देवळाली मतदारसंघात शिवसेनेपुढे बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान

    दिनांक  15-Oct-2019 21:23:08   महायुतीचे उमेदवार योगेश घोलप यांची प्रतिष्ठा पणाला


नाशिक शहरातील देवळाली विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. देवळाली म्हणजे शिवसेना नेते बबनराव घोलप यांचा मतदारसंघ अशी ओळख या मतदारसंघाची आहे. त्यामुळे येथून आजवर निर्विवादपणे शिवसेनेचा उमेदवार आजवर विजयी झाला आहे. या मतदारसंघातून बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. यंदादेखील ते भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार सध्या रिंगणात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत असली, तरी वंचित बहुजन आघाडीही दोघांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

महापालिके अडीच प्रभाग आणि ६५ गावे मिळून तयार झालेल्या देवळाली मतदारसंघामध्ये मागील तीन दशकांपासून शिवसेनेच्या गळ्यात आमदारकीची माळ पडत आहे. मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडीने गौतम वाघ यांच्या रूपाने उमेदवार दिल्याने दलित मते ही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिद्धांत मंडाले हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि वक्तव्यांवर नाशिककरांनी लोकसभेतदेखील विश्वास न दाखविल्याने ते काय करिष्मा दाखवतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सरोज अहिरे या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यांचे वडील बाबुलाल अहिरे हे आमदार म्हणून निवडून आल्याचा अहिरे यांना उपयोग होणार का, हे येणारा काळच सांगू शकेल. शिवसेनेकडून आमदार योगेश घोलप शिवसेनेकडून पुन्हा मैदानात उतरले आहेत. सलग ३० वर्षे मतदारसंघात सत्ता असल्याने घोलप यांचा विजय निश्चित मानला जात आहे. देवळाली मतदारसंघात नाशिक साखर कारखाना आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यात येथे उमेदवारांना आजवर अपयश आल्याचे दिसून येते. देवळाली मतदारसंघ आजही शाश्वत विकासाच्या प्रतीक्षेत असून पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प यांची येथील मतदारांना प्रतीक्षा आहे.

 

मतविभागणी होण्याची शक्यता कमीच

 

देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे विविध पक्षांनी आलटून पालटून उभे केले आहेत. त्याचा लाभ आजवर केवळ घोलप यांनाच होत गेला, असे मागील ३० वर्षांमध्ये दिसून आले आहे.

 

असे बदलले देवळालीचे समीकरण

 

सर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा आजवर देवळाली मतदारसंघाचा प्रवास झाला आहे. १९७४ पर्यंत नाशिक - देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. मात्र, १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रुपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले आहे. १९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे भिकचंद सदोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले होते. १९९० साली युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले. आणि तेव्हापासून या मतदारसंघात शिवसेनेचे धनुष्य कायम घोलप कुटुंबीयांनीच हाती धरले आहे.