महाराष्ट्रधर्म लांछीला काही, तुम्हां कारणे!

    दिनांक  28-Jan-2019   


 


"एकेकाळी मी तुमच्या भाषणांचा चाहता होतो. मधल्या काळात तुमच्या काही भूमिका खटकल्या, परंतु तुमच्याबद्दल असलेला आदर कायम राहिला. तुमच्याकडून आम्हाला काही आशा होत्या. परंतु, त्या आशा, तो आदर आज पार धुळीला मिळाला." - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर समाजमाध्यमांवरून उमटलेल्या या प्रतिक्रिया आहेत. प्रजासत्ताकदिनी राज ठाकरे यांनी आपले एक व्यंगचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले आणि तिथे ‘राज ठाकरे’ या व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंड्याऐवजी स्वातंत्र्यदेवतेस गळफासावर लटकवत आहेत आणि त्यामुळे ती मरणासन्न अवस्थेत गेली आहे, अशा आशयाचे ते व्यंगचित्र होते. हे कथित व्यंगचित्र पाहताच सर्वसामान्य नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इतकेच नाही तर राज यांच्या उरलासुरल्या समर्थकवर्गानेही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

 
एरवी राज यांच्या भूमिका पटो वा ना पटो, त्यांच्या वक्तृत्वाला दाद देणारा, किमान त्यातल्या नकला आणि टिवल्याबावल्यांवर तरी मनापासून हसणारा एक वर्ग आजही महाराष्ट्रात शिल्लक आहे. मनसे एव्हाना प्रतिदिन विझत चालली आहे, परंतु राज यांचा टीआरपी मात्र कायम असल्याचे दिसते. २०१४ मध्ये मोदींना त्यांनी मागितले नसताना उगाचच समर्थन देण्याचा आततायीपणा करून झाल्यानंतर लगेच पलटी खात मोदींचा तीव्र विरोध करणारे राज ठाकरे लोकांना खटकले होतेच. परंतु, परवा त्यांनी जे काही केले ते कुणालाच रूचले नाही. एवढाच जर मोदीविरोध उतू जात असेल, आणि राज्याचा कळवळा आला असेल, तर पिंजून काढा महाराष्ट्र, करा आंदोलने-सभा, गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे उभे करा, सरकारविरोधी भूमिका नेटाने लावून धरा.. कुणी अडवले आहे काय? उलट सक्षम विरोधी पक्ष उभा राहणे लोकशाहीसाठी चांगलाच. परंतु, ते करण्याची इच्छा जर खरोखरच राज ठाकरेंकडे असती तर एव्हाना त्यांनी ते केले असते. त्यांनी प्रत्यक्षात काय केले, हे महाराष्ट्र आज पाहतो आहेच.
 
 
शिवसेनेतून बाहेर पडत असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम युवकांना जी स्वप्ने दाखवली ती नवनिर्माणाची होती. आपल्या पक्षाचे नावही त्यांनी ‘नवनिर्माण सेना’ वगैरे ठेवले. वास्तव विचार करणारा, हृदयाला भिडणाऱ्या प्रश्नांना बिनधास्तपणे हात घालणारा, विकासाबाबत नेमकी दृष्टी असलेला नेता अशी राज यांची प्रतिमा तयार होऊ लागली होती. मध्यंतरी त्यांचे ते ‘सौंदर्यवादी दृष्टिकोना’चे व्हिडिओही समाजमाध्यमांवर चालत होते. परंतु, नवनिर्माण करू म्हणता म्हणता, जे आहे त्याचीही वाट लावून टाकू, अशा मानसिकतेकडे मनसे नेतृत्व कधी गेले हे कोणालाच कळले नाही.
 

मराठी मनाचा घात...

 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीच्या असंख्य जागा पाडल्याचा आसुरी आनंद राज ठाकरे यांच्या ‘अपुन ने एकही मारा, लेकीन सॉलिड मारा’ या वाक्यातून जाणवला. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आपले १३ आमदार निवडून आले याचा आनंद होण्यापेक्षा शिवसेना-भाजपचे आमदार पाडले, याचा आनंदच त्यांना जास्त झालेला दिसत होता. तेव्हाच खरेतर महाराष्ट्राने खरे काय ते ओळखून जायला हवे होते. २००९ ते २०१४ या काळात मनसेला आणि नेतृत्वाला ना काही नवनिर्माण करता आले, ना जे आहे ते सुधारता आले. राहिले ते नुसते पोकळ शब्दांचे बुडबुडे. तेच तेच रोज ऐकून कंटाळलेल्या जनतेने मग मतपेटीतून आपले मत व्यक्त करायला सुरुवात केली. एकामागोमाग एक निवडणुकींत मनसेचा धुव्वा उडू लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमएवढेही आमदार निवडून येऊ नयेत, इतकी बिकट अवस्था झाली. मग पुन्हा भावनांना साद घालत, थेट अटलजींच्या १९८४ मधील वाक्यांचे संदर्भ देत मनसेमध्ये जीव आणण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. तेव्हाही अनेकांना पुन्हा एकदा राजप्रेमाचे उमाळे आले होते. हा असा लोकभावनेला हात घालून पुढे राज यांनी काय केले? तर स्वातंत्र्यदेवतेला मरणासन्न अवस्थेत दाखविणारी व्यंगचित्रे काढली.

 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची वक्तृत्वशैली, देहबोली, वेशभूषा यांची नक्कल करू पाहणाऱ्या राज यांच्याकडे बाळासाहेबांप्रमाणेच व्यंगचित्रकाराची दृष्टीही लाभली आहे. मात्र, बाळासाहेबांनी स्वातंत्र्यदेवतेस मृतप्राय दाखविण्याचा कधी विचारही केला नाही. स्वा. सावरकरांना मानणाऱ्या, किमान तसे भासवणाऱ्या राज यांना मात्र मोदीद्वेषापोटी आपण काय करू लागलो आहोत, याचेही भान राहिले नाही. स्वतः नवे काही निर्माण करण्याऐवजी साऱ्या जनतेचा तेजोभंग करणे, ही कसली कला? हा भारतमातेचा तर आहेच परंतु कलेचाही अपमान आहे. मध्यंतरी गणेशोत्सवाच्या दरम्यानही राज यांनी असेच खालच्या दर्जाचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. कलाकाराची अभिव्यक्ती ही इतक्या खुज्या स्तरावर होत असेल, तर त्याला खरोखरच कलाकार म्हणावे काय, असा प्रश्न पडतो.
 
 
सत्ताधाऱ्यांना विरोध, टीकाटिप्पणी झाली पाहिजेच, विरोधी पक्षांचे कामच ते आहे. मात्र, या विरोधाची जागा मत्सर, द्वेष घेतो तेव्हा त्या मत्सराने पछाडलेल्या व्यक्तीची अभिव्यक्ती किती खालच्या स्तराची असू शकते, हे राज ठाकरे यांच्या ताज्या व्यंगचित्रातून दिसून येते. ज्या मराठी माणसाचे ते उठसूट नाव घेतात, त्या मराठी माणसाचे संवेदनशील मन राज ठाकरे यांच्या या कृत्याला कधीही माफ करणार नाही, एवढे निश्चित.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/