स्वच्छतेची ‘श्वेता’पत्रिका

    दिनांक  03-Jan-2019   

 

 
 
 
आज आपण एका शिक्षिकेची माहिती घेऊया, ज्यांनी आपल्या शाळेसह, परिसरात स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि शौचालय निर्मितीला प्रोत्साहन दिले. या शिक्षिकेचे नाव आहे श्वेता सिंग.
 

गावखेड्यांपासून शहरांपर्यंत वाड्यावस्त्यांपासून पाड्यापाड्यापर्यंत स्वच्छता व स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. स्वच्छताविषयक जनजागृतीमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेचाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून शौचालयाची, स्वच्छतेची महत्ता सांगितली. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत या क्षेत्रात भरीव असे कार्य झाले. शहराशहरात, गावागावात, शाळाशाळांत, शौचालयांची उभारणी करण्यात येऊ लागली. या अभियानात सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कर्मचारी-अधिकारी व शिक्षकांनीही सहभाग घेतला. आज आपण अशाच एका शिक्षिकेची माहिती घेऊया, ज्यांनी आपल्या शाळेसह, परिसरात स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि शौचालय निर्मितीला प्रोत्साहन दिले. या शिक्षिकेचे नाव आहे श्वेता सिंग.

 

श्वेता सिंग यांनी न केवळ विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शिकवण देऊन त्यांना घरात शौचालय उभारणीसाठी प्रेरित केले, तर या दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या छोट्याछोट्या प्रयत्नांनी प्रभावित होऊन गावकर्यांनी शौचालयाचे महत्त्व समजून घेतले आणि आपल्या घरांत त्याची उभारणीही केली. उत्तर प्रदेशच्या खोराबार ब्लॉक येथील पूर्व माध्यमिक विद्यालय सिकटौर विद्यालयातील शिक्षिका आणि हेल्थ नोडल अधिकारी श्वेता सिंग आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरनिराळ्या खेळांच्या, उपक्रमांच्या माध्यमातून, तसेच छायाचित्रांच्या साहाय्याने स्वच्छतेचे धडे देत आहेत. श्वेता सिंग इतकेच करून थांबल्या नाहीत, तर शौचालय उभारणाऱ्या आणि त्याचा वापर करणाऱ्या लोकांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार, सन्मानही केला जातो. स्वच्छता आणि शौचालय उभारणीबाबत श्वेता सिंग म्हणतात की, “सुरुवातीला आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी कोणतीही स्वच्छतेची काळजी घेतल्याविनाच येत असत. परिणामी, ते वेळोवळी आजारीही पडत, पण जेव्हापासून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची, साफसफाईची माहिती दिली जाऊ लागली, तेव्हापासून ते शिकले की, त्यांना कोणते कपडे घालून यायचे आहे, जेवण करण्याआधी, खाद्यपदार्थ खाण्याआधी कशाप्रकारे हात धुणे गरजेचे आहे.”

 

गोरखपूरमध्ये मेंदूज्वराचा मोठा प्रादुर्भाव होताना दिसतो. हा अस्वच्छता, घाण आदीपांसून पसरणारा आजार आहे. यापासून वाचण्यासाठी श्वेता सिंग यांनी विद्यार्थ्यांचा आधार घेतला. साहजिकच शाळेतल्या शिक्षिकेने समजावून सांगितलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी आपल्या घरी, आपल्या आई-वडिलांना सांगितल्या, शौचालयाचे महत्त्व सांगितले. ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. शौचालयाच्या वापराचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून श्वेता सिंग विद्यार्थ्यांना घेऊन छोटे छोटे कार्यक्रमही करतात. एवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या हात धुण्यावर एक गीतही तयार केले, जे त्या स्वतः विद्यार्थ्यांबरोबर गातातएक वेळ अशीही होती की, प्रारंभीला लोक शौचालय उभारणीसाठी नकार देतानाच दिसत. काही जण शौचालय तर बांधायचे, पण त्याचा वापरच करत नसत. त्याचवेळी श्वेता सिंग यांना एक कल्पना सुचली. विद्यार्थ्यांच्या साथीने त्यांनी स्टारचा-ताऱ्याचा आकार तयार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना शौचालयाचा वापर केल्यास त्यांच्या छातीवर स्टार लावले. याचा परिणाम असा झाला की, ज्या घरांतील लोक शौचालयाचा वापर करत नसत तिथे मुलांनी हट्ट केला की, शौचालयाचा उपयोग करा. जेणेकरून नंतर त्यांचा सन्मान करता येईल. मुलांनी आपल्या आई-वडिलांना स्टार लावले तर त्यांच्या आनंदाला पारावार राहत नसे.

 

कोणी कोणी आपल्या घरी शौचालयाची उभारणी केली आणि कोणी कोणी नाही केली, हा सवाल श्वेता सिंग नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना विचारतात. ज्यांच्या घरी शौचालय उभारले होते त्यांच्यासाठी मग वर्गातच टाळ्यांचा कडकडाट केला जातो आणि ज्यांनी शौचालय बांधले नव्हते त्यांना ते तयार करायला सांगितले जाते. २ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीनिमित्त शौचालय वापरासंबंधी पथनाट्यही सादर केले होते. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात यासाठी प्रयत्न केले आणि प्रचारफेऱ्याही काढल्या. याचा परिणाम असा झाला की, अनुदानाचे पैसे नाही मिळाले तरी लोकांनी आपापल्या घरी शौचालय बांधलेग्रामीण भागातील महिलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे सोपे नसते. यासाठी श्वेता सिंग यांनी चित्रांचा आणि कथा-कहाण्यांचा आधार घेतला. इंटरनेट आणि बाजारातून स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे त्यांनी खरेदी केली. आपल्या विद्यालयातही त्यांनी ही स्वच्छतेची, साफसफाईची प्रेरणा देणारी चित्रे लावली. याचा सकारात्मक परिणाम तिथे पाहायला मिळत आहे. लोकांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याचे ते अनुकरणही करू लागले आहेत. अस्वच्छतेमुळे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे इथल्या लोकांना समजले. अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रसार होतो, हे त्यांना कळले. उघड्यावर शौचाला जाण्याने काय काय नुकसान होते, हे त्यांना समजले. त्यानंतरच लोकांनी शौचालयाची उभारणी केली. आता इथले लोक म्हणतात की, ‘अस्वच्छतेशी आहे आमची लढाई!’ स्वच्छतेच्या जाणीव-जागृतीचे हे देशातल्या एका ठिकाणचे कामही कित्येकांसाठी प्रेरणादायक आणि ‘स्वच्छ भारत अभियाना’ला बळकट करणारे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/