कर्णबधिरांना आधार देणारी देवांगी

    दिनांक  31-Jan-2019दिव्यांग व्यक्तीकडे साधारणपणे एका सहानुभूतीच्या नजरेने न पाहता त्यांना आधार देण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरपिस्ट देवांगी दलाल यांनी घेतलेला पुढाकार आणि त्याचे परिणाम निश्चितच प्रशंसनीय आहेत.


दुर्दैवाने आपल्या समाजात आजही दिव्यांगांना सापत्न वागणूक दिली जाते. परंतु, या दिव्यांगांना सामान्यांप्रमाणे आयुष्य जगता यावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरपिस्ट देवांगी दलाल धडपड करत आहेत. गेल्या २७ वर्षांपासून ऑडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत देवांगी यांना २०१२ सालीअमेरिकन अॅकॅडमी ऑफ ऑडिओलॉजी’कडून ‘ह्युमॅनेटेरीयन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय ऑडिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी कर्णबधिर मुलांच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी गुजराती आणि हिंदीमधून पुस्तकेही लिहिली. इतकेच नाही तर देवांगी दलाल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी काम केले आहे. त्याचा पाच हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. देवांगी दलाल यांचे शिक्षण मुंबईत गुजराती माध्यमाच्या शाळेत झाले. त्यांनी तीन वर्षे ऑडिओलॉजी थेरपिस्टचे शिक्षण घेतले. डॉक्टर होऊन रुग्णसेवा करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, त्यावेळी या क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण लक्षात घेता, मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणे तसे कठीणच होते आणि त्यांना आई-वडिलांना सोडून मुंबई बाहेर शिक्षणासाठी जाणेही सोयीस्कर वाटले नाही. त्यांनी पॅरामेडिकल अभ्यासक्रमामध्ये पहिली सहामाही परीक्षा पूर्ण होण्याच्या चार दिवस अगोदर प्रवेश घेतला. केवळ वैद्यकीय क्षेत्रात काही करायचे म्हणून त्यांनी हा अभ्यासक्रम निवडला. तेव्हा संपूर्ण भारतात ऑडिओलॉजीमध्ये ६५ जागा होत्या. कान-नाक-घसा शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. जयंत गांधी आणि डॉ. उनाडकर यांच्यासोबत काम करत असताना गांधी यांच्याकडून शस्त्रक्रिया आणि औषधांबाबतची माहिती मिळवली. डॉ. उनाडकर यांच्याकडून तंत्रज्ञानाचाही वापर कसा करायचा याची माहिती घेतली.

 

शिकागोमधील डॉ. फ्रान्सिस को मानवी शरीरातील श्रवण क्षमतेविषयी संशोधन करतात. त्यांच्याकडेही दलाल यांना या क्षेत्राशी संबंधित भरपूर काही शिकायले मिळाले. हे सर्व सुरू असताना कर्णबधिर मुलांसाठी आपल्याला नवीन काय करता येईल, याच विचारात देवांगी व्यग्र असायच्या. याची सुरुवात म्हणून कर्णबधिरतेशी लढणाऱ्या मुलांच्या उन्नतीसाठी ’जोश फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना दलाल यांनी कान-नाक-घसा विशेषज्ञ डॉ. जयंत गांधी यांच्यासोबत केली. श्रवण क्षमतेशी संबंधित भिन्न-भिन्न कमतरता असणाऱ्या मुलांचे सशक्तीकरण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची वाटचाल सुरु आहे. डॉ. दलाल यांचा एक विद्यार्थी बंगळुरूमधून सीबीएससी शाळेत शिकून मुंबईत स्थायिक झाला होता. पण, मुंबईत त्याला शिक्षण घेण्यात काही अडचणी येत होत्या. त्या मुलाची कर्णचाचणी करुन डिजिटल हियरएड मशीनचे तंत्रज्ञान वापरले, तर तो नीट ऐकू शकेल, असा सल्ला डॉ. दलाल यांनी त्या मुलाच्या पालकांना दिला आणि आश्चर्य म्हणजे, उपचारांपश्चात हा मुलगा ‘जोश फाऊंडेशन’च्या वक्तृत्त्व स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर झळकला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तर प्रचंड वाढलाच, पण त्याचबरोबर या घटनेने त्याचे आयुष्यच पूर्णपणे बदलून गेले. दहावीला तो मुलगा ९१ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला. एवढेच नाही, तर त्याने महाराष्ट्रात सीबीएसी बोर्डात दिव्यांगांमधूनही प्रथम क्रमांकावर बाजी मारली. योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढे हाच मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशातही रवाना झाला. सुरुवातीच्या काळात हे नवीन तंत्रज्ञान डॉक्टरांनी, दिव्यांगांनी, त्यांच्या पालकांनीही सहज स्वीकारले नसले तरी आज त्याचा आवर्जून वापर केला जातो.

 

२००४ पासून ‘जोश’च्या माध्यमातून डॉ. दलाल यांनी दिव्यांगांच्या शाळांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. सरकार मुलांना सर्वसाधरण श्रवणयंत्र देते. परंतु, प्रत्येक मुलाची ऐकण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार ही यंत्रे द्यायला हवी. पण, महागडी असणारी ही यंत्रे द्यायला कोणीही तयार नसते. त्यामुळे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून या डिजिटल श्रवणयंत्राबाबत डॉ. दलाल ठिकठिकाणी मार्गदर्शन करतात. अमेरिकेत बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी इतर क्षमतांबरोबरच नवजात बाळाच्या श्रवण क्षमतेचीही तपासणी केली जाते. तशी तपासणी भारतातही व्हायला हवी, असे डॉ. दलाल यांना वाटते. साधारणत: दीड वर्षांनंतरची मुले बोलायला लागतात. पण, जर अशी मुले बोलत नसतील, तर वेळीच त्यांची तपासणी केली पाहिजे. जितक्या लवकर त्यांच्या समस्येचे निदान होईल, तितक्याच तत्परतेने पुढील उपचार पद्धती निर्धारित करता येते. बरेचदा हे सर्व वेळेत न झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि त्यांची सार्वत्रिक प्रगती खुंटते. अनेक वेळा तर पालकांमध्ये पाल्याची कर्णबधिरता हे न्यूनगंडाचे कारण ठरते. अशा मुलांशी सामान्यपणे बोलायला हवे, त्यांना इतरांसारखीच वागणूक द्यायला हवी. ‘जोश’च्या माध्यमातून सात शाळांमध्ये क्रीडाशिक्षण उपक्रम सुरू आहेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येतो. रोजगारासाठी मदत केली जाते. या मुलांसाठी व्हॉईस ट्रेनिंग सुरू करण्याची आता डॉ. दलाल यांची इच्छा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!

 

- नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/