बंडोबा थंड होईनात : शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचा राजीनामा

    दिनांक  15-Oct-2019 13:46:18


 


नाशिक : जागावाटापाच्या तिढ्यामुळे नाशिक येथे शिवसेनेतील नाराज ३६ नगरसेवक आणि ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेसमोर बंडखोरी थोपवण्याचे आवाहन असताना उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का नाशिकमधून बसला आहे. लोकसभा निवडणूकीतून शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र, ही जागा भाजपला सोडल्याचा मोठा फटका शिवसेनेला आता बसला आहे.

 

शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांनी ३६ नगरसेवकांसह बंड करत विलास शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. युतीचा धर्म पाळावा, असे आवाहन करत पक्षश्रेष्ठींकडून तंबी दिली असतानाही हा प्रकार घडल्याने शिवसेनेला या भागातील हा मोठा धक्का मानला जात आहे. याचा परिणाम नाशिक महापालिका निवडणूकीतही दिसण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, येथील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना या ठिकाणचे बंड थोपण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यापूर्वीच सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा वरीष्ठांकडे सुपूर्द केला. ऐन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.