करू संवर्धन 'सॉफिश'चे

    दिनांक  14-Oct-2019 11:50:52'सॉफिश'ची माहिती देण्यासाठी 'सीएमएफआर'चे मच्छीमारांना आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) - सागरी परिसंस्थेतील संकटात सापडलेल्या प्रजातींमध्ये ’सॉफिश’ म्हणजेच ’करवत’ माशाचा समावेश होतो. १७ ऑक्टोबर हा 'आंतराराष्ट्रीय सॉफिश दिन.’ संकटग्रस्त प्रजातींमधील ’सॉफिश’ या माशासंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीक्षेत्रात या माशाचा वावर आढळतो. मात्र, त्याविषयी फार मोजकीच माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ’केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे’ने (सीएमएफआरआय) या माशासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी मच्छीमारांना आवाहन केले आहे. 
 
 
 
 'सॉफिश’ हा मासा त्याच्या तोंडासमोर असणाऱ्या करवतीसारख्या लांब शरीराच्या भागामुळे ओळखला जातो. करवतीसारख्या या भागावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी २५ ते २९ दात असतात. या दातांचा वापर तो स्वरक्षणाबरोबरच खाद्याला मारण्यासाठी करतो. शार्क, रे आणि गिटारफिश या गटातील मत्स्यप्रजातींमध्ये ’सॉफिश’चा समावेश होतो. यांच्या शरीरातील हाडांची रचना ही ’कार्टिलेज’ची असते. प्रमाणाबाहेर सुरू असलेली मासेमारी आणि वाढीसाठी आवश्यक असलेला अधिवास नष्ट होत असल्यामुळे ’सॉफिश’च्या प्रजननावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच त्यांचा करवतीसारखा भाग बोटीच्या पंख्यात अडकल्याने किंवा मासेमारीच्या जाळ्यात गुरफटल्याने प्रसंगी त्यांचा मृ्त्यू होतो. शिवायसॉफिश हे मासे जन्मानंतर दहा वर्षांनी प्रजननक्षम होतात. परिणामी त्यांच्या प्रजननाचा दरही कमी आहे. या सर्व कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून या माशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट झाली असून हा दर ९५ टक्के आहे.
 
 


 
 

’सॉफिश’ची पिल्ले जन्मास आल्यानंतर सुरुवातीच्या काळात कांदळवनांमध्ये अधिवास करतात. शिकार्‍यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ते कांदळवनांच्या आसर्‍याला असतात. मात्र, कांदळवन नष्ट होत असल्याने त्याचा फटका या माशांच्या अधिवासाला बसला आहे. सद्यपरिस्थितीत ’युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेनेजगभरात आढळणार्‍या पाच प्रजातीच्या ’सॉफिश’ना संकटग्रस्त किंवा अतिसंकटग्रस्त प्रजातींच्या यादीत स्थान दिले आहे. तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये या माशाला प्रथम क्षेणीत संरक्षण देण्यात आले आहे. ’सायटीस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने २००७ साली ’सॉफिश’ला संरक्षण देऊन तिच्या करवतीसारख्या भागाच्या जागतिक तस्करीवर निर्बंध आणले.महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात या माशाच्या तीन प्रजाती आढळतात. राज्यात २०१७ मध्ये विजयदुर्गच्या खाडीत मासेमारीच्या जाळ्यात ’सॉफिश’ अडकला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये या माशाचे दर्शन झालेले नाही. राज्यात ’सॉफिश’चा संवर्धन प्रकल्प राबविण्यासाठी या जीवाविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे’केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्था’ (सीएमएफआरआय) या माशासंदर्भात असलेली माहिती देण्यासाठी मच्छीमारांना आवाहन केले आहे. ’सॉफिश’बाबत कोणत्याहीप्रकारची माहिती असल्यास मच्छीमारांनी मुंबईतील वर्सोवा येथे असलेल्या ’सीएमएफआरआय’ संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे शास्त्रज्ञ के.व्ही.अखिलेश यांनी केले आहे.