सेवाकार्य ते आतंक

    दिनांक  24-Jan-2019   

 

 
 
 
 
पूर्वी असा समज होता की, निरक्षर, समाजाचे भान नसलेल्या लोकांना दुष्ट लोक धर्माच्या नावावर चिथवतात. ते काय बिचारे भोळेभाबडे लोक. त्यांना काय माहिती दुनियादारी? मग अशा लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता, असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो, असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा ‘इसिस’सारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे ‘बंदे’ असण्यासाठी ते पात्र आहेत का? हे स्पष्ट व्हायला हवे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ला इराकपासून संपूर्ण मध्य पूर्वेसह थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामची राजवट स्थापन करून तथाकथित खलिफाची राजवट आणायची आहे. दुर्दैवाने, भारतीय मुस्लीम तरुण ‘इसिस’च्या या इस्लामिक राज्याच्या दाव्याला बळी पडलेले दिसतात. तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये विशिष्ट समाज एकवटला आहे, तर त्या एकवटलेल्या समाजातील काहींना कट्टरतेकडे आणि पर्यायाने देशद्रोहाकडे, मानवद्रोहाकडे नेणाऱ्या प्रवृत्ती तिथे सक्रिय झाल्याचे दिसते. गरीब वस्तीत जायचे किंवा धार्मिक कार्यक्रमात जायचे; गरीब असतील तर त्यांना सोनेरी स्वप्नांचे भविष्य दाखवायचे आणि धार्मिक असतील तर त्यांना जन्नत-दोजख वगैरे सांगायचे. असले धंदे करून तरुणांना आपल्या अतिरेकी पाशात ओढण्याचे काम अतिरेकी संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. यासाठी वस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करण्याचे ढोंग ते उत्तमपणे वठवतात. अशा ढोंगांना बळी पडणारेच पुढे रक्तपिपासू पशू बनतात, याचे दुःख आहे.
 

बापरे! ‘इझमवाली’ पगडी?

 

इझमचा शिक्का असलेली संमेलनाध्यक्षाची पगडी घालणार नाही,” असे मत १९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. प्रत्येकाचे स्वतःचे असे अभिव्यक्त होणे गरजेचे असते. आता प्रश्न असा आहे की, प्रेमानंद गज्वी यांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना पगडीबिगडीचा आक्षेप होता की नव्हता माहिती नाही. पण, कार्यक्रमाप्रसंगी असे काहीसे अभिव्यक्त झाले की, तथाकथित पुरोगामीपणाची झूल वाढते, हे अनुभवांती त्यांना माहिती असावे, हे नक्की. पगडी ही कोणता ‘इझम’ बाळगते? मागे शरदकाका आणि भुजबळ काकांनाही पगडीचे कोडे होते. पगडीखाली असे काय दडले आहे? खरे तर काही स्वघोषित पुरोगामी लोक स्वतःच्या मनात जातीय विष घेऊनच जगत आहेत. त्यