शहरं आणि पर्यावरणपूरक जीवनशैली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वस्तू आधी वेगळ्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि ऊर्जा लागते. तरीसुद्धा १०० टक्के वर्गीकरण होत नाही. ओल्या कचऱ्यात प्लास्टिकचे बारीक कण मिसळले जातात. याला उपाय एकच. कचऱ्याचं वर्गीकरण हे घरातच व्हायला हवं, जे सहज शक्य आहे.
 

शहरात राहणारं, उच्चशिक्षित, मोठ्या पगाराची नोकरी करणारं एखादं जोडपं अचानक पर्यावरणपूरक जीवनशैलीची आवड म्हणून दूर कुठेतरी आडगावात छोटीशी जमीन विकत घेऊन, तिथे मातीचं वगैरे घर बांधून राहायला लागतं, अशा अनेक कथा हल्ली कानावर येत असतात. असा धाडसी निर्णय घेणाऱ्यांचं आणि तो अंमलात आणणाऱ्यांचं कौतुक आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती ही शहरांच्या तुलनेत खेडेगावांमध्ये जास्त असते हे खरं आहे. पण शहरातही पर्यावरणपूरक राहता येऊ शकतं, हेही तितकंच खरं आहे. किंबहुना आज शहरं हीच प्रदूषणाचा मुख्य स्रोत बनली आहेत. आर्थिक विकासासाठी शहरीकरण होतच राहणार. पण आपलं शहर हे प्रदूषणाचा स्रोत बनू न देणं ही सर्वस्वी तिथे राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी ठरते.

 

पुण्याच्या जीवनदायिनी असणाऱ्या मुळा-मुठा नद्या सध्या ‘सांडपाणीवाहिन्या’ झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? हा विचार केल्यास याचं मूळ हे जीवनशैलीतच सापडतं. ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ने केलेल्या अभ्यासानुसार, मुळा-मुठा नद्यांचं ७० टक्के प्रदूषण हे घरगुती सांडपाण्यामुळे होत आहे. म्हणजेच आपण वैयक्तिक आणि घराच्या स्वच्छतेसाठी टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, फिनेल, फ्लोअर क्लिनर इ. वस्तू वापरतो. त्यातील रसायनं पाण्यात मिसळून थेट नदीत जातात. ‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति’ असं एक संस्कृत वचन आहे. म्हणजेच कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी अंतिमतः तो विष्णूपर्यंत पोहोचतो. तसंच प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी वापरली जाणारी रसायनं अंतिमतः नदीत वा जवळपासच्या जलस्रोतात जाऊन मिळतात. प्रत्येक माणूस दिवसाला सुमारे ४० ग्रॅम इतकी रसायनं वापरत असतो. पुणे शहराचा विचार केला, तर माणशी ४० ग्रॅम गुणिले पुण्याची ५० लाख लोकसंख्या, म्हणजेच सुमारे दोन लाख किलोग्रॅम एवढी रसायनं रोजच्या रोज नदीत मिसळत आहेत. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला, तर हा आकडा दुप्पट होतो आणि हे वास्तव आहे.

 

 
 

यावर उपाय म्हणून टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, इ. रसायनयुक्त पदार्थ वापरू नका, त्याऐवजी दंतमंजन, उटणे, रिठा, राख असे नैसर्गिक पदार्थ वापरा असं पर्यावरणप्रेमींकडून सांगितलं जातं. मुळा-मुठा नद्यांच्या स्वच्छतेसाठी काम करणारी पुण्याची ‘जीवितनदी फाऊंडेशन’ ही संस्था अशा प्रकारच्या ‘विषमुक्त जीवनशैली’चा प्रचार करण्याचं काम करते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळतो. परंतु, व्यापक प्रमाणात हा बदल होणं हे सध्यातरी आव्हानात्मक वाटतं. कारण, टूथपेस्ट, साबण इ. वस्तू आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. जाहिरातींमधून, शैक्षणिक अभ्यासक्रमातून आणि आधुनिक वैद्यकशास्त्रातून या सगळ्या वस्तूंचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवल्यामुळे या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी आपली मानसिक तयारी होत नाही. याबाबतीत एक सारासार विचार असा की, जर या वस्तूंचा वापर पूर्णपणे टाळता येत नसेल, तर तो कमी तरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करावा. ‘रिफ्युज नाहीतर रिड्युस’ हे तत्त्व माणसांनी पाळायला हवं. ‘रिफ्युज’ म्हणजे पर्यावरणाला घटक ठरणाऱ्या वस्तूचा वापर पूर्णपणे टाळणं. हे जमत असेल तर उत्तम! पण नसेल जमत, तर किमान त्याचा वापर कमीत कमी पातळीवर कसा ठेवता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतील. म्हणजे सकाळी आणि रात्री असे दोन वेळा मी टूथपेस्टने दात घासत असेन, तर दोनपैकी कुठल्यातरी एका वेळी मी दंतमंजन वापरलं तरी, टूथपेस्टचा वापर निम्म्यावर येईल! आंघोळीसाठी साबणाची वास्तविक काहीच जरूर नसते. नुसतं हाताने खसखसून घासल्यानेही शरीर स्वच्छ होतं. शिवाय साबणाला उटण्याचा नैसर्गिक पर्याय आहेच. पण तरीही, सवय झालेली असल्यामुळे साबण लावून आंघोळ केल्याशिवाय आपलं समाधान होत नाही. मग आठवड्यातले किमान तीन दिवस मी साबण न लावता आंघोळ करू शकतो का? जेणेकरून माझा साबणाचा वापर निम्यावर येईल! हा विचार प्रत्येक नागरिकाने करून तशी कृती आपल्याकडून होण्याची गरज आहे. 

