नितेश राणेंनी नारायण राणेंकडून 'हा' गुण घ्यावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

    दिनांक  15-Oct-2019 14:46:23
कणकवली : नितेश राणे हे एक आक्रमक नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी ते सदैव पुढाकार घेऊन बोलतात. मात्र, बऱ्याचदा त्यांचा संयम ढासळतो, तो त्यांनी नारायण राणे यांच्याकडून शिकावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नितेश राणे एक आक्रमक नेते आहेत. राजकारणात याची गरजही आहे. मात्र, संयम बाळगणेही तितकेच महत्वाचे असून भाजपमध्ये आल्यावर तो गुण त्यांच्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कणकवलीतील नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी कोकणात जाणार असल्याची माहिती दिली होती. ठरल्याप्रमाणे खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमन पक्षाचे अधिकृतरित्या भाजपमध्ये विलिनीकरण करण्यात आले. खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

 

माजी खासदार निलेश राणे, भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कोकणच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. ते म्हणाले, "इथल्या भूमीपुत्रांना मुंबई-पुण्याकडे रोजगार मिळवण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही. सिंधुदुर्गात पर्यटनाच्या दृष्टीने आगामी सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लावणार आहोत.", असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

महत्वकांशी सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन वर्षात मार्गी लावू, असेही ते म्हणाले. यावेळी खासदार नारायण राणे यांनी भाजपप्रवेशाबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. भाजपत येत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता विकासकांमध्ये हातभार लावण्याचा निर्धार मी केला असल्याचे ते यावेळी म्हणाले.