रेडिमेड नऊवारीची विद्या

    दिनांक  31-Jan-2019   

 

 
 
 
 
नऊवारी साडी ही मराठमोळ्या स्त्रीची ओळख. आता तर गुढीपाडव्याला बुलेट, बुलेटवर नऊवारी साडी आणि नाकात नथ लेवून, त्यावर गॉगल घातलेली मुलगी ही अस्सल आधुनिक मराठमोळी मुलगी म्हणून एक नवीनच ओळख निर्माण झाली आहे. भारताची स्कायडायव्हिंग करणारी पहिली महिला शीतल राणे-महाजन हिने स्कायडायव्हिंग करताना नऊवारी साडी परिधान करूनच तो विक्रम केला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही सुद्धा नऊवारी साडीमध्येच वावरायची. अगदी युद्धभूमीवरसुद्धा नऊवारीतच घोड्यावर मांड टाकून तिने ब्रिटिशांना आपल्या समशेरीने सळो की पळो करून सोडले होते. नऊवारी ल्यायलेली कोणतीही मुलगी वा स्त्री ही घरंदाजच वाटते. तिच्या वागण्यात, चालण्यात एक अनोखा रुबाब आपोआप येतो. नऊवारी नेसायला तशी अवघडच. मात्र, तरुणाईमध्ये या साडीचं असणारं आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रेडिमेड नऊवारी साड्यांचा पर्याय उपलब्ध झाला. अशाच रेडिमेड नऊवारी साड्या तयार करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी नाव आहे ते सिद्धी क्रिएशन्सच्या विद्या पवार यांचं.
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील परब परिवारात विद्याचा जन्म झाला. लहानपणापासून मात्र ती अंधेरीमधील साईवाडी इथेच वाढली. शालेय शिक्षण नामांकित अशा परांजपे विद्यालयातून झाले, तर बारावीपर्यंतचं शिक्षण पार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयातून झाले. बारावीमध्ये नापास झाल्यानंतर विद्याची शिक्षणातली अभिरुचीच संपली. मात्र, लहानपणापासून ती सर्जनशील होती. याच गुणाला पुढे वाव देण्यासाठी तिने अंधेरीच्या कामगार कल्याण केंद्रात हस्तकलेचे धडे गिरवले. सॉफ्ट टॉईज बनवायला शिकली. सॉफ्ट टॉईज घरात बनवू लागली. एका सेल्समनच्या माध्यमातून ती सॉफ्ट टॉईज विकू लागली. दरम्यान विलास पवार यांच्यासोबत तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिने टेलरिंगचा मास्टर कोर्स केला. एका इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंग केलं पण ते अर्ध्यातच सोडावं लागलं. याच वेळी सासऱ्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं अपरिहार्य झालं होतं. त्यासाठी विद्याने सॉफ्ट टॉईजचा व्यवसाय बंद केला.

 

कालांतराने कामगार कल्याण केंद्रामध्येच विद्याला मानधनावर नोकरी मिळाली. तिथे तिची मैत्री जोगळेकर मॅडमसोबत झाली. जोगळेकर मॅडमच्या माध्यमातून एका रेडिमेड नऊवारी साडी तयार करणाऱ्या महिलेसोबत विद्याची ओळख झाली. ती महिला नऊवारी साडी बनवण्याचं तंत्र कधीच कोणाला शिकवत नसे. मात्र विद्याची नऊवारीप्रति असणारी आवड आणि उत्सुकता पाहून त्यांनी तिला साडी बनविणे शिकवले. अल्पावधीतच विद्याने ते तंत्र अवगत केले. २०१० मध्ये रेडिमेड नऊवारी साड्या तयार करण्याचं बुटीक उभं राहिलं. उत्पादनाचं कौशल्य आहे, मात्र विपणन, विक्री हे व्यवसायातील तंत्रदेखील तितकंच महत्त्वाचं आहे, हे एव्हाना विद्याच्या लक्षात आलं. हे तंत्र अवगत करण्यासाठी त्यांनी कॅनरा बँकेने आयोजित केलेला उद्योग विकास कार्यक्रमाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे उद्योजकीय धडे देणाऱ्या ‘लक्ष्यवेध’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. या सगळ्यांमुळे उद्योजकीय पाया मजबूत झाला. कॅनरा बँकेच्या अभ्यासक्रमादरम्यान अश्विनी जोशी या समविचारी तरुणीशी विद्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर व्यावसायिक मैत्रीमध्ये झाले. दोघी परस्परांच्या उद्योगवाढीसाठी मदत करतात.

 

सिद्धी क्रिएशनच्या माध्यमातून विद्या पवारांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रेडिमेड नऊवारी साड्यांची विक्री केली आहे. निव्वळ आपल्या भारतातच नव्हे तर अगदी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड अशा परदेशांतदेखील मराठमोळी नऊवारी ‘सिद्धी क्रिएशन’ने पोहोचविलेली आहे. या उद्योगातून विद्या पवार पाच महिलांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देतात. फक्त त्या रेडिमेड नऊवारी साडी बनवितात एवढंच नाही, तर नऊवारी साडी त्यांना नेऊन दिल्यास ती शिवूनदेखील देतातअशी ही नऊवारी साडी घडविणाऱ्या विद्या पवारांची कथा. एक साधी मराठमोळी तरुणी ते मराठमोळ्या नऊवारीची उद्योजिका, हा प्रवास प्रेरणादायी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/