प्रचारापुर्वी उमेदवारांना घ्यावी लागणार 'हि' काळजी

12 Oct 2019 18:19:34



सर्व माध्यमांवर लक्ष केंद्रीत करुन कामकाज करावे, अशा सूचना

मुंबई, दि.12 – विधानसभा निवडणूकीतंर्गत सोशल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उमेदवाराला प्रचार करण्यापूर्वी प्रचाराचा मजकूर/सीडी माध्यम प्रमाणिकरण समितीच्या मार्फत प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक असते, अन्यथा संबंधिताविरुध्द कारवाई होऊ शकते. त्यामुळे माध्यम प्रमाणिकरण व सनियत्रंण समितीने (एम.सी.एम.सी.) सर्व माध्यमांवर लक्ष केंद्रीत करुन कामकाज करावे, अशा सूचना राज्यस्तरीय एम.सी.एम.सी. समितीचे सदस्य तथा अपर जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांनी दिल्या. माध्यम कक्षात भेट दिली त्या वेळी ते बोलत होते. 


प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाद्वारे, (फेसबुक, ट्वीटर, यु ट्युब, इन्स्टाग्राम ) यावर जर काही आक्षेपार्ह मजकूर प्रसिध्द झाला असल्यास समितीने तपासावे त्यावर त्वरीत निर्णय घेवून कार्यवाही करावी. प्रत्येक उमेदवारांचे त्यांचे प्रतिनिधी यांच्या मार्फत येणारे प्रचार साहित्य एम.सी.एम.सी. समितीने तातडीने पाहून वेळेत प्रमाणपत्र दयावे. त्याचा अहवाल नियमितपणे द्यावा. वृत्तपत्रातील बातम्या, जाहिराती याकडेही विशेष लक्ष द्यावे असेही श्री. गवळी यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई शहर जिल्हयांतर्गत 10 विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापना करण्यात आलेल्या मध्यवर्ती माध्यम कक्षास श्री गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली आणि समाजमाध्यमांच्या अहवालाची तपासणी केली. यावेळी माध्यम कक्ष समन्वयक प्रमुख डॉ. राजू पाटोदकर माध्यम कक्षाचे अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, रविंद्र पाटील, राकेश चंदेल, काशीबाई थोरात मुकुल देसाई तसेच माध्यम कक्षातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0