गांधी : काल, आज आणि उद्या...

01 Oct 2019 18:15:58

 


 

महात्मा गांधींचे नाव घेतले की, आपल्यासमोर चष्मा लावलेल्या, पंचा नेसलेल्या, हाती काठी घेतलेल्या, एका कृश शरीरयष्टीच्या व्यक्तीचे चित्र उभे राहते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे गांधीजी, ‘सविनय कायदेभंगकरणारे गांधीजी, ‘गोलमेज परिषदांमध्ये भाग घेणारे गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर पुणे करारकरणारे गांधीजी, ब्रिटिशांविरोधात चले जावची हाक देणारे गांधीजी, आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी उपोषणास्त्र उपसणारे गांधीजी, चरख्यावर सूत कातणारे गांधीजी आणि आणखीही असंख्य रुपातले गांधीजी. परंतु, महात्मा गांधींचा उल्लेख फक्त तेवढ्यापुरताच व्हायला हवा का किंवा तेवढ्यापुरताच का उल्लेख केला जातो, हे मुद्देही उपस्थित होतात.

महात्मा गांधींचे कार्य ते हयात असताना जसे कित्येकांना प्रेरणा देणारे होते, तसेच ते नसतानाही तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, अस्तेयाच्या तत्त्वांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठी चळवळ उभी केली. विनोबा भावेंसारखे वैयक्तिक सत्याग्रही त्यातूनच तयार झाले. गांधी विचारांची प्रासंगिकता जशी त्या काळात होती तशीच आजही आहे व हे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारी उदाहरणेही अस्तित्वात आहेत. हिंद स्वराज्यया आपल्या पुस्तकात गांधीजींनी अनेक विषयांवर चिंतन-मनन केलेले आहे. म्हणजे रोजगार, अर्थव्यवस्था, शेती, गोपालन, यांत्रिकीकरणावरील गांधीजींची मते काही प्रमाणात पालन करण्यायोग्य असल्याचेही पटते. परंतु, महात्मा गांधीजींचे काही विचार, मते, तत्त्वे ही त्यांच्या मृत्यूनंतर दडपूनच ठेवली गेली किंवा त्यांची चर्चाच होऊ नये, यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. म्हणजे मी सनातनी हिंदू आहे,” असे महात्मा गांधी नेहमीच म्हणत असत.

कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने शस्त्रत्याग केलेल्या अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून कर्मयोगाची महती सांगितली. तद्नंतर अर्जुन शस्त्र हाती घेऊन लढायला तयार झाला. महात्मा गांधींच्या आयुष्यावर भगवद्गीतेचा फार मोठा प्रभाव होता. गीता माझी आई आहे,” असे ते म्हणत असत. गीतेसह वेद, उपनिषदे यांबद्दलही गांधीजींना आस्था होती. मात्र, ते शब्दप्रामाण्यवादी वा ग्रंथवादीही नव्हते. मग गांधींचे हिंदू धर्मविचार नेमके होते तरी काय आणि हिंदू धर्माची ही तत्त्वे आपल्या आयुष्यात तंतोतंत जगण्याचा गांधीजींचा प्रवास कसा होता, हे आताच्या काळात जाणून घेणे आवश्यक ठरते. सोबतच ईश्वर अल्लाह तेरो नामअशी सर्वधर्मसमभावाची शिकवण गांधींनी दिल्याचे नेहमीच ऐकवले जाते. मात्र, स्वातंत्र्याच्या गेल्या ७२ वर्षांत सर्वधर्मसमभावाची किंवा धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ज्या पद्धतीने सांगितली गेली, ती विशिष्ट हेतू ठेवूनच. गांधीजींनी मात्र सर्वधर्मसमभावाची हिंदू संकल्पनामांडली.

