बोईसरमध्ये दिग्गजांपेक्षा अपक्ष उमेदवाराचीच चर्चा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षे प्रचारक म्हणून काम केलेले आणि त्यानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून पदभार सांभाळणारे संतोष जनाठे बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली. युतीच्या जागावाटपात पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघही शिवसेनेच्या वाट्याला गेला. दरम्यान, संतोष जनाठे यांना उमेदवारी मिळावी अशी भाजपतील अनेकांची इच्छा होती. मात्र, तिकीट न मिळाल्याने संतोष जनाठे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझे नेते आहेत व भाजप माझा पक्ष आहे, असे वक्तव्य करून संतोष जनाठे यांनी अपक्ष निवडणूक उमेदवारी अर्ज भरला. एकंदर संतोष जनाठे यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद लाभत असून समाजाच्या सर्वच स्तरांतून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराच्या अडचणीत मात्र यामुळे वाढ झाली आहे. संघसंबंधित अनेक संस्थांचे संतोष जनाठे यांना समर्थन असल्याचे समजते. ते राजकारणात येण्यापूर्वी १४ वर्षे संघाचे प्रचारक होते. त्यांनी तळकोकणात तसेच अनेक वर्षे रायगडमध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम केले आहे. ते संघाच्या रायगडचे विभाग प्रचारक होते. महाड, म्हसळा, तळा, अलिबाग, पनवेल भागातून मोठ्या संख्येने संतोष जनाठेंचे चाहते बोईसर विधानसभा मतदारसंघात दाखल होत आहेत. सध्या प्रचाराचा धडाका लागला असून बोईसरचे मतदारही त्यांचे स्वागत करीत आहेत.

 

संतोष जनाठेंना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी याकरिता भाजपच्या चारही विधानसभा मंडल अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिले होते. जागावाटपाच्या वेळेस हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडवा लागला. इतर उमेदवारांशी तुलना केल्यास संतोष जनाठेंची बाजू अनेक अर्थांनी उजवी ठरते. संतोष जनाठे यांनी अनेक वर्षे पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम केलेले असल्यामुळे ते मैदानाचा अंदाज असणारे पैलवान ठरतात. जनाठेंच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे कार्यकर्तेही त्याच ताकदीचे असल्याचे समजते. निवडणुकीची रणनीती आखणारे जवळपास सर्वच कार्यकर्ते सामजिकतेची चांगली जाण असणारे आहेत. संतोष जनाठेंनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला; तेव्हा पालघर येथे परतल्यानंतरही त्यांनी स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतले. त्यांनी आदिवासी एकता मित्र मंडळासारखी संस्था स्थापन केली. अनेक प्रश्नांसाठी संघर्ष सुरू केला. जिल्हा रुग्णालयातील सुख-सुविधांसाठी मोर्चे काढणे, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करणे, असे त्यांचे सतत सुरू असायचे. त्यातून संतोष जनाठेंना भारतीय जनता पक्षाने जिल्हा सरचिटणीस म्हणून काम कारण्याची संधी दिली. संतोष जनाठेंनीदेखील त्यानंतर पक्षवृद्धीसाठी अतोनात मेहनत घेतली.

 

या सामाजिक कामांना मिळतोय प्रतिसाद

 

राजकारण हा सत्तेचा मार्ग. मात्र एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनाठे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. संतोष जनाठे यांनी बोईसर मतदारसंघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. मनोर येथे जन सहभागातून लोकसेवा केंद्रातून सर्वसामान्य शासकीय कामासाठी लागणारे दाखले मिळवून देण्यासाठी अनेक नागरिकांना मदत केली आहे. या भागातील २३०० आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. 'उज्ज्वला गॅस योजना,' महावितरणची 'सौभाग्य योजना' आणि 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आदी शासकीय योजनांचा अनेक नागरिकांना त्यांनी लाभ मिळवून दिला आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी लढा उभारल्याचे सर्वांना ज्ञात आहे. महामार्गावर २०० खाटांच्या अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज रुग्णालयाची मंजुरी मिळवून बांधकामास सुरुवात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. पालघर आणि वसई तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात ते आघाडीवर असून हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या जोडप्यांचे सामूहिक विवाह करण्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असतो. रानभाजी महोत्सवातून शहरी भागातील नागरिकांमध्ये आदिवासींची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यातही त्यांनी मदत केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून येथे शिक्षणाच्या प्रसारासाठी ग्रामीण भागात आठ अभ्यासिका त्यांनी सुरू केल्या आहेत. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला असून बोरशेतीला मोफत फिरता दवाखाना चालवून गरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे.

 

"आजवर बोईसरमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी अजिबात काम केलेले नाही. संतोष जनाठेंसारखी व्यक्ती निवडून आली, तर या मतदारसंघाचे भले होईल."

 

- मंगेश गोंड, सदस्य,

आदिवासी एकता मित्र मंडळ

 

"संतोष जनाठे हे गोर-गरिबांची कामे करतात. रेशन कार्ड, जातीचा दाखला असे छोटे-मोठे प्रश्न जिद्दीने सोडवतात. ते एक चांगली व्यक्ती आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे."

 

-रमेश सावरा,

सदस्य,

शूर छलकारी कातकरी एकता महासंघ

@@AUTHORINFO_V1@@