नीलिमाताईंच्या नेतृत्वाखाली उत्तमाचीआराधना करणारी मविप्र संस्था

    दिनांक  05-Jan-2019   

 

 

 
 
 
 
नाशिक जिल्ह्यात किंबहुना अवघ्या महाराष्ट्रात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था माहीत नाही, असे कोणी असणे दुरापास्तच आहे. आजमितीस संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल ही अत्यंत सक्षमपणे सुरू आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे नीलिमाताईंच्या निःस्पृह आणि कुशल नेतृत्वाला आणि संस्थेतील सभासदांच्या त्यांच्याप्रती असणाऱ्या विश्वासाला दिले तर वावगे ठरणार नाही.
 

डॉ. वसंतराव पवार यांच्या अकाली निधनानंतर नीलिमाताई पवार या मविप्रच्या वर्तुळात दाखल झाल्या. त्यांना मविप्रच्या नैमित्तिक कारभाराबाबत काहीही कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी मविप्रची धुरा हाती घेतली. याच काळात जंगलीदास महाराज, भाऊ महाराज, तळवळकर दीदी यांसारख्यांचे मार्गदर्शन निलीमाताईंना लाभले. कार्यभार स्वीकारल्यावर पहिल्या दिवशी म्हणजेच डॉ. पवार यांचे निधन झाल्यानंतरच्या १६ व्या दिवशी नीलिमाताई यांनी तब्बल ३००० सह्या केल्या. यातून संस्थेचा विस्तार आणि नीलिमाताई यांच्या कार्याचा आवाका आपल्या लक्षात येईल.

 

एक महिला आपली प्रमुख कशी असू शकते, या जुनाट विचारसरणीचा सामना व त्या अनुषंगाने होणारा प्रचंड त्रास त्यांना या काळात सहन करावा लागला. कहर म्हणजे डॉ. पवार यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच नीलिमाताई यांच्या निवडीला विरोध करणारी केस त्यांच्या विरोधात त्यांच्याच स्वकीयांनी दाखल केली होती. “ही घटना मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही,” असे नीलिमाताई सांगतात. त्यावेळी नीलिमाताईंवर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. या विचारांमुळे त्यांना तब्बल १५ महिने झोप लागत नव्हती. यातूनच त्या योगाकडे वळल्या. पुढील लढाईसाठी त्यांनी स्वतःला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीने सज्ज केले. त्यानंतर म्हणजे त्यांच्या निवडीपासून अवघ्या १५ महिन्यांत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्या मविप्रच्या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या. कोणतेही पाठबळ नाही, होणारा प्रचंड विरोध यांचा सामना करत यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी २१ विरुद्ध १८ अशा प्रमाणात मते प्राप्त करून विजय संपादित केला.

 

त्यानंतर खऱ्या अर्थाने मविप्रमध्ये त्यांची सक्रियता दिसू लागली. शंभर टक्के पारदर्शकता, विश्वासार्हता, न्यायी वृत्ती, चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबरच असे धोरण या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मनात स्थान अबाधित आहे. नीलिमाताई यांना शिक्षणक्षेत्रातील सिंधुताई सपकाळ अशी उपमा दिली जाते. त्यांचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्यांना राजकारण आवडत नाही. त्यांना आलेल्या आमदारकीचे प्रस्तावदेखील त्यांनी नाकारले आहेत. त्यांच्या न्यायी आणि निःस्पृह वृत्तीचे उदाहरण देण्यासाठी केवळ एकच दाखला खूप बोलका ठरतो. तो असा की, त्यांच्या दोन्ही डॉक्टर मुली मविप्रच्या सभासद होत्या. मात्र, त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून आणि त्यापैकी एकीची नाशिक जि.प. सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांना संस्थेसाठी वेळ देता येणे शक्य होत नव्हते. सबब, सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी त्यांना वेळ देता येत नसल्याने आणि सभासद म्हणून संस्था विकासात हातभार लावण्यात अडचणी येत असल्याने पदाचा राजीनामा द्यावयास सांगितला. जेथे उत्तराधिकाऱ्यासाठी आधीच तजवीज केली जाते, अशा वातावरणात नीलिमाताई यांची ही समर्पण वृत्ती आणि न्याय हा खरोखरच अभिनंदनास पात्र ठरतो.

 

त्या आजही संस्थेचे वाहन, ड्रायव्हर यांची सेवा घेत नाहीत. त्या त्यांच्या वैयक्तिक वाहनातून प्रवास करतात. त्यांच्यासमवेत त्यांचा स्वतःचा डबा असतो. अगदी लहान वाटणाऱ्या पण मोठा प्रभाव निर्माण करणाऱ्या बाबी नीलिमाताई यांनी आपल्या कार्यकाळात राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. संस्थेच्या माध्यमातून उदोजी मराठा बोर्डिंग ही इमारत ‘हेरिटेज बिल्डींग’ म्हणून जोपासली जाणार आहे व तिथे जागतिक, भारतीय, महाराष्ट्रीय आणि मविप्र यांचा शैक्षणिक प्रवास मांडण्यात येणार आहे.

 

आजच्या आधुनिक युगात मविप्र संस्थेचा विद्यार्थी हा सर्वार्थाने सक्षम असावा, याकरिता येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. योग दिवस, मविप्र राष्ट्रीय मॅरेथॉन, ऑलिम्पिक डे यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात योगदान दिले जात आहे. मूल्यशिक्षणासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, आयटीआयच्या माध्यमातून सलग ६०० दिवस बेंच दुरुस्ती, कपाटे व टेबल निर्मिती या माध्यमातून वित्त बचत व विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, २ लाख विद्यार्थ्यांची, सभासदांची वैद्यकीय तपासणी, विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी मेडिक्लेम सुविधा, युपीएससीच्या धर्तीवर संस्थांतर्गत स्पर्धा परीक्षांचे आयोजन, संशोधनाला चालना मिळावी यासाठी पुणे विद्यापीठांतर्गत डिझाईन सेंटर, पेव्हर ब्लॉक निर्मिती केंद्र, जेनेरिक मेडिकल स्टोर असे अनेकविध उपक्रम नीलिमाताई आजमितीस राबवित आहेत. उत्तम प्रशासन, साधी आणि संस्कृतीची जोपासना करणारी राहणी आणि कमालीची ध्येयनिष्ठता या असीम गुणाच्या बळावर नीलिमाताई यांनी मविप्र संस्थेचा कारभार उत्तम सांभाळला आहे. त्यांचा कार्यकाळ हा भविष्यासाठी पथदर्शक ठरेल, यात शंकाच नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/