'बाला' चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

    दिनांक  11-Oct-2019 15:45:38आयुषमान खुरानाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ट्रेलरने प्रेक्षकांना भरपूर हसवले त्यानंतर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये आयुषमान खुराना आणि त्याचे कुटुंबीय त्याला टक्कल पडू नये यासाठी नानाविध उपाय सुचवताना दिसत आहेत. आणि आयुषमान अर्थात चित्रपटातील बालाकडे आवडो किंवा न आवडो ते उपाय करण्यापलीकडे गत्यंतर नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसत आहे.
'समस्या एक, उपाय अनेक' असे म्हणत आयुषमानने हे पोस्टर सोशल मीडियावरून शेअर केले आहे.

अमर कौशिक दिग्दर्शित 'बाला' या चित्रपटात आयुषमान बरोबरच भूमी पेडणेकर, यामी गौतम, जावेद जाफरी, सीमा पाहवा आणि अभिषेक बॅनर्जी हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. दिनेश व्हिजन यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या ७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे.