निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

    दिनांक  01-Oct-2019 16:08:29पालघरमध्ये १३ कोटींचा मुद्देमाल जप्त


पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हिंदुस्थान ढाब्यानजीक तीन बंदुका, अंमली पदार्थ आणि काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. एकूण १३ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल मनोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र व अंमली पदार्थांच्या साठा सापडल्यामुळे पालघर परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी ही माहिती दिली.

 

मुबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील हिंदुस्तान ढाबा परिसरात एक टोळी शस्त्र, दारुगोळा व अमलीपदार्थ यांची विक्री कारण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून हिंदुस्थान ढाबा परिसरात दोन व्यक्तींची कसून झडती घेतली. या दोघांकडे प्लास्टिकच्या भरलेल्या दोन गोणी आढळून आल्या. यामध्ये तीन प्रतिबंधीत केलेले गावठी बनावटीच्या बंदुका, गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर, एकूण ६३ जीवंत काडतुसे, किलो नऊशे ग्राम इफेड्रीन, किलो पाचशे ग्रामचे डीएमटी, पाचशे ग्राम ब्राऊनशुगर, तीन किलो नऊशे ग्रामचे डोडो मार्फीन आदी मादक द्रव्य, मोबाईल, असा एकूण तेरा कोटी साठ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधारांच्या शोधासाठी विविध पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. गुन्हेगारांचा पूर्णतः बिमोड करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले.