कुलाब्यातून ४० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



कुलाबा... मुंबईचे दक्षिण टोक. महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र, देशाचे आर्थिक केंद्र, पश्चिम किनारपट्टीवरील भारताचे नौसेना केंद्र, भारतातील अव्वल वैज्ञानिकांचे केंद्र, अतिशय उच्चभ्रू वस्ती ते प्राचीन कोळीवाडे, चाळी आणि ब्रिटिशकालीन इमारती, अनेक कंपन्यांचे प्रशासकीय केंद्र. एका बाजूला उत्तम बंदर, दुसऱ्या बाजूला उत्तम समुद्रकिनारा...मुंबईतील महत्त्वाच्या व्यापारी पेठेचा भाग याच मतदार संघात येतो. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट अशी दोन्ही महत्त्वाची रेल्वेस्थानके इथेच आहेत. मुंबईतील काही प्राचीन आणि मोठी मैदाने, वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमसारखी क्रीडांगणे येथेच आहेत. गेली कित्येक वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ. भाजपचे मुख्य प्रतोद राज के. पुरोहित यांचा हा परंपरागत मतदार संघ. त्यांनी विविध कार्यक्रमांच्या सातत्याने बांधून काढलेला. यावेळी येथून भाजपने अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य असलेल्या राहुल नार्वेकर यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन अखेरच्या क्षणी उमेदवारी घोषित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. बहुभाषिक आणि बहुधार्मिक असलेला हा मतदारसंघ राहुल नार्वेकर जिंकतील का, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना असला तरी अ‍ॅड. राहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांना विजयाचा आत्मविश्वास आहे.

 

शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या राहुल नार्वेकर यांचे सासरे म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर. साहजिकच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला. राहुल नार्वेकर गेली तीन वर्षे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे बंधू अ‍ॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक आहेत. गेली काही वर्षे राहुल हे भाजपचे निकटवर्तीय गणले जात होतेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना या मतदारसंघात विजय मिळेल, असे वाटते आहे. गेली कित्येक दशके दक्षिण मुंबईत भाजपने मराठी भाषिक स्थानिक उमेदवार दिला आहे. राज के. पुरोहित यांच्याप्रमाणेच राहुल नार्वेकरदेखील उच्चशिक्षित वकील आहेत. शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजप. या विविध पक्षप्रवासाबद्दल विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले की,"आज देशातील प्रत्येक तरुणाला भाजपशी जोडून घायचे आहे, कारण आश्वासक, कर्तृत्ववान आणि दूरदर्शी नेतृत्व केवळ भाजपकडेच आहे. दुसरी गोष्ट भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. या पक्षासारखी शिस्त आणि कार्यक्षम यंत्रणा दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही. भाजपचे कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे," असे ते म्हणाले. "भारतीय जनता पक्ष हा अत्यंत राष्ट्रवादी पक्ष आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार करून केवळ राष्ट्रहिताचा निर्णय घेणारा हा पक्ष आहे. या पक्षाचे नेतृत्व अभूतपूर्व आणि मजबूत आहे. भाजप तत्त्वाशी कधी तडजोड करत नाही. राष्ट्र उभारणीसाठी (नेशन बिल्डिंगसाठी) या पक्षाने सत्तेत राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे देशातील तरुणाईचे मत आहे. इतर पक्ष आणि भाजपमध्ये हा प्रमुख फरक आहे की, भाजपमध्ये स्वतः व्यक्ती आणि पक्षापेक्षा देश मोठा मानला जातो. साहजिकच या पक्षाबरोबर काम करावे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. दुसरी गोष्ट मी राजकीय कारकीर्द हिंदुत्ववादी पक्षातून सुरू केली आहे. त्यामुळे मी हिंदुत्वापासून फार काळ दूर राहणे शक्य नव्हते. मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे हे एक प्रमुख कारण आहे."

