गांधीजींची अहिंसा व सत्य आजच्या संदर्भात

    दिनांक  01-Oct-2019 18:55:13   पोरबंदरचे मोहनदास करमचंद गांधी विश्वस्तरावर 'महात्मा' म्हणून अमिट छाप उमटवतात, तेव्हा त्यांनी अंगीकारलेल्या सत्य आणि अहिंसा व्रताचे महत्त्व शब्दातीत, अमूल्य होते. सत्य आणि अहिंसेची ताकद मोहनदास करमचंद गांधी नावाच्या भारतीयाला कोट्यवधी दुर्बलांचे आशास्थान, प्रेरणास्थान बनवते. गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सत्य व अहिंसेचे आजचे परिमाण शोधताना घेतलेला आढावा...


अगदी एकटा जरी उरलो, तरी कारण, तेच सगळ्यात शक्तिदायक साहस आहे. ज्याच्यासमोर अणुबॉम्बदेखील निष्प्रभ होतो." महात्मा गांधींचे सुवचन. अर्थात, मोहनदास करमचंद गांधी हे 'महात्मा' असल्याने ते सत्य आणि अहिंसेवर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि नंतरही दृढ राहू शकत होते. सत्य व अहिंसा ही दोन मूल्ये मानवी जीवनाच्या उत्थानासाठीचा प्रेरकबिंदू आहेत, हे मात्र गांधीजींच्या सत्याचे प्रयोग असलेल्या जीवनचरित्रावरूनही प्रकट होतच आहे. 'सत्य' आणि 'अहिंसा' हे शब्द ऐकले की, महात्मा गांधींचे नाव येतेच येते. याचाच अर्थ गांधीजी कोट्यवधी दीन-दुबळ्यांच्या केलेल्या सेवेला ईश्वर मानायचे आणि त्या ईश्वरालाच सत्य मानायचे. या सत्याचे पूजन ते अहिंसेच्या तत्त्वाने करायचे. या सत्याच्या कल्पनेबद्दल गांधीजींची मते ठाम होती. सत्य व अहिंसा ही मूल्ये भारतीय धर्मसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. याबद्दल त्यांना सार्थ आनंद आणि अभिमान होता. एकदा व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन म्हणाला की, "सत्य ही संकल्पना युरोपमधून भारतामध्ये आली." यावर गांधीजी संतप्त झाले. ते म्हणाले, "तुमचा विचार चुकीचा आहे. भारतामध्ये सत्याची प्रतिष्ठा प्राचीन काळापासून आहे. सत्याला परमात्म्याचे रूप मानले जाते." लहानपणी गांधीजींनी राजा हरिश्चंद्राची कथा ऐकली होती. नेहमी सत्यवचन बोलणाऱ्या राजा हरिश्चंद्राचे सत्यप्रेम गांधीजींच्या विचारजीवनाचे ध्येय झाले. मात्र, गांधीजींनी आयुष्याची महत्त्वाची आयुधे आणि सोबती मानलेल्या सत्य आणि अहिंसेचे सध्याच्या युगात काय महत्त्व असेल बरे? असा विचार जरी मनात आला तरी लगेच अनाहूतपणे उत्तर येतेच येते. सध्या कलियुग आहे. कुठे राहिली आहेत ती मूल्ये? आणि कुठे राहिली आहेत गांधीजींची वचने? आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करता वाटतेच की, होय, सध्याच्या युगात गांधीजींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेचे काही खरे नाही. राजकारणाची बजबजपुरी, स्वार्थी, कूपमंडूक प्रवृत्तीने बरबटलेल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचे अनीतिपूर्ण वर्तन यामुळे सत्य आणि अहिंसा विलुप्त झाल्यासारखे वाटते. मात्र, तरीही काळोख्या रात्रीत हलकेच सूर्योदयाचा पहिला किरण अलगद उमलावा, तसे सध्या जगाच्या पटलावर चालले आहे. निराशेच्या गर्तेत आशेच्या पाऊलखुणा सहजच उमटत आहेत. याचे कारण गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या संकल्पना या मेल्या नाहीत, तर त्या कोट्यवधी भारतीयांच्या मनात, जीवनात सहज रूजून गेल्या आहेत. त्यामुळेच की काय, सत्याचे अन्वेषण करताना आजही गांधीजींनी सांगितलेले सत्यस्वरूपाचेच पूजन होते. ते पूजन म्हणजे कोट्यवधी भारतीयांची सेवा होय. भारतीय हृदयांची सेवा करण्याचे पुरातन धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. तरी आपल्या आधुनिक धर्मग्रंथांमध्ये म्हणजे संविधानामध्येसुद्धा भारतीयांच्या सेवेला महत्त्व दिले आहे. किंबहुना संविधानातील सर्वच कलमे ही सातत्याने प्रत्येक भारतीयाच्या सेवेचे आणि कल्याणाचे पसायदान व्यक्त करतात. म्हणूनच की काय ही सेवा म्हणजेच सत्य समजत, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला पंतप्रधान संबोधतच नाहीत. ते म्हणतात, "मी प्रधानसेवक आहे." सेवक कुणाचे तर कोट्यवधी भारतीयांचे. सेवकाने सेवा करायची कुणाची? तर कोट्यवधी भारतीयांची. कोट्यवधी भारतीयांच्या सेवेचा वसा उचलणारी लोकशाही ही गांधीजींच्या सत्याचाच वारसा चालवत आहे. गांधीजी सत्य आणि अहिंसेबद्दल म्हणाले होते की, "लाखो-कोट्यवधींच्या हृदयामध्ये जो ईश्वर विराजमान आहे, त्या ईश्वराशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही ईश्वराला मानत नाही. पण ते त्याच्या सत्तेला जाणत नाहीत. मी मात्र त्या ईश्वराच्या सत्तेला जाणतो. मी या लाखो-कोट्यवधींच्या सेवेद्वारे त्या ईश्वराची पूजा करतो, जो सत्य आहे किंवा त्या सत्याची, जो ईश्वर आहे."

