इस्लामचे ‘चिनी’करण

    दिनांक  07-Jan-2019   
 
 
नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चिनी सरकारातील अधिकाऱ्यांनी आठ इस्लामी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व नंतर हे पाऊल उचलले. इस्लामला समाजवादाशी सुसंगत करण्यासाठी आणि धर्माला नव्याने परिभाषित करण्यासाठीच्या उपायांना लागू करण्यासाठी दोघांत सहमतीही झाली.
 
 

सातव्या शतकापासून ज्या त्वेषाने अरबस्तानातून इस्लामी टोळ्या जगाच्या पाठीवर नांदणार्‍या निरनिराळ्या धर्म आणि संस्कृतींना गिळत गेल्या, तितक्याच थंड डोक्याने चिनी राज्यकर्ते इस्लामला हद्दपार करण्यासाठी तडफेने कामाला लागल्याचे दिसते. गेल्या काही वर्षातल्या, महिन्यातल्या आणि कालपरवाच्याच चीनमधल्या घटना पाहिल्या की, याची पुष्टीही होते. नुकताच कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र मानल्या जाणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने देशातील मुस्लिमांच्या उरात धडकी भरवणारा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार आता चीनमधील मुस्लिमांना आगामी पाच वर्षांत ‘सिनीसायझेशन’ची प्रक्रिया अवलंबावी लागणार आहे. ’सिनीसायझेशन’ म्हणेज बिगर चिनी समाजाला चिनी संस्कृती मुख्यत्वे चीनमधील हान संस्कृती आणि सामाजिक मानदंडांच्या प्रभावाखाली यावे लागते किंवा आणले जाते. आपल्या सर्वांना माहितीच असेल की, अपवाद वगळता धर्मांध मुस्लीम आक्रमकांनी गेल्या १४०० वर्षांत ते जिथे गेले, तिथली संस्कृती स्वीकारण्याऐवजी त्याचा विध्वंसच केला. केवळ भारतात या आक्रमकांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाले आणि कडव्या इस्लाममध्ये मान्य नसणारे ताबूत मिरवणे, दर्ग्यावर माथा टेकणे, महिलांनी मंगळसूत्र घालणे या मूर्तीपूजकांशी साधर्म्य सांगणार्‍या पद्धतींचे अनुकरण त्यांच्याकडून केले गेले. ही संस्कृतीची देवाणघेवाण अजूनही सुरूच आहे. असो.

 

नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चिनी सरकारातील अधिकाऱ्यांनी आठ इस्लामी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व नंतर हे पाऊल उचलले. इस्लामला समाजवादाशी सुसंगत करण्यासाठी आणि धर्माला नव्याने परिभाषित करण्यासाठीच्या उपायांना लागू करण्यासाठी दोघांत सहमतीही झाली. दरम्यान, चीनने या सगळ्याच प्रक्रियेच्या अंमलबजावणीची रूपरेषा नेमकी काय असेल, हे अजूनही अधिकृतरित्या सांगितलेले नाही.चीनमध्ये सत्तेवर असलेल्या कम्युनिस्ट पक्षाची आपली एक स्वतंत्र विचारसरणी आहे. माओ त्से तुंग यांच्या कल्चरल रिव्होल्युशनचे अनुसरण करणार्‍या या पक्षाच्या मते नागरिकांच्या धार्मिक आस्थेमुळे डावी विचारधारा दुबळी होते. म्हणूनच कम्युनिस्ट पक्ष स्वतःला नास्तिक मानतो व नास्तिकतेचाच पुरस्कार करतो. इतकेच नव्हे तर पक्षाच्या सदस्यांनीही कुठल्याही धर्माचे पालन करू नये, असे निर्देश दिले जातात. यातून माओने देशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी धर्माला नष्ट करण्याचे जे प्रयत्न केले, तेच प्रयत्न सत्ताधारी जिनपिंग राजवटही करत असल्याचे दिसते. पण व्यक्तीच्या आयुष्यातून धर्म नष्ट केल्याने तो खरेच आनंदी आणि सुखी आयुष्य जगू शकतो का? हा एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर ज्याच्या त्याच्या अनुभवावरच असेल, हेही नक्की. तरीही केवळ माझेच नव्हे तर माझ्यासह सर्व प्राणीमात्रांचे नि निसर्गाचे, अवघ्या विश्वाचे कल्याण व्हावे, अशी धारणा बाळगणार्‍या व अनुसरण करणार्‍या हिंदू धर्मीयांना या परमानंदाचा अनुभव अनादी-अनंत काळापासून आहे, हे येथे नमूद करावेच लागेल.

 

दुसरीकडे चीनच्या शिनजियांग या प्रांतात देशातल्या मुस्लिमांची सर्वाधिक वस्ती आहे. उइगर मुस्लिमांचा गजबजाट असलेल्या या प्रांताच्या सीमा मध्य आशिया आणि भारताशी भिडतात. चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही याच भागातून जातो. उइगर मुस्लिमांची संस्कृती चीनच्या हान संस्कृतीपेक्षा भिन्न आणि अरब राष्ट्रांशी जवळीक दाखविणारी असल्याने चीनला या समुदायावर विश्वास ठेवणे जिकिरीचे ठरते. शिवाय या समुदायाने एकेकाळी स्वायत्ततेसाठी आंदोलनही केले होते. परिणामी सर्वच मुस्लिमांना निधर्मी करणे, चीनच्या हान संस्कृतीत मिसळवणे किंवा त्यांच्यावर निर्बंध लादणे हे पर्याय चीनसमोर उभे राहतात. यापैकीच एका पर्यायाचा अवलंब करत चीनने याआधी शिनजियांग प्रांतात १० लाख उइगर मुस्लिमांना बंदी करून ठेवल्याचे समोर आले होते. नंतर चिनी सरकारने मात्र हा दावा फेटाळला. सोबतच २०१६ साली एक हजार मशिदी उद्ध्वस्त केल्याचे, मशिदीवरील भोंगे हटविल्याचेही म्हटले होते. याशिवाय चीनमध्ये उइगर मुस्लिमांना हिजाब घालणे, दाढी राखणे आणि रोजा ठेवण्यावरही बंदी आहे. तसेच मुस्लीम मुलांना वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत धार्मिक शिक्षण न देण्याचे आणि मशिदीवर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आताचा आदेशही याच पठडीतला. म्हणूनच चिनी सरकारच्या या भूमिकेतून हा देश आपल्या भूमीतून इस्लामला बाहेर करण्याच्याच कामाला लागल्याचे निदर्शनास येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/