चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

    दिनांक  03-Jan-2019
 
 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांनी नागपुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

 

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी धर्माधिकारी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने एक तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व आणि नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

धर्माधिकारी ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव होता. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचाराला तितकेचे प्रतिसाद देत नव्हते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव शहरातील नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. धर्माधिकारी यांच्या निधनामुळे राज्यातील विधी क्षेत्र आणि समाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक श्रेष्ठ मानवतावादी व सच्चे गांधीवादी व्यक्तित्व गमावले असल्याचे दु:ख राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत घराण्यात जन्मलेल्या धर्माधिकारी यांच्यावर लहान वयातच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला. मुंबई उच्च न्यायालयात एक आदरणीय न्यायाधीश म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. न्या. धर्माधिकारी एक प्रभावी वक्ते आणि उत्तम लेखक होते. ते ग्रामविकास, श्रमिक प्रतिष्ठा व खादीचे खंदे पुरस्कर्ते होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गांधी जयंतीच्या दिवशी ते राजभवन येथे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर बोलले होते. त्यांच्या चिरंतन स्मृतींना मी अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो,असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

 
 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/