आनंदानुभूती देणारा सुवर्णक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |


 


आता फक्त सावरकरांना 'भारतरत्न' मिळावा म्हणून पाठपुरावा करू, असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. परंतु, लवकरच सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केल्याचा सुवर्णक्षणही येईल आणि सर्वांनाच आनंदानुभूतीचा अनुभव घेता येईल, हे नक्की.


देशाला परकीयांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपल्या घरादाराचा होम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची घोषणा नुकतीच भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातून केली. राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच, सावरकरांना 'भारतरत्न' देण्याचा मुद्दा हाती घेत भाजपने आपण स्वातंत्र्यवीरांच्या गौरवासाठी कटिबद्ध, वचनबद्ध आणि प्रतिज्ञाबद्ध असल्याचे दाखवून दिले. तथापि, भाजपने सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करताच, त्यांना आतापर्यंत हा पुरस्कार का दिला गेला नाही, त्यांच्याआधी कितीतरी अ-पात्रांना हा पुरस्कार दिला गेल्याने त्यांच्या रांगेत सावरकरांना बसवणे योग्य नाही, तसेच 'भारतरत्न'चा विषय जाहीरनाम्यातून मांडण्याचे कारण काय, अशाप्रकारचे कितीतरी प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले. जग हे असेच असते, ते धड घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही, त्यामुळे भाजपच्या घोषणेवर टीका करणाऱ्यांच्या आक्षेपाचा फार गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता नाही.

 

दुसऱ्या बाजूला स्वा. सावरकरांना 'भारतरत्न' देण्याविषयीचा नुसता उल्लेख झाला, तोच काँग्रेसच्या उरल्यासुरल्या सांगाड्याला मिरच्या झोंबल्या. हिंदू संघटनासाठी व हिंदू रक्षणासाठी उभे ठाकल्यामुळे तत्कालीन नेत्यांनी सावरकरांचा द्वेष केला, तसाच तो देशाच्या फाळणीनंतरही केला गेला. त्यात काँग्रेससह, कम्युनिस्ट, समाजवादी सर्वच होते. केवळ राजकीय सूडापायी स्वातंत्र्यानंतर सावरकरांचे नामोनिशाण मिटवण्यासाठी, त्यांना इतिहासजमा करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केले. काँग्रेसच्या कर्त्याधर्त्यांनी पाळलेल्या डाव्या इतिहासकारांनी विद्यापीठांतून, महाविद्यालयांतून सावरकर कधी विद्यार्थ्यांपुढे येणारच नाहीत, यासाठी काम केले. गांधी-नेहरू घराणे आणि त्यांच्या मालकीच्या काँग्रेसला खुश करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातून सावरकरांचे नाव पुसले गेले किंवा येऊच दिले नाही. सोबतच स्वातंत्र्यवीरांची जितकी बदनामी करता येईल, तितकी करण्यासाठी लेखण्याही खरडल्या. 'सावरकर देशद्रोही होते, ब्रिटिशांचे एजंट होते,' हा आशय या सर्वांच्याच लेखणीचा आणि वाणीचा होता. आताही महात्मा गांधींची हत्या व त्यातील सावरकरांचा कथित सहभाग या चावून चोथा झालेल्या बिनबुडाच्या मुद्द्याचा आधार घेऊन काँग्रेसने सावरकरांच्या 'भारतरत्न'ला विरोध केला. काँग्रेसच्याच सुरात सूर मिसळत एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनीही स्वा. सावरकरांना 'भारतरत्न' दिला जाऊ नये, म्हणून आपला वकिली मेंदू चालवला. भलतेसलते, खोटे-नाटे आरोप करून सावरकरांचा मानभंग करणे, हाच या लोकांचा एककलमी कार्यक्रम आणि ते हेच करणार. पण, ही तर फक्त सुरुवात आहे, ज्यावेळी प्रत्यक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' जाहीर होईल, त्यावेळी सर्वच विरोधकांच्या, निंदकांच्या बुडाला आग लागलेली असेल. परंतु, देशभक्तांना आणि सावरकरानुयायांना मात्र निरतिशय आनंदच वाटेल, जसा तो आताही वाटत आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी काम करणार, ही भाजपची घोषणा त्या पुरस्काराचाच सन्मान करणारी आहे. कारण, आतापर्यंत अपवाद वगळता कसल्या कसल्या रत्नांना 'भारतरत्न' ठरवले गेले, हे सर्वांपुढे आहेच. त्यात स्वतःच स्वतःला 'भारतरत्न' देणाऱ्या इसमापासून कित्येकांचा समावेश आहे. काँग्रेसची खुशमस्करी करणाऱ्या अनेकांना 'भारतरत्न' तर खिरापतीसारखा वाटला गेला. ज्यांची तेवढी योग्यता नाही, त्यांना केवळ गांधी घराण्याप्रतिच्या एकनिष्ठतेमुळेही 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. परंतु, गेल्या काही वर्षांत 'भारतरत्न' पुरस्काराची प्रतिष्ठा राखली जाईल, अशांनाही तो पुरस्कार दिला जाऊ लागला. पंडित मदनमोहन मालवीय, अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख यांसारख्या महनीय व्यक्तींना 'भारतरत्न'ने सन्मानित केले गेले. आता तर भारतमातेला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी हयात घालवणाऱ्या थोर सुपुत्रालाच हा पुरस्कार देण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या. सावरकरांच्या देशभक्तीबद्दल शंका घेणाऱ्या, त्यांच्याविरोधात लेखच्या लेख लिहिणाऱ्या, वृत्तवाहिन्यांवर चर्चा करणाऱ्या सडक्या मनोवृत्तीच्या पिलावळींना चपराक लगावणारी जशी ही घटना तशीच वर्षानुवर्षे बदनामीच्या अग्नीपरीक्षेतून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या तेजोनिधीचा सन्मान करणाराही हा प्रसंग.

