दहशतवाद्यांना संपवले, आता दहशतवादी विचारांचा खात्मा करणार

    दिनांक  14-Oct-2019 13:37:25


 


नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तान भारताविरोधात कुरापती सुरू ठेवत असताना दहशवाद हा तिथल्या व्यवस्थेचा एक हिस्सा बनवत चालला आहे. सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला. 

 

ते म्हणाले, "पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. याचा वापर भारताविरोधात करत आहेत. तिथल्या भूमीवरून पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आम्हाला यश आले आहे. मात्र, त्यातले पुढील पाऊल हे पाकिस्तानसारख्या देशांच्या दहशतवादी विचारांना संपवणे हे असेल.", असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


 

 

"भारत हा दहशतवादाशी गेली कित्येक दशके लढत आहे. दहशतवादाविरोधात लढा ही पूर्वीपासूनच आपली विचारधारा आहे. दहशतदाशी तुम्ही थेट लढू शकत नाही. तुम्ही केवळ त्यांना प्रतिकार करू शकता. ज्यावेळी हल्ला होतो. त्यावेळीच तुम्ही त्यांना हेरू शकता. मात्र, आता एक पाऊल पुढे जाऊन आम्हाला काम करायचे आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करून हत्यारे संपवणे, दहशतवादाला दिला जाणारा पैसा रोखणे, अशी कामे आमच्या रडारवर असणार आहेत.", असेही ते म्हणाले.