युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे युवा सशक्तीकरणाला चालना - मुख्यमंत्री

    दिनांक  04-Jan-2019


नागपुर : युथ एम्‍पॉवरमेंट सामिटच्‍या माध्‍यमातून युवा सशक्‍तीकरणाला चालना मिळाली आहे, अशी भावना महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. भारताच्‍या वेगाने वाढणाऱ्‍या अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये कुशल मनुष्‍यबळाची गरज आहे. कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी संघटनेतर्फे प्रकाशित अहवालानुसार देशात ८० लाख तरूणांनी भविष्‍य निर्वाह निधी खाते उघडले असून त्‍यातील सुमारे २५ टक्के खाती ही महाराष्‍ट्रातील आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. विदर्भात उद्योगांना कमी दरात वीज उपलब्‍ध झाल्‍याने अमरावतीचा टेक्‍सटाईल पार्क, बुटीबोरी, चंद्रपूर येथे उद्योग क्षेत्राचे विस्‍तारीकरण झाले आहे. समृद्धी महामार्ग, ड्राय पोर्ट, डिफेन्‍स, एव्हिएशन, फुडपार्क या सर्व क्षेत्रात विदर्भात रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत विविध आर्थिक विकास महामंडळांना निधी देण्‍यात आला असून, त्‍याव्‍दारे स्‍वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य गरजू लाभार्थ्‍यांना मिळणार आहे. मुद्रा योजनेमूळे राज्‍यात कोटी १० लाख जणांना अर्थसहाय्य मिळाले असून त्‍याद्वारे स्‍वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, अशी माहिती मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

केंद्र सरकारच्‍या स्‍टार्टअप, स्‍टॅडअप व मुद्रा योजना व राज्‍य सरकारचे उद्योगकेंद्रीत धोरण यामुळे उद्योगनिर्मिती व रोजगार उपलब्‍ध होत आहेत. युवकांनी रोजगार मागणाऱ्‍यापेक्षा रोजगारनिर्मिती करणारे व्‍हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे वित्‍तमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी यावेळी केले. या परिषदेच्‍या उद्‌घाटनाप्रसंगी मुद्रा योजनेअंतर्गत नवउद्योजकांना कर्ज धनादेशाचे वितरण मुख्‍यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. याचप्रमाणे पं. दीनदयाल उपाध्‍याय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रमाणपत्राचे वाटप, वैयक्तिक रोजगारासाठी महिला बचत गटांना अर्थसहाय्यासाठी धनादेश देण्‍यात आले. युथ एम्‍पॉवर समिटच्‍या वर्षाच्‍या प्रवासाचा आढावा घेणाऱ्‍या एका चित्रमय पुस्‍तकाचे अनावरणही यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

 

या परिषदेच्‍या स्‍थळी सरकारी व खाजगी योजनांचे महामंडळ, बँक व नोकरी मिळवण्‍यासाठी मुलाखतीचे स्‍टॉल्‍स उपलब्‍ध आहेत. त्‍याचप्रमाणे, विविध क्षेत्रातील कर्तृत्‍ववान व प्रेरणादायी मान्‍यवरांचे मार्गदर्शन व परिसंवादही आयोजित करण्‍यात आले आहेत. उद्‌घाटकीय कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, या परिषदेचे संयोजक आमदार प्रा. अनिल सोले, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, फॉर्च्‍यृन फाऊंडेशन समिटचे पदाधिकारी तसेच राज्‍याच्‍या विविध भागातून आलेले युवक-युवती बहुसंख्‍येने उपस्थित होते.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/