पेणमधील शेकापचा बालेकिल्ला ढासळणार?

15 Oct 2019 21:48:21



पेण-पाली विधानसभा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, भाजपचे रविशेठ पाटील यांनी पेण-पाली विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर राजकीय मैदानात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार उभे असले तरी खरी लढत ही पेण-पाली विधानसभा मतदारसंघात दोनदा विजयी झालेले शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व भाजप-सेना महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्यातच आहे. मागील निवडणुकीत शेकापचे धैर्यशील पाटील यांना ६४ हजार, ७१६ मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे व आताचे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांना ६० हजार, ४९४ मते मिळाली होती. सन २०१४ मध्ये शेकापचे धैर्यशील पाटील यांनी दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला होता. परत विजय मिळविण्याचा निर्धारच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना हॅट्ट्रिक करून न देण्याचा निर्धार भाजप, शिवसेनेच्या युतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

मागील निवडणुकीत शिवसेना, भाजप, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे स्वतंत्र उमेदवार होते. त्यावेळी शेकापचे धैर्यशील पाटील यांनी ६४ हजार, ७१६ मते, तर काँग्रेसला ६० हजार, ४९४ मते व सेनेचे किशोर जैन यांना ४४ हजार २५७ मते, तर भाजपचे राम घरत यांना नऊ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे संजय जांभळे यांनी ११ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. सध्या राज्यातील महायुतीच्या सरकारवर जनता समाधान व्यक्त करीत असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण-पाली विधानसभा मतदारसंघात चांगलेच मताधिक्य मिळविले होते. महायुतीचे उमेदवार भाजपचे रविशेठ पाटील यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात रंगल्याचे दिसत आहे. त्यातच काँग्रेस शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीत फूट पाडण्यात रविशेठ पाटील यशस्वी झाले असून काँग्रेसचे दिग्गज नेते कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपचे प्रचार कार्य करताना दिसून येत आहेत. रविशेठ पाटील यांच्या सध्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांना होईल, अशीही चर्चा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार नाही.

 

विरोधकांकडून भाजपचा प्रचार

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने युतीच्या कार्याकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी १०० कोटींची मालमत्ता जाहीर केल्याने या मतदारसंघात मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, धर्माजी शेठ पाटील आदी नेते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपचे रविशेठ पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यरत आहेत. लोकसभेच्या वेळी महा आघाडीचे खासदार सुनील तटकरे यांचा प्रचार करणारे नगरसेवक दीपक गुरव निवृत्ती पाटील, तेजस्विनी मंगेश नेने आपल्या समर्थकांसह या वेळी 'कमळ' निशाणीचा प्रचार करताना दिसत आहेत.

 

- आनंद जाधव

Powered By Sangraha 9.0