भाजप युतीसाठी लाचार नाही ! मुख्यमंत्र्यांनी सुनावले

    दिनांक  28-Jan-2019


 


युती हवी, पण हिंदुत्वासाठी

 
 

जालना“होय, आम्हाला युती हवी आहे. परंतु ती हिंदुत्वासाठी हवी आहे. हिंदुत्व एकत्र राहावे, भ्रष्टाचारविरोधी शक्ती एकत्र राहाव्यात म्हणून हवी आहे. जो हिंदुविरोधी असेल, तो सोबत येणार नाही. बाकी सारे सोबत असतील. भाजप हा काही युतीसाठी लाचार नाही.अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले. जालना येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, राज्य मंत्रीमंडळातील भाजपचे मंत्री, राज्यातील भाजप खासदार, आमदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आपल्या संबोधनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रूद्रावतार चर्चेचा विषय ठरला. ते म्हणाले की, संत रामदास स्वामींच्या भूमीत मी हेच म्हणेन की, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अधिष्ठान पाहिजे संघटनेचे. आगामी निवडणूक ही भारताच्या भविष्याची, भवितव्याची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. २०१४ मध्ये झालेल्या परिवर्तनावर या निवडणुकीत आपल्याला शिक्कामोर्तब करायचे असून महा'ठग'बंधनामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. माझ्यानंतर कोण, अशी चिंता आपला पक्ष करीत नाही. आपण लोककल्याणाची काळजी घेतो, असेही त्यांनी सांगितले.

 

आपले काम जनतेत घेऊन जाण्याचे काम आता प्रभावीपणे करा, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारच्या शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, पंतप्रधान पिक विमा योजना, जलयुक्त शिवार आदींसह अनेक योजना व कामांचा उल्लेख केला. भाजप संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या सीएम चषक व बिरसा मुंडा रथयात्रा या दोन्ही उपक्रमांची प्रशंसा त्यांनी केली. खोटे बोल पण रेटून बोल, हे काँग्रेसचे तंत्र असल्याची टीका करत, खोटे बोलताना लाज वाटेल, ती काँग्रेस कसली, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. मोदींना सत्ता हवी आहे, ती लोककल्याणासाठी आणि काँग्रेसचा सत्तासंघर्ष आहे तो दलाली खाता यावी यासाठी, अशी टीका त्यांनी केली. सत्ता नाही, भारतमातेची सेवा हेच आपले लक्ष्य असून भारतमातेची सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हेच आपले अर्जुनाप्रमाणे एकमेव लक्ष्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

 

आम्ही ‘बि’घडलो.. चंद्रकांतदादांच्या पद्याला कार्यकर्त्यांची साथ

 

या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात चक्क ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना’ हे प्रसिद्ध पद्य सादर केले व उपस्थित कार्यकर्त्यांसह सर्वांनीच चंद्रकांतदादांच्या पाठोपाठ हे पद्य म्हटले. यानंतर पाटील यांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणा दिल्या, त्यांनाही कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यामुळे चंद्रकांतदादांच्या या पद्याची एकच चर्चा सभास्थानी रंगली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/