हा ‘चौकीदार’च खरा संरक्षक...

    दिनांक  29-Jan-2019   

 

 
 
 
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून सुशासन आणि पारदर्शक कारभाराचा नारा देण्यात आला. मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत आपला हा नारा खरा करून दाखवत भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासन दिले, हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. २००४ ते २०१४ पर्यंतच्या काँग्रेस आघाडीच्या काळात सर्वत्र माजलेल्या बजबजपुरीच्या व अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची कारकीर्द विशेष उजळून दिसते. या सरकारच्या कार्यकाळात घेतला गेलेला जनहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे थेट अनुदान हस्तांतरण (डीबीटी). राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनी सरकारने जनतेसाठी दिलेल्या १ रुपयापैकी १५ पैसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर काँग्रेस व विरोधकांची कितीतरी सरकारे आली, पण या भ्रष्टाचारावर, मधल्या दलालांवर अंकुश लावण्याचे काम कोणीही केले नाही. कदाचित सत्ताधाऱ्यांचा अर्थपूर्ण स्वार्थ त्यात असू शकतो. पण मोदी सरकारने मात्र जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचा निश्चय केला आणि थेट अनुदान हस्तांतरण योजना अमलात आणली. ज्याचा फायदा अर्थव्यवस्थेला, जनतेला आणि पर्यायाने देशालाही मिळाला. यासंदर्भात समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार, सरकारने डिसेंबर २०१८ पर्यंत तब्बल १.१ लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. म्हणजेच जर ही योजना सरकारने राबवली नसती तर हा पैसा देशाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांच्याच घशात गेला असता! सरकारने सांगितले की, जवळपास आठ लाखांपेक्षा अधिक बोगस लाभार्थ्यांची नावे हटवल्यानेच देशाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा वाचू शकला. सरासरी विचार करता मोदी सरकारने या माध्यमातून वर्षाला जवळपास २० हजार कोटी रुपये वाचवले व ते खऱ्या गरजूंच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या खात्यात जमा केले. सरकारने आतापर्यंत जवळपास ६ लाख, ५ हजार, ९०० कोटींचे अनुदान वितरित केले आहे. आकडेवारीवरूनच लक्षात येते की, देशात याआधीच्या सरकारांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा त्यांची पाठराखण करून हजारो कोटींचा पैसा हडपला. पण, आता हा पैसा मधल्यामध्ये खाण्याचे मार्ग बूच लावून बंद केल्याने ही मंडळी चांगलीच चवताळली आहेत. आपला भ्रष्टाचाराचा कारभार त्यांना पुन्हा एकदा सुरू करायचा आहे, म्हणूनच हे सगळे लोक मोदी सरकारविरोधात भलतेसलते आरोप करत आहेत. पण जनता या लोकांच्या कावेबाजपणाला भुलणार नाही, तर उलट चौकीदारालाच पुन्हा निवडून देईल, याची खात्री वाटते.
 

देशविकासाला स्टीलची बळकटी

 

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात बहुतेकदा सकारात्मक घडामोडी आपल्यासमोर येत नाहीत किंवा त्यांना एखाद्या कोपऱ्यात तरी जागा मिळते. देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून तर सर्वत्र नकारात्मकतेचे काळे मळभ दाटून आल्याचे चित्र निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न विशिष्ट घराण्याच्या दावणीला बांधलेल्यांकडून केले गेले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर तर अशा गोष्टी जरा जास्तच वाढवून-चढवून सांगितल्या जातील. अशा विरोधाचीच लागण झालेल्या वातावरणात देशाच्या विकासाची आणि प्रगतीची दखल घेणे, त्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य ठरते. नुकताच भारताने जगातल्या स्टील उत्पादक देशांच्या पंक्तीत जपानला पछाडत दुसरा क्रमांक पटकावल्याचे वर्ल्ड स्टील असोसिएशनने (डब्ल्यूएसए) आपल्या अहवालातून सांगितले. आता भारतापुढे (१०.६५ कोटी टन) केवळ चीन (९२.८३ कोटी टन) असून भारतानंतर जपान (१०.४३ कोटी टन), अमेरिका (८.६७ कोटी टन), दक्षिण कोरिया (७.२५ कोटी टन), रशिया (७.१७ कोटी टन), जर्मनी (४.२४ कोटी टन), तुर्कस्तान (३.७३ कोटी टन), ब्राझील (३.४७ कोटी टन), इराण (२.५ कोटी टन) अशी पहिल्या दहा क्रमांकावरील स्टील उत्पादक देशांची स्थिती आहे. ‘डब्ल्यूएसए’च्या अहवालानुसार, २०१८ मध्ये भारताचे स्टील उत्पादन २०१७ च्या १०.१५ कोटी टनांवरून पुढे जात ४.९ टक्क्यांनी वाढले, तर जपानचे उत्पादन ०.३ टक्क्यांनी घटले. भारताचे स्टील उत्पादन वाढले असले तरी, आपण अजूनही स्टीलची सर्वाधिक आयात करणाऱ्यांपैकी एक आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. पण, या आयातीवरून व वाढत्या उत्पादनावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे स्टीलचा वापर हा मोटारगाड्या, विमाने, उद्योगधंदे, रसायन उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. दुसरे म्हणजे उत्पादन आणि आयातही वाढतीच राहत असेल तर संबंधित क्षेत्रात स्टीलचा वापरही होतोच आहे. तिसरे म्हणजे, मागणी असेल तर उत्पादनाला काही अर्थ प्राप्त होतो, जो स्टीलच्या उत्पादनातून आपल्याला दिसतो. म्हणजेच देशाच्या औद्योगिक व कृषी वगैरे क्षेत्राची घोडदौड सुरूच आहे, त्यात कुठेही घट झालेली नाही, तर मोदी सरकारच्या धोरणांमुळे ज्यांची दुकाने बंद झाली, तेच तसा अपप्रचार करत आहेत. प्रत्यक्षात देश पुढे आणि पुढेच जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/