 

"खासकरून दक्षिण मुंबईचे कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात? आणि ते कसे सोडवणार?" या प्रश्नावर राहुल म्हणाले की,"मुंबईत आजच्या घडीला पायाभूत सुविधांचा प्रश्न मोठा आहे. वाढती लोकसंख्या, त्यासाठीच्या सुविधा ही मोठी समस्या आहे. मुंबई मनपाची पाणीपुरवठा क्षमता केवळ ९० लाख लोकांना पाणी पुरविण्याची असताना आज जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे जवळपास पावणेदोन कोटी लोकांना पाणीपुरवठा करावा लागतोय. मुंबईत वाहतुकीची समस्या मोठी आहे. कुलाबा विधानसभेच्या ए, बी आणि सी वॉर्डमध्ये मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींची समस्या गंभीर आहे. या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाकडे आणि दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या कामी आज पुरेसा निधी उपलब्ध नाही. शासनाकडून जास्तीत जास्त निधी या जुन्या इमारतींच्या समस्येसाठी उपलब्ध करून घेणे, हे एक मोठे काम असणार आहे. त्याचबरोबर इमारतींचा पुनर्विकास होत असतानाच्या काळात चांगल्या दर्जाचे संक्रमण निवास देणे आवश्यक आहे. दोन किंवा तीन वर्षांत पुनर्विकास पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. गरज पडल्यास कायद्यात बदल करून हे घडवून आणणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे, असे मला वाटते."

 

"या भागात क्लस्टर डेव्हलपमेंट आवश्यक वाटते का?," असे विचारता ते म्हणाले की,"दूरगामी विचार केला तर क्लस्टर डेव्हलपमेंट आवश्यक आहे. पण त्यासाठी सर्वांचे सहकार्यही आवश्यक आहे. भाडेकरू आणि मूळ मालकांमधले वाद संपविण्याची इच्छा असेल तरच हे शक्य आहे आणि मग पुनर्विकास कोणी थांबवू शकत नाही." "हा बहुभाषिक, बहु सांस्कृतिक सर्व प्रकारचे नागरी वर्ग असलेला भाग आहे. या भागात कोणती राजकीय आव्हाने आपल्यासमोर आहेत?," असे विचारता राहुलजी म्हणाले की, मला तर कोणतेही राजकीय आव्हान समोर दिसत नाही. याचे कारण सांगताना ते म्हणाले की,"या निवडणुकीत तीन प्रमुख उमेदवरांपैकी केवळ मी एकटा स्थानिक उमेदवार आहे. गेली सव्वाशे वर्षे आम्ही या परिसरात राहत आहोत. कुलाब्यातील राजकीय आणि सामाजिक कामात आम्ही नेहमी अग्रेसर राहिलो आहोत. इथे माझे बंधू आणि वहिनी नगरसेवक आहेत. मी स्वतः गेली चार साडेचार वर्षे काम केले आहे. स्थानिक विषयांची आम्हाला माहिती आहे. स्थानिक लोकांची ओळख आहे आणि आम्ही स्थानिक ठिकाणी लोकांसाठी गेल्या चाळीस वर्षांत केलेली कामे लोकांनी पाहिलेली आहेत. याशिवाय देशात आणि राज्यात असलेली भाजपची लाट याही विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे किमान चाळीस हजार मताधिक्क्याने मी निवडून येईन, असा मला विश्वास आहे."

 

"भाजपच्या एका ताकदवान नेत्याचे तिकीट कापून तुम्हाला उमेदवारी दिली गेली आहे. गेली कित्येक वर्षे ते इथून आमदार होते. त्यांची नाराजी आहे का? आणि असेल तर त्या पक्षांतर्गत नाराजीचा फटका तुम्हाला निवडणुकीत बसणार का?," असे विचारता राहुलजी म्हणाले की, "ते (राज के पुरोहित) नाराज आहेत, असे मला वाटत नाही. माझ्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. साहजिकच इतकी वर्षे त्यांनी इथे काम केलेले असताना त्यांच्या जागी मला उमेदवारी मिळाल्याने त्यांना धक्का बसला असेल, निश्चित, पण तरी ते प्रचारात माझ्यासोबत सक्रियपणे उतरले आहेत." अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या प्रचाराचा शिस्तबद्ध धडाका पाहिला आणि ज्या वेगाने त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित केला आहे, ते पाहिले तर समोर काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासारखा तगडा उमेदवार असतानाही नार्वेकर यांच्या विजयाची खात्री कुणीही राजकीय निरीक्षक सहज देईल. भाई जगताप स्थानिक उमेदवार नाहीत. खेतवाडी हा त्यांचा परंपरागत मतदार संघ होता. तो मतदार संघ आता मुंबादेवी आणि मलबार हिल या दोन मतदार संघात विभागून व्हिलन करण्यात आला आहे. त्यातून अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे अ‍ॅड. राहुल नार्वेकर किती मताने विजयी होतात, याचीच आता उत्सुकता असेल.

 

- राजेश प्रभु-साळगांवकर

@@AUTHORINFO_V1@@