पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

15 Oct 2019 10:58:09


 

मुंबई : पीएमसी बॅंक खातेधारकांवर अन्याय होऊ देणार नाही. हे प्रकरण जरी आयबीआयच्या अखत्यारीतील असेल तरीही या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी भेट घेऊन यासंदर्भात शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपच्या संकल्पपत्र घोषणेवेळी त्यांनी ही माहिती दिली. 


पीएमसी बॅंक खातेधारकांना आता सहा महिन्यांत ४० हजार रुपये इतकी रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार रुपये इतकी होती. वित्तीय अनियमिततेच्या प्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले होते. यानंतर केवळ एक हजार रुपये प्रत्येक खातेधारकाला काढण्याची मुभा होती. ती मर्यादा आता ४० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

 

बॅंकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. मात्र, ग्राहकांना झालेला मनस्ताप पाहता, रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. बचत आणि चालु अशा दोन्ही प्रकारातील खात्यांसाठी हीच मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, आता बॅंकेतून नव्याने कर्ज मंजूर केली जाणार नाहीत.

 

दरम्यान, बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर संदेश पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यासह बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या सहा महिन्यात त्यावर उपाय योजण्यात येतील असेही आश्वासन बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने दिले होते. बॅंकेने ४० हजारांपर्यंत मर्यादा वाढवल्यानंतर आता एकूण ७७ टक्के ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढता येणार आहे.





 

 

आंदोलनादरम्यान बॅंक ग्राहकाचा मृत्यू

दरम्यान, बॅंकेतील ठेवीदार संजय गुलाठी (वय ५१) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बॅंकेत ठेवीदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या खात्यात एकूण ९० लाख रुपयांची ठेव होती. त्यापूर्वी त्यांची जेट एअरवेजमधील नोकरी गेली होती. सकाळी आंदोलन करून ते घरी परतत होते. त्यानंतर घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

 

जॉय थॉमसने केला होता इस्लामचा स्वीकार

पीएमसी बॅंकेचे माजी व्यवस्थापक जॉय थॉमस याने बॅंकेतील महिला सहकाऱ्याशी निकाह करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला होता. तिच्यासह त्याने पुण्यात १० ठिकाणी संपत्ती खरेदी केली. त्यानंतर त्याने आपले नाव जुनेद खान ठेवले. बॅंकेवर निर्बंध आल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली होती. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. २०१२ पासून त्याने पुण्यात ९ फ्लॅट आणि एक दुकान संयुक्तरित्या दुसऱ्या पत्नीच्या नावे खरेदी केले होते. पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.




 

Powered By Sangraha 9.0