 

 
 

भांडी घासणं, लादी स्वच्छ करणं, बेसिन घासणं, संडास-बाथरूम घासणं या सर्वांसाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय म्हणजे राख. राख आम्लारीधर्मी असल्याने ती पाण्यात मिसळली असता पाणी शुद्ध ठेवण्याचं काम करते. खेडेगावांमध्ये अजूनही चूल पेटवली जात असल्यामुळे राख सहज उपलब्ध होते. शहरात ती कशी उपलब्ध होणार? त्याचा एक सहजसोपा मार्ग म्हणजे ‘अग्निहोत्र’. आपल्या वैदिक संस्कृतीत ‘अग्निहोत्र’ नावाचा विधी सांगितलेला आहे. हा विधी म्हणजे यज्ञाची/होमाची छोटी आवृत्ती. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी एका तांब्याच्या पात्रात देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर, हातसडीचा तांदूळ, देशी गाईचं तूप असं एकत्र करून अग्नी पेटवायचा. अग्निहोत्राचे मंत्र म्हणून सूर्याला तूप लावलेल्या अक्षतांची आहुती द्यायची. कुणालाही सहज करता येईल, असा हा फक्त १० मिनिटांचा विधी आहे. यामुळे मन:शांती मिळते, याच्या धुरामुळे घरातली डास-चिलटं कमी होतात, हे सगळे फायदे आहेतच. पण याचा पर्यावरणासाठी होणार फायदा म्हणजे याची राख, जी आपण घरगुती स्वच्छतेसाठी वापरू शकतो आणि रसायनांचा वापर टाळू शकतो. संपूर्ण अग्निहोत्र विधी करणं शक्य नसेल, तर नुसत्या शेणाच्या गोवऱ्या जाळूनही राख उपलब्ध होऊ शकते.

 

 
 

दुसरा एक कळीचा मुद्दा म्हणजे कचरा. पुण्यातल्या धायरी परिसरातल्या एका कचरा पुनर्चक्रीकरण करणाऱ्या कारखान्याला मध्यंतरी भेट देऊन आलो. धायरी-सिंहगड रोड परिसरातल्या सोसायट्यांमधला कचरा तिथे एकत्र केला जातो. त्याचं ‘ओला कचरा’ आणि ‘सुका कचरा’ असं वर्गीकरण केलं जातं. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवलं जातं आणि प्लास्टिकपासून फर्नेस ऑइल तयार केलं जातं. पण हा कारखाना चालवण्यातली एक मुख्य अडचण तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितली, ती म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण. ‘कचरा’ म्हटलं की त्यात शेकडो वस्तू असतात. प्लास्टिक पिशव्या, कागद, शिळं अन्न, घराचा केर, भाज्यांची सालं; एवढंच नव्हे, तर चप्पल, सॅनिटरी नॅपकिन, जुने कपडे, जुन्या टाकाऊ वस्तू... अशा शेकडो प्रकारच्या वस्तू कचराकुंड्यांमध्ये एकत्र झालेल्या असतात. कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वस्तू आधी वेगळ्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि ऊर्जा लागते. तरीसुद्धा १०० टक्के वर्गीकरण होत नाही. ओल्या कचऱ्यात प्लास्टिकचे बारीक कण मिसळले जातात.

 

 
 

याला उपाय एकच. कचऱ्याचं वर्गीकरण हे घरातच व्हायला हवं, जे सहज शक्य आहे. आदल्या दिवशीचा उरलेला आमटी-भात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कचराकुंडीत टाकायचा, अशा सवयी आपल्याला बदलाव्याच लागतील. रोजचा ओला कचरा एका बादलीत वा माठात साठवून तो अधूनमधून सोसायटीतल्या झाडांच्या मुंधात घालणं प्रत्येक नागरिकाला सहज जमू शकतं. प्लास्टिक पिशव्या धुवून पुन्हा वापराव्यात अथवा त्या साठवून ठेवून जवळपासच्या पुनर्चक्रीकरण करणाऱ्या कारखान्यात द्याव्यात. मुंबई-पुण्यात अलीकडे ई-कचरा संकलन केंद्र सुरू झाली आहेत. आपल्या घरचे जुने मोबाईल हँडसेट, इअरफोन, चार्जर इ. इलेक्ट्रॉनिक वस्तू कचराकुंडीत बिलकुल न टाकता जवळपासच्या संकलन केंद्रातच जमा केली जायला हवीत. यासाठी महिन्यातला एखादा दिवस वेळ काढणं प्रत्येक नागरिकाला शक्य नाही कापर्यावरण रक्षण हे आपलं नुसतं नैतिक कर्तव्य नाही, तर ते आपलं राष्ट्रीय, घटनात्मक कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या ११ मूलभूत कर्तव्यांपैकी सातवं कर्तव्य पर्यावरणरक्षणाचं आहे. हे कर्तव्य आपण पाळत नाही, तोपर्यंत ‘सरकार काही करत नाही’ हे म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@