहे. ठाणे शहर मतदारसंघात कुणाला किती मते मिळतात, हा औत्सुक्याचा विषय असणार हे नक्की. अर्थात, त्यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार.

भटू सावंत 
@@AUTHORINFO_V1@@