बरोरा की दरोडा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



शहापुरात रंगणार दुरंगी लढत

 

शहापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार रंगात आला आहे. काही दिवसांवरच मतदान येऊन ठेपले असल्याकारणाने भर उन्हात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल व दुर्गम भाग असलेला तालुका म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा तालुका मोठा. अशा या शहापूर तालुक्यात जवळपास अडीच लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे कायम प्राबल्य राहिले आहे. यावेळी या विधानसभा क्षेत्रात विलक्षण हालचाली घडल्या आहेत. राष्ट्रवादीकडून पाच वर्षे आमदार राहिलेले पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर शिवसेनेकडून १५ वर्षे आमदार असणारे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते आता आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडी, माकप आणि अपक्ष असे मिळून एकूण सात उमेदवार या विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमवत आहेत.

'मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका' म्हणून शहापूर तालुक्याची ओळख. परंतु, पाणीटंचाईची भीषण समस्या या तालुक्यात निर्माण झाली आहे. शेकडो गावे, पाडे आजही येथे हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करीत आहे. तसेच या तालुक्यात पुरेशा प्रमाणात औद्योगिकीकरण झाले नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात आताच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने जि.प.च्या १४ जागांपैकी नऊ व पं.स.च्या २८ पैकी १८ जागा जिंकत तालुक्यात वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपनेही या निवडणुकीत ३० हजार मते वाढवण्याची लक्षणीय कामगिरी केली होती. राष्ट्रवादीने या निवडणुकीत जि.प.च्या पाच, तर पं.स.च्या सहा जागा निवडून आल्या होत्या. पण मधल्या काळात पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील राजकीय गणित बदलले आहे. एकंदरीत आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे शिवसेना-भाजप आणि मित्रपक्ष यांच्या महायुतीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचे पारडे सध्यातरी जड आहे. सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दौलत दरोडा यांना ५१ हजार, २६९ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात असलेले पांडुरंग बरोरा यांनी ५६ हजार, ८१३ मते मिळवत शिवसेना उमेदवार दौलत दरोडा यांचा ५ हजार, ५४४ मतांनी पराभव केला होता. यावेळी दोघांमध्ये चुरस वाढली असली, तरी भाजप आणि मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे यावेळी महायुतीचा भगवा शहापूर विधानसभेवर फडकणार, असे चित्र दिसत आहे.

- प्रशांत गडगे

@@AUTHORINFO_V1@@