राजकुमार शुद्धीत या

    दिनांक  27-Jan-2019   

 

 
 
 
रा. स्व. संघप्रणित सेवाकार्य हे आधुनिक सेवातीर्थ आहे. अर्थात, कुणी निंदा कुणी वंदा अशा भावाने चालणारे हे सेवाकार्य प्रसिद्धीपासून दूरच आहे. त्यामुळे डोळेबिळे मारून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकुमारांना या सेवाकार्याची माहिती नसावी, असे गृहित धरूया. पण माणसाने किती बेशुद्धीत राहावे? किती काळ झोपेचे सोंग घ्यावे किंवा किती काळ जनतेला मूर्ख समजून काहीबाही बरळावे? याला काही मर्यादा आहेत. कदाचित तेही त्यांचे ढोंग असेल? इतकी उदाहरण द्यायचे कारण, राजकुमारांनी म्हटले आहे की, “शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही ‘ते’ घुसले आहेत. ‘त्यांना’ आव्हान देणे आवश्यक आहे”. असे राजकुमार कुणाबाबत म्हणाले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत. जल बिन मछलीसारखे देशाचा पंतप्रधान होण्यासाठी राहुल तडफडत आहेत. मात्र, आज देशाच्या बहुतेक सर्वच सर्वोच्च सत्तापदी असलेल्या व्यक्ती ज्या रा.स्व.संघाच्या वैचारिक मुशीतून घडल्या, त्या रा.स्व.संघाच्या कामाबद्दल माहिती घ्यावीशी राजकुमार राहुल यांना अजिबात वाटले नाही. आपल्या सत्तेच्या चौकटीपुरते जगणाऱ्या या राजकुमारांनी पुढची ट्रीप इटली, थायलंड वगैरेला न करता भारताच्या दुर्गम भागात काढावी तेही ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे’चा मंत्र जपत. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावर नांगर फिरवून संपूर्ण देशात कोणत्या संघटनेचे लोक नि:स्वार्थी सेवा करत आहेत ते त्यांना समजेल. अगदीच नाही फिरावासा वाटला भारतदेश तरी, उदाहरणासाठी त्यांनी चित्रकूट पाहावे. महाराष्ट्रात आलात, तर यमगरवाडी पाहावी. ही केवळ उदाहरणं आहेत. ते पुढे म्हणतात की, “रा. स्व. संघाच्या या क्षेत्रातील एकाधिकारशाहीला आव्हान देणे आवश्यक आहे.” आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात भारतीय जनतेला अनुकूल असे काही करावेसे त्यांना वाटत नाही; तर त्यांना आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्रेही सत्तेची केंद्रे वाटतात. सत्तेच्या स्वार्थाने माणसाने किती आंधळे व्हावे? वर त्यांना रा. स्व. संघाच्या कामाला आवाहन द्यायचे आहे. जरूर द्यावे. रा. स्व. संघ सर्वच क्षेत्रात ज्या प्रकारे काम करतो, त्याप्रकारे राजकुमारप्रणित संघटनांनी काम करावे. जनता स्वागतच करेल. पण रूप घेता येते, गुण नाही. अर्थात, हे कळायलाही माणूस शुद्धीत असायला हवा. सदानकदा रा. स्व. संघाच्या मत्सराच्या बेशुद्धीत असलेल्यांना काय कळणार? देव जाणे राजकुमार कधी शुद्धीत येतील?
 

‘देवबंद’चा झिंदाबाद

 

देवबंद येथे मुल्लांनीहिंदुस्थान झिंदाबाद’ला मान्यता देत ‘भारत माता की जय’ला नकार दिला आहे. अर्थात, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओसंडून वाहत आहे. त्यामुळे देवबंद येथे कुणी काय म्हणावे, ही वैयक्तिक बाब. पण त्याचवेळी असे म्हणणाऱ्यांच्या मानसिकतेचा शोधही घ्यावासा वाटतो. ‘देश हा देव’ असे म्हणण्याची परंपरा आपल्या देशाची आहे. पण इथे देश हा केवळ भूमीचा तुकडा असून, देव ही संकल्पना मानत नसल्यामुळे त्यांनी भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार दिला. अर्थात, धार्मिक निष्ठा जपण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही देव वगैरे मानत नसून अल्लाहचाच जयजयकार करू, असे ते संविधानाचा दाखला देत जरूर म्हणतील. पण ज्या देशाच्या मातीत जन्मतो, जगतो आणि त्याच मातीत विलीन होणार, त्या देशाला माता म्हणण्यास नकार देणे याला कोणता तर्कवाद आहे? दुसरीकडे स्वातंत्र्यापूर्वी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करतानाही मुस्लीम नेत्यांचे म्हणणे होते की, हा हिंदुस्थान आहे आम्हाला आमचा देश हवा आहे. याचाच अर्थ त्यांच्या मते, त्यावेळीही भारत हा हिंदुस्थान होता. त्यानंतर भारतातून फुटून निघालेल्या मुस्लिमांचा देश तयार झाला पाकिस्तान. मात्र, कालांतराने काही तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांनी (त्यातले बरेच स्वयंघोषित आहेत) कल्लोळ माजवला की, या देशात काय हिंदूच राहतात का? या देशात इतरही (म्हणजे मुस्लीमही राहतात) त्यामुळे देशाला हिंदुस्थान म्हणून नये. आता या तमाम निधर्म्यांची आली का पंचाईत. ज्यांच्यासाठी ते भारताला हिंदुस्थान म्हणून नका सांगत होते. त्यांच्यातल्याच एका प्रभावी गटाने देशाला हिंदुस्थानच म्हटले आहे. ओवेसी बंधूंच्या वळचणीला गेलेल्या आणि तिथून काँग्रेस कधी सत्तेचे हाडूक टाकेल या आशेत असलेल्या प्रकाश रावांचीही गोची झाली. कारण, त्यांना हिंदू शब्दाची भयंकर अ‍ॅलर्जी. पण आता त्यांच्या चाहत्या गटाच्या (ओवेसीबंधूंच्या) मक्तेदारांनीच देशाला भारताऐवजी ‘हिंदुस्थान’ म्हटले आहे. असो, प्रकाश राव आणि तमाम डाव्या बंधूना, निधर्मी भावांना काहीही वाटले तरीही ‘भारतमाता की जय’ आणि ‘हिंदुस्थान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा...’

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/