शक्तिप्रदर्शनाच्या वाटेवर अरब?

    दिनांक  27-Jan-2019   कॅलिफोर्नियाच्या मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे मिसाइलतज्ज्ञ जेफरी लुइस यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, खाडी प्रदेशातील सौदी अरब हा देश सध्या आपल्या क्षेपणास्त्रांची ताकद वाढवण्यासाठी बॅलेस्टिक मिसाइलच्या निर्मितीसाठी आणि परीक्षणासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे.


अमेरिका, चीन आणि अरब या तीनही देशांमध्ये सतत काहीतरी घडत असते. कधी हे तीन देश एकमेकांचे मित्र असल्याचे भासवतात, तर कधी या तीन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू असते. कारण, ट्रम्प, जिनपिंग आणि मोहम्मद बिन सलमान या तिघांचीही तोंडं तीन वेगवेगळ्या दिशांना असतात. मात्र, आताही काहीशी अशीच परिस्थिती उद्भवण्याची चिंता आणि शक्यता वर्तविली जात आहे. कॅलिफोर्नियाच्या मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे मिसाइलतज्ज्ञ जेफरी लुइस यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, खाडी प्रदेशातील सौदी अरब हा देश सध्या आपल्या क्षेपणास्त्रांची ताकद वाढवण्यासाठी बॅलेस्टिक मिसाइलच्या निर्मितीसाठी आणि परीक्षणासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील काही फोटोसुद्धा सध्या समाजमाध्यमांवर गाजत आहेत. खरंतर अरब हा देश या अशा छुप्या कारवायांसाठी जगप्रसिद्ध. पण मुळात गेली अनेकवर्षे इराण आणि इस्त्रायल हे दोन देश मिसाइल व क्षेपणास्त्रांचा गैरवापर करतात आणि त्यांची छुपी चाचणी करतात असे आरोप करणारा अरब देश आता स्वत: त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे.

 

एकीकडे आपण कसे धुतलेल्या तांदळासारखे ते दाखवायचे आणि दुसरीकडे स्वत: तेच करायचे असा काहीसा अरब देशांचा इतिहास. त्यात त्यांना राजा मोहम्मद बिन सलमान याने याआधीच आपल्याल सर्वशक्तिमान व्हायचे असल्याचे संकेत देत चीनकडून बॅलेस्टिक मिसाइलची खरेदी केली. याचा थेट परिणाम झाला होता, तो अरब आणि अमेरिका यांच्यातल्या मैत्रीवर. कारण, सवयीप्रमाणे अमेरिका हा सौदीला आपला सुरक्षा आणि व्यवसाय मित्र मानतो. याचे एक कारण म्हणजे अरब देशातील ३० टक्के तेलखरेदी ही अमेरिका करते. त्यामुळे दोघांच्या या नात्यात चीनने केलेला हस्तक्षेप तेव्हाही अमेरिकेला आवडला नव्हता. आताही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्रकार खशोगी यांच्या हत्येवरून वादंग आणि सौदीचे येमेनमध्ये सुरू असलेले युद्ध या सगळ्यात बॅलेस्टिक मिसाइलची निर्मिती म्हणजे प्रिन्स सलमानचा शक्तिप्रदर्शनाचा डाव आहे की काय, अशी शंका अमेरिकेतही व्यक्त केली जात आहे.

 

या सगळ्याकरिता सौदीने चीनशी हातमिळवणी केली असणार हेसुद्धा तितकेच स्पष्ट आहे. कारण, सद्यपरिस्थितीत चीन हा देश बॅलेस्टिक मिसाइल बनवण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे सौदीने चीनची मदत घेतलीच असणार. मिसाइलतज्ज्ञ लुईस यांच्या मते, "सौदीमध्ये जे मिसाइल बनत आहेत, त्या प्रकारचे मिसाइल फक्त चीन वापरते. चीनने सौदी आणि खाडी प्रदेशातील इतर देशांना मोठ्या संख्येने सशस्त्र ड्रोनची विक्री केली आहे." चीनकडून होत असलेली ही मोहीम रोखण्यासाठीच अमेरिकेने या अशा शस्त्रांच्या विक्रीवर बंदी घातली होतीबॅलेस्टिक मिसाइल हे सर्वात ताकदवान मिसाइल मानले जाते. कारण, या मिसाइलच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबपर्यंत दारुगोळा घेऊन जाता येतो. सौदी हे असे प्रयोग करणार याचा प्रत्यय खरंतर २०१४ सालीच आला होता. जेव्हा सौदीचा राजा मोहम्मद बिन सलमान याने जर इराण किंवा इतर देश हे असे प्रयोग करणार असतील, तर आम्हीही मागे हटणार नाही, असे संकेत दिले होते. कदाचित सौदी आणि सलमान यांच्या या वक्तव्याला इतर देशांनी विशेष महत्त्व दिले नाही. त्यामुळे आता सौदी कुणाचं ऐकेल असं वाटत नाही. आता या सगळ्या प्रकरणावर ना चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने काही भाष्य केले, ना सौदीच्या सुरक्षा मंत्रालयाने. त्यामुळे जर सौदी असे प्रयोग करत असेलच, तर त्याचा धोका हा इराण, येमेन आणि इस्रायलला जास्त असेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/