लघु चित्रपटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करावी

31 Jan 2019 16:59:25



मुंबई : "ग्रामीण भागामधील नैसर्गिक संसाधने व विज्ञान यांचा संयोग झाल्यास ग्रामीण भागामध्ये सुधारणा घडेल. लघु चित्रपटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करावी." असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी १५०व्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लघु चित्रपट स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

 

"कमी वेळात आपला आशय मांडणे हे आव्हानात्मक काम असून हे काम लघुचित्रपट निर्मिती क्षेत्राने स्वीकारले आहे. लघुचित्रपटांनी जुनी व नवीन पिढी यांची सांगड घालून सुधारणावादी लघु चित्रपटांची निर्मिती करावी. असे प्रबोधानात्मक लघु चित्रपट राज्यातील महाविद्यालयांच्या महोत्सवांमध्ये प्रदर्शित केल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण होण्यास मदत होईल." असेही यावेळी तावडे यांनी सांगितले.

 

या स्पर्धेमध्ये २६ लघु चित्रपटांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी ‘गांधी हरवले गेले’ या लघु चित्रपटास प्रथम पुरस्कार तर ‘गांधीजींचा चष्मा’ याला द्वितीय व ‘मॅजिक पॉट’ यास तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. विजेत्या लघु चित्रपट निर्मात्यास सन्मानचिन्ह व मानचिन्ह श्री.तावडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, प्रशासकीय अधिकारी निवृत्ती मराळे, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशनच्या अध्यक्ष उषा देशपांडे, लघु चित्रपट स्पर्धेचे सर्वश्री परिक्षक पुरुषोत्तम लेले, मयूर कुलकर्णी, विजय पवार तसेच लघु चित्रपट निर्मिती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0