'बाला' चा बाल्ड आणि ब्युटीफुल ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक  10-Oct-2019 15:45:54बोल्ड आणि ब्युटीफुल ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते पण बाल्ड म्हणजेच टक्कल पडलेल्या माणसावर सगळे जण हसतात. अशाच बाला नावाच्या माणसाची भूमिका अयुषमान खुराना त्याच्या
'बाला' या चित्रपटात साकारणार आहे. त्याचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आयुषमान कायमच त्याच्या हटके चित्रपटांसाठी चर्चेत राहिला आहे आणि हा चित्रपट त्याच्या या चर्चेला पुन्हा एकदा रंगात आणेल हे या ट्रेलरवरून प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल.

सुरुवातील आपल्या घनदाट आणि मुलायम केसांवर प्रचंड प्रेम आणि अभिमान बाळगणाऱ्या बाला नावाच्या या व्यक्तीला असे लक्षात येते की खूप कमी वयातच त्याचे केस झाडायला लागले आहेत आणि टक्कल पडायला सुरुवात झाली आहे. अशावेळी साहजिकच या समस्येतून मार्ग काढण्याचे तो अनेक अतरंगी प्रयोग करतो. कित्येक डॉक्टरांकडून औषधे, भोंदू बाबांकडून तेल, लेप असे अनेक उपाय तो करून पाहतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. या सगळ्यात त्याला मुलींविषयी असलेले आकर्षण हा देखील एक मुद्दा डोकावतो. अशा या प्लॉटवर 'बाला' या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. या ट्रेलरमध्ये देखील याचीच एक छोटी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

अमर कौशिक दिग्दर्शित 'बाला' या चित्रपटात आयुषमान खुराना मध्यवर्ती भूमिकेत असला तरी भूमी पेडणेकर, यामी गौतम, सीमा पाहवा, सौरभ शुक्ला हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. दिनेश व्हिजन यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. बाला हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.