खारीचा वाटाही मोलाचा

    दिनांक  06-Jan-2019   

 

 
 
 
 
भारताचा शत्रू आणि दहशतवादाला आसरा देणारे पाक नामक सापाचे पिल्लू अमेरिका कित्येक वर्षे पोसत आहे. भारताविरुद्ध राजकारणासाठीही या मदतीचा वारंवार वापर केला जात आहे. मात्र, भारताने अफगाणिस्तानला देऊ केलेली मदत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतेय.
 
 
आपल्याने काही होत नाही आणि दुसरा सरसावला तर त्याचेही पाय ओढायचे, ही पद्धत भारतीयांची मानसिकता दाखवते, अशी टीका नेहमी आपल्या देशात होते. मात्र, जगातील सर्वशक्तीशाली व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काहीसे असेच केले. भारतातर्फे अफगाणिस्तानमध्ये एक ग्रंथालय उभारणीचे काम सुरू आहे. यापूर्वीही उद्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानातील शहरांची पुर्नरचना करण्यासही भारताने मदत केली आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना ही मदत रूचलेली नाही. अफगाणिस्तानसारख्या देशात अशा गोष्टींची गरज काय? असा उलटा सवाल त्यांनी विचारत थेट भारताच्या पंतप्रधानांवर टीका केली. भारतासह अन्य देशांवरही त्यांनी अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य करणे टाळले परंतु, भारतीयांनीही या वक्तव्याचा समाचार घेतला. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहीब यांच्यात झालेल्या बैठकीतही ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांनी भारताला सर्वात जवळचा मित्र म्हटले. त्यात काँग्रेसनेही ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत,“आम्हाला तुमच्या उपदेशाची गरज नाही,” अशा शब्दांत सुनावले हे योग्यच...
 

भारताचा शत्रू आणि दहशतवादाला आसरा देणारे पाक नामक सापाचे पिल्लू अमेरिका कित्येक वर्षे पोसत आहे. भारताविरुद्ध राजकारणासाठीही या मदतीचा वारंवार वापर केला जात आहे. मात्र, भारताने अफगाणिस्तानला देऊ केलेली मदत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतेय. ट्रम्प म्हणतात, “अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मदत करण्यावर २०१९ पासून आखडता हात घेतला आहे. मात्र, आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते आता अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांना मदत करू पाहत आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानला केलेली मदत ही क्षुल्लक आहे. इतकी मदत तर आम्ही पाच तासांत खर्च करतो. मला एक कळत नाही अफगाणिस्तानात ग्रंथालयाचा वापर कोण करेल?, पंतप्रधान मोदी एक चांगले व्यक्ती आहेत. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांची विकासकामेही उल्लेखनीय आहेत. पण, आम्ही कोसो दूर असूनही अशा कामांसाठी मदत करतोय.” ट्रम्प यांनी मुळात ही तुलना करण्याची गरज नव्हतीच. ट्रम्प म्हणतात की, “अफगाणिस्तान आणि इराणमध्ये केलेल्या मदतीचा उल्लेख इतर देश त्यांच्याकडे येऊन करत आहेत.” मात्र, भारताने तसे केल्याचा कुठे उल्लेखही नाही. भारतीय प्रसारमाध्यमांनी अशी बातमीही चालवली नव्हती. ग्रंथालयाचा मुद्दा हा ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळेच चर्चेत आला होता. त्यानंतर राहिला प्रश्न ग्रंथालयाच्या वापराचा तर इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला ग्रंथालयाचे महत्त्व कळू नये, ही गोष्ट तशी खटकतेच. ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे विचार करायचा म्हटला तर दूरदृष्टीच गळून पडेल.

 

‘गुगल’वर केवळ ‘अफगाणिस्तान’ असा शब्द जरी सर्च केला तरी धुमसती शहरं, तालिबान्यांचे हल्ले आणि हिंसेचा नंगानाच समोर दिसतो. नुकतीच सर्व देशात नव्या वर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असताना अफगाणिस्तानातील काबूल शहरात दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवायांविरोधात २७ जणांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्यांच्या प्रत्युत्तरात १५ पोलिसांचा मृत्यू झाला. ही घटना १ जानेवारीची. दोनच दिवसांत दहशतवाद्यांनी बागलान प्रांतातील एक पोलीस मुख्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले. यात एकूण १२ हून अधिक पोलिसांचा खात्मा झाला आणि संपूर्ण पोलीस मुख्यालयच उद्ध्वस्त झाले. शेकडोंच्या संख्येने तालिबानी अतिरेकी दारूगोळ्यासह हल्ला करण्याच्या तयारीत आले होते. त्यांच्याशी झालेल्या धुमश्चक्रीत आणखी आठ पोलिसांना जीव गमावावा लागला. अशा हाहाकाराला शमविण्यासाठी ट्रम्प यांनी इतर देशांसमोर शांतता प्रस्थापित करण्यास सांगणे उचित की, भारताची मदत कशी तोकडी आणि विनाकारण आहे हे सांगणे अधिक गरजेचे? यावरूनच ट्रम्प यांचे धोरण कसे ‘अमेरिका फर्स्ट’ आहे हे पुन्हा दिसून आले. याउलट भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये झालेल्या बैठकीत भारत हा अफगाणिस्तानच्या पुर्नउभारणीत महत्त्वाचा सहकारी असल्याचे अफगाणिस्तानचे मत अभिमानास्पद आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/