 

आता सावरकरांच्या 'भारतरत्न'चा विषय जाहीरनाम्यात का आणला, यामागेही काही कारणे निश्चितच आहेत. काँग्रेसादी पक्षांनी व त्यांनी पोसलेल्या अभ्यासक-विचारवंतांनी नेहमीच सावरकरविरोधी भूमिका घेतली. जनतेच्या मनातही सावरकरविरोधाचा विखार कालवण्याचे त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न केले. काँग्रेसशासित राज्यांनी आपापल्या शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमातून सावरकरांचे नाव वगळण्याचे किंवा त्यांच्या नावापुढील 'स्वातंत्र्यवीर' हा शब्द गाळण्याचे, राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान करण्याचे किंवा मणिशंकर अय्यर यांनी अंदमानच्या कारागृहातील सावरकरपंक्ती काढून टाकण्याचे काम, हा त्यातला अलीकडला प्रयत्न. जनता मात्र सावरकरांची देशभक्ती आणि मातृभूमीसाठी त्यांनी केलेला असीम त्याग जाणते. तसेच लोकशाहीत जनता सार्वभौम आहे, असे म्हणतात. म्हणूनच त्या जनतेसमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्याचा विषय मांडायचा आणि त्यावर जनतेकडूनच मोहोर उमटवून घ्यायची, वाजत-गाजत आणि सर्वसाक्षीने सावरकरांचा 'भारतरत्न' सन्मानाने गौरव करायचा, असे जाहीरनाम्यातील घोषणेमागचे कारण असू शकतो. त्यातून सावरकर विस्मरणात जावेत म्हणून राबणाऱ्या किडक्या मनोवृत्तींना जशी अद्दल घडेल, तशीच तुमच्या आरोपबाजीनंतरही सावरकरांचे नाव जनतेच्या मनामनात जिवंत असल्याचे ते निदर्शकही असेल. म्हणजे जनतेच्या दरबारातच सावरकरविरोधक पराभूत होतील, तर स्वातंत्र्यवीर सावरकर अढळस्थानी विराजमान होतील. म्हणूनच जाहीरनाम्यात सावरकरांच्या 'भारतरत्न'चा विषय मांडण्यावरून चुकीचा अर्थ घेण्याची गरज नाही. उलट अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांनी या घोषणेचे स्वागत करायला हवे. आता फक्त सावरकरांना 'भारतरत्न' मिळावा म्हणून पाठपुरावा करू, असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. परंतु, लवकरच सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केल्याचा सुवर्णक्षणही येईल आणि सर्वांनाच आनंदानुभूतीचा अनुभव घेता येईल, हे नक्की.

@@AUTHORINFO_V1@@