गांधीजींच्या मते, सर्व धर्म समान असतील, तर मग धर्मांतरे का व्हावीत? गांधीजींनी ख्रिस्ती मिशनरी आणि इतरही लोकांकडून केले जाणारे हिंदूंचे धर्मांतर योग्य नसल्याचे म्हटले. त्यांचा सक्तीच्या, बळजबरीच्या आणि प्रलोभने किंवा सेवेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या धर्मांतराला तीव्र विरोध होता. विशेष म्हणजे, गांधीजींची ही सर्वच मते त्यांच्या तत्कालीन लेखातून, पत्रातून आणि नंतर प्रसिद्ध झालेल्या समग्र वाङ्मयातूनही सर्वांपुढे आहेत. परंतु, त्याचा प्रचार कधीही महात्मा गांधीजींच्या अनुयायांनीही केला नाही, ना गांधीविचारांवर चालणार्‍या संस्था-संघटनांनी. म्हणूनच महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीवेळी त्यांचे यासंदर्भातले विचारही सर्वांना समजलेच पाहिजेत, असे वाटते.

हिंदू धर्मातील सर्वात अनिष्ट रुढी, प्रथा किंवा परंपरा म्हणजे अस्पृश्यता. धर्माला किंवा भारतीय उपखंडाला लागलेली ही कीडच म्हटली पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यतेविरोधात मोठमोठी आंदोलने समाजातील धुरंधर व्यक्तिमत्त्वांनी उभी केली. प्रबोधनाची कास धरलेल्या अनेक थोरामोठ्यांनी त्याविरोधात लढा दिला. महात्मा गांधीजींनीदेखील अस्पृश्यतेला विरोधच केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर अस्पृश्यता, हजारो वर्षांचा अन्याय, अत्याचार यासंबंधी त्यांची चर्चाही झाली. पुढे महात्मा गांधींच्या उपोषणानंतर आंबेडकरांसोबत पुणे करारही अस्तित्वात आला. परंतु, इथे महात्मा गांधींचा आणि डॉ. आंबेडकरांचा अस्पृश्यतानिर्मूलनाचा हेतू स्पष्टपणे दिसतो. म्हणजे मार्ग भिन्न पण उद्देश एकच, असे हे प्रकरण.

महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाही एक मुद्दा आता जरा जास्तच उठवला जातो. महात्मा गांधी, सावरकर व संघ विचारधारा एकमेकांच्या समोरासमोर उभी ठाकलेली होती इथपासून ते दोघेही कट्टर द्वेष्टे होते इथपर्यंत विचारांचे पतंग उडवले जातात. परंतु, वैचारिक पातळीवर कितीही मतभेद असले तरी सर्वांनाच एकदुसर्‍याचा आदरच वाटत असे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. उलट गांधींच्या विचारांवर चालणारे गांधीवादी जेवढे नसतील, त्याहून अधिक संघ स्वयंसेवक आणि त्यांनी सुरू केलेल्या संस्था आपल्याला आजही दिसतील.

दुसर्‍या बाजूला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जगात मार्क्सवादाचे भलेमोठे सावट होते. किंबहुना, जो तो तरुण मार्क्सवादाकडे आकर्षित होत असे. हे जगभरात बहुतांश ठिकाणी झाले. भारतात मात्र मार्क्सवादाची जोमदार वाढ झाली नाही. भारतीय स्वातंत्र्यचळवळ ऐन भरात असताना क्रांतीच्या स्वप्नाने वेडे होऊन कोणी रक्त सांडले नाही. इथे महात्मा गांधींचे स्वातंत्र्य चळवळ मार्क्सवादाकडे झुकण्यापासून रोखण्यातले योगदान अधोरेखित होते. अशाप्रकारे महात्मा गांधी केवळ आपल्यापुढे ज्या प्रकारे आणले गेले, तितक्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर वर उल्लेख केलेल्या अनेक काल, आज आणि उद्याही चिरंतन राहणार्‍या गोष्टींचा अंतर्भावही त्यात होतो. यंदा महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींचे सार्धशती जयंतीवर्ष हे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी साजरे करावे, असे आवाहन केले आहे. आजची शाश्वत गांधीही विशेष पुरवणीही महात्मा गांधीजींना अभिवादन करणारीच आहे.

Powered By Sangraha 9.0