औरंगाबादसाठी आणखी १२५ कोटी देणार : मुख्यमंत्री

    दिनांक  04-Jan-2019


औरंगाबाद : औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी व सांस्कृतिक महत्त्व असलेले शहर आहे, याला आधुनिक शहर म्हणून नावारुपाला आणण्यासाठी औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात केलेला आहे. राज्य व केंद्र सरकारने शहराच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला असून विविध योजनांसाठी यापूर्वी देखील मोठा निधी दिला आहे, यामुळेच शहराच्या रस्ते विकासासाठी अजून १२५ कोटी रुपये देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाच्यावतीने शंभर कोटी रुपये रस्ते विकास अनुदानांतर्गत शहरातील ३० विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर सभेस संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झांबड, आमदार इम्तियाज जलील, आमदार नारायण कुचे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त डॉ.निपुण विनायक हे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, औरंगाबाद शहरातील लोकांना विकासाची भूक आहे, यामुळेच महाराष्ट्र शासन देखील संभाजीनगरचा पूर्ण विकास केल्याशिवाय थांबणार नाही. शहरातील रस्ते विकासासाठी यापूर्वी २४ कोटी व नंतर शंभर कोटी रुपये दिले. त्यातून शहराच्या विविध योजनांसाठी शासन प्रयत्नशील असून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, समांतर जलवाहिनी प्रकल्प आदी विषय सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कचरा प्रश्न तातडीने मिटावा, यासाठी संबंधित विभागाच्या सचिवांना सूचना देऊन या प्रश्नावर तोडगा काढतानाच ८८ कोटी रुपये तरतूद केली होती, असे त्यांनी सांगितले.

 

शहरातील सिडको-हडको रहिवाशांना दिलासा देणारा मोठा निर्णय शासनाने घेतला असून आतापर्यंत ते राहत असलेल्या घराचे विक्री, हस्तांतरण, फेरफार आदींसाठी शासन परवानगीची गरज होती. पण आता त्यांना फ्री होल्ड हक्क दिले असल्याने या कशासाठीही त्यांना परवानगीची गरज राहणार नाही, या क्रांतिकारी निर्णयाचे नाशिक, नवी मुंबई आदी ठिकाणी मोठे स्वागत झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/