 

सत्याला खूप किंमत असते आणि त्याची किंमत चुकवावी लागते. कारण, सत्य अनमोल असते. आजही जगभराच्या परिप्रेक्षात पाहिले तर सत्याचे तेज स्वीकारणे प्रत्येकालाच जमते असे नाही. पण तो योग येतोच येतो की, सत्याशिवाय पर्यायच राहत नाही. त्यामुळेच या देशात 'भगवा दहशतवाद' शब्द खोडसाळ आणि लबाडपणे पेरणाऱ्यांना शेवटी भगव्या रंगाला माननाऱ्यांचा अनुनय करण्याची वेळ आली. त्या साऱ्यांना सत्य मान्य करावेच लागले की, 'भगवा दहशतवाद' किंवा देव-धर्म-निंदा ही मते लाटण्याची विकृत प्रवृत्ती होती. याच पार्श्वभूमीवर रा. स्व. संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वाट्टेल ते बरळत असत्य पेरणाऱ्यांनाही त्यांच्या असत्याची जबरी किंमत द्यावीच लागली. आपल्याबद्दलचे सत्य समोर यावे यासाठी ना रा. स्व. संघाला काही करावे लागले, ना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काही बोलावे लागले. पण त्यांच्या त्यागातून, बलिदानातून रा. स्व. संघाच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकारांच्याही राष्ट्रप्रेमी संकल्पनेचे सत्यस्वरूप जगासमोर हळूहळू का होईना आलेच. हे सगळे पाहून गांधीजींनी सत्यासंबंधी केलेले एक वचन आठवते. ते म्हणतात की, "सत्य माझ्यासाठी सर्वतोपरी सिद्धांत आहे. मी वचन आणि चिंतनामध्येही सत्य स्थापना करण्याचा प्रयत्न करतो. या सत्याच्या शोधासाठी मी माझ्या प्रिय वस्तूचेही बलिदान करू शकतो." गांधीजींच्या विचारांतून सत्याचे स्वरूप म्हणजे केवळ आणि केवळ ईश्वर आहे हेच स्पष्ट होते. त्याचप्रमाणे दुसरे तत्त्व अहिंसा. अहिंसा म्हटली की खूप जणांच्या बोलण्यातून व्यक्त होते की, गांधीजींची अहिंसा म्हणजे समोरच्याने एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करावा. मार खाऊन घ्यावा, मार खाता खाता दुर्बलतेने पडून लाचार व्हावे. पण गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व हेच होते का? मुळीच नाही. अहिंसा ही बलवानांनाच शोभते. नव्हे ते दुर्बलांचे अस्त्रच नव्हे. लाचारीने मुकाट समोरच्याचा अन्याय सहन करणाऱ्याला अहिंसा शोभतच नाही, असे महात्मा गांधींचे म्हणणे होते. अहिंसा म्हणजे मनावरचे संपूर्णत: नियंत्रण. रागाने, हिंसेने एखाद्या प्रश्नांची उकल होत नाही आणि झाली तरी ती पुढच्या अराजकतेची नांदी आहे, असे गांधीजींना वाटे. त्यामुळे हिंसेला हिंसेने उत्तर देणे यावर त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणत, डोळ्याबद्दल डोळा फोडला तर अर्धे जग आंधळे होईल. रागाला लोभाने, अंधाराला प्रकाशाने जिंकावे. मात्र, गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचे विचार हे सतीचे वाणच आहेत. कुणीही ही अग्निपरीक्षा देऊ शकतच नाही. कारण सरळ आहे. प्रचंड निग्रह, विरक्ती असल्याशिवाय माणूस अहिंसेचे तत्त्व पाळूच शकत नाही. आजच्या भौतिकवादाच्या जगात प्रश्न पडतो की, आज परमाणुबॉम्ब आहेत. माणसाला मारण्यासाठीचे अनेक उपाय, हत्यारे तयार आहेत. बरं माणूसही इतका बदलला आहे की दुसऱ्याला मारण्यासाठी त्याला छोटेसे कारणही पुरते. मग अहिंसेचे तत्त्व चालणार कसे? पण मुळात अहिंसा म्हणजे मरण्या आणि मारण्यापुरतीच संक्षिप्त आहे का? भावनातिरेकाने एखाद्यावर हात उचलल्यावर आपला हात आवरता घेणे इतकेच आहे का? जगभर दहशतवादाचा राक्षस थैमान घालत आहे. इसिस, अल कायदा, बोको हराम, माओवादी आणि न जाणे कोणत्या कोणत्या दहशतवादी संघटना मानवतेला काळीमा फासत आहे. या सगळ्यांना दहशतवाद फैलावण्यासाठी मानवीबळ मिळते कुठून? जीवंत, निष्पाप माणसाला क्रूरतेने मारणारी मानसिकता यांच्यात येतेच कुठून? या सगळ्यांना बदलावे कसे? जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सगळ्यांचाच खात्मा करून हा प्रश्न सुटणारच नाही. या गर्तेत या नरकात आयुष्य संपवू इच्छिणाऱ्यांच्या हृदयातील माणुसकी जागी करणे हा एक उपाय आहे. हा ईश्वर जागा होईल, तो अहिंसेच्या मूल्यानेच. ही अहिंसा वर सांगितल्याप्रमाणे केवळ मार खाणे नाही तर, अशा दहशतवाद्यांच्या हृदयातला सैतान संपवण्यामध्ये आहे. हे मोठे कठीण काम आहे. संयम, चिकाटी सावधता आणि तितकीच निर्भयता असणारी व्यक्ती हे करू शकते. कारण, या लोकांशी संपर्क, संवाद, त्यांचे परिवर्तन, नंतर पुनर्वसन करण्यासाठी प्रचंड तळमळ, आशावाद आणि निर्भयता हवी आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनात ईश्वर आहे आणि त्याला जागृत करू शकतोच हा प्रचंड आशावाद गांधीजींच्या मनात होता. तो आशावाद, ती निर्भयता म्हणजेच अहिंसा होय.

 

गांधीजी त्यांच्या 'सत्याचे प्रयोग' या आत्मचरित्रामध्ये लिहितात. चोरून विड्या ओढायचे, मांसाहार करायचा, पैसे चोरायचे अशा त्यांना वाईट सवयी लागल्या होत्या. एका घटनेमध्ये ते वडील भावाचा सोन्याचा कडा विकतात. गांधी घराणे सुसंस्कृत, खऱ्या अर्थाने धर्मप्रवण, वैष्णववृत्तीचे. आपण दुराचार करत आहोत ही सल गांधीजींना होती. त्यामुळे एका पत्रात ते हे सगळे लिहितात आणि पत्र वडिलांना देतात. महात्मा गांधीजींना वाटले की, आपल्या मुलाने चोरी केली, मांसाहार केला, विड्या ओढल्या म्हणून आपले वडील रागावतील, भयंकर मारतील. गांधीजी मार खाण्याच्या तयारीतच राहतात. पण पत्र वाचल्यावर गांधीजींच्या वडिलांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागतात. या अश्रूचे कारण काय असावे? एक कारण असू शकते की, इतक्या संस्कारीत घरातल्या बालकाने असे वागावे याचे दु:ख. दुसरे कारण असेही असू शकते की, आपल्या मुलामध्ये चांगल्या-वाईट कृत्याची, नैतिक जाण आहे. त्यांनी कबूल तरी केले की, त्यांनी नीतिबाह्य वर्तन केले. म्हणजेच या मुलाच्या मनातला चांगुलपणा जीवंत आहे. ते अश्रू त्या मुलाच्या चांगुलपणाला समर्पित होते का? अर्थात, काहीही असेल पण गांधीजी म्हणतात, वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला.पुन्हा ती कृत्ये करूच नये, असा दृढ निश्चय मनाने केला. अहिंसेचे तत्त्व याच घटनेतून गांधीजींच्या मनात रूजले होते. गांधीजींची अहिंसा म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या हृदयातील ईश्वर जागवणे, समोरच्याच्या मानवतेला जीवंत करणे. आज जग झपाट्याने बदलत आहे. मानवाचे मन विभिन्न भावनात्मक हिंदोळ्यावर अक्षरश: थकत आहे. या अशा वेळी मनाचा तोल सांभाळणे कठीणच. पण एखाद्याचा तोल सुटला तर? तर त्याच्या मनातल्या ईश्वराला साद घालून त्या माणसाचा तोल सावरणे ही आजच्या जगाची अहिंसा आहे. हीच अहिंसा आज जगभरात भावनिक शक्ती म्हणून स्वीकारली जाते. बौद्धिक क्षमतेसारखीच मानसिक अहिंसा आज महत्त्वाची आहे. हीच मानसिक अहिंसा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.