आले युवराजांच्या मना...

    दिनांक  08-Jan-2019   


सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांच्या हिताच्या अनेकविध योजना सौदी अरबमध्ये राबविल्या. त्याची सुरुवात महिलांना वाहन परवाना देण्यापासून झाली. त्यानंतर सरकारी प्रशासनातील त्यांचा सहभाग वाढावा, त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यांसारख्या अनेक सवलती, सूट महिलांना देण्यात आली. यापुढे सौदी अरबमधील महिलांना तलाकसंबंधीचे सर्व अपडेट्स त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळणार आहेत.

 

भारतात सध्या तिहेरी तलाक बंदी विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निकालानंतर अजूनही तिहेरी तलाक बंदी विधेयक काँग्रेस आणि विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे संसदेतच लटकले आहे. अशा वातावरणात मध्य-पूर्वेतील सौदी अरबमधून आलेली एक बातमी मात्र काहीशी सुखावणारीच म्हणावी लागेल. आपल्याला माहिती आहेच की, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांच्या हिताच्या अनेकविध योजना सौदी अरबमध्ये राबविल्या. त्याची सुरुवात महिलांना वाहन परवाना देण्यापासून झाली. त्यानंतर सरकारी प्रशासनातील त्यांचा सहभाग वाढावा, त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यांसारख्या अनेक सवलती, सूट महिलांना देण्यात आली. महिलांचा सरकारी व्यवस्थेतील सहभाग वाढावा आणि देशाची आर्थिक प्रगती व्हावी, हाच यामागील सौदीच्या युवराजांचा उद्देश. याच सुधारणांच्या मालिकेत आता आणखी एका बदलाची भर पडली आहे. ती म्हणजे, यापुढे सौदी अरबमधील महिलांना तलाकसंबंधीचे सर्व अपडेट्स त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळणार आहेत.

 

यापूर्वी सौदीमधील एखाद्या पुरुषाने त्याच्या पत्नीला तलाक दिल्यास बरेचदा असे आढळून आले की, त्या महिलेला याचा साधा गंधही नसायचा. कारण, सौदीमधील शरीया कायद्यानुसार, लग्नाचे बंधन हे एकतर्फी असून पुरुषांना तलाक देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यासंबंधीचे कुठलेही स्पष्टीकरण देण्यास सौदीचे पुरुष बांधील नाहीत. पण, यामुळे वाढणारे तलाक आणि विशेषत: महिलांची त्यांच्याच तलाकविषयीची अनभिज्ञता यावर मात करण्यासाठी सौदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महिलांकडून स्वागत करण्यात आले. या मोठ्या सुधारणेनुसार, तलाकसंबंधीच्या सर्व सूचना संबंधित महिलेला मोबाईलवर मिळू शकतील. तसेच, न्यायालयातून किंवा महिला विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावरूनही महिलांना तलाकसंबंधीची कागदपत्रे आता सहज उपलब्ध होतील. जेणेकरून या पीडित महिला पोटगी व इतर न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करू शकतील. सौदीमधील महिलांसाठी ही अत्यंत दिलासाजनक बाब असली तरी खर्‍याखुर्‍या व्यक्तीस्वातंत्र्यापासून या महिला आजही कोसो दूर आहेत, हे सत्य नाकारून चालणार नाही.

 

जिथे जिथे अशी घुसमट, गळछेपी तिथे तिथे लोकांना रस्त्यावर उतरावेच लागते. पण, सौदीमध्ये महिलांनी अशी एकजूट दाखवून आंदोलन पुकारणे आणि ते ही सरकारविरोधात हे आपल्यासारखे सोपे काम अजिबात नाही. म्हणूनच, सौदीमधील महिलांनी आपल्या हक्क आणि मागण्यांसाठी ऑनलाईन मोहीम छेडली. सार्वजनिक स्थळी वावरताना महिलांवरील विशिष्ट पोशाख परिधान करण्याचा नियम, कामासाठी, लग्नासाठी, प्रवासासाठी आणि एवढेच काय तर वैद्यकीय उपचारांसाठीही पुरुष नातेवाईकाच्या संमतीची अट रद्दबातल करण्यात यावी, या सौदीच्या महिलांच्या प्रमुख मागण्या. पण, या ऑनलाईन आंदोलनकर्त्या महिलांवरही सौदी सरकारची अगदी करडी नजर. या महिलांनाही अटक करण्यात आली. त्यापैकी काही महिलांचा सौदीच्या तुरुंगात छळ झाला असल्याची माहितीही नंतर समोर आली. म्हणजे एकीकडे महिलांसाठी सुधारणा अमलात आणायच्या आणि दुसरीकडे महिला आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबीही. त्यामुळे सौदी शासनाच्या आणि युवराजांच्या मनात नक्की चाललेय तरी काय, हे समजण्याचा मार्ग नाही. सौदीचे समाजकारण, राजकारण अभ्यासणार्‍या तज्ज्ञांच्या मते, सौदी युवराज महिलांसाठी सुधारणा नक्कीच करतील, पण तेही शरीयाच्या चौकटीत राहूनच. याचाच अर्थ, महिलांच्या सरसकट सगळ्याच मागण्या मान्य होतील, याची दुरान्वयेही शक्यता नाही.

 

२०१८ सालच्या सौदीच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, पुरुषांची लोकसंख्या ही जवळपास ५७ टक्के, तर महिलांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ४२ टक्के इतके आहे. पण, या ४२ टक्के महिला आजही संपूर्ण हक्कांसाठी झगडत आहेत किंवा मुकाट्याने पुरुषी वर्चस्वाला बळी पडल्या आहेत. त्यामुळे युवराजांच्या मनात आले की, आगामी काळात सौदी अरबमधील महिलांवर आणखीन सवलतींची ‘खैरात’ होईलच, पण सगळे ‘खैरीयत’ कधीच होेणार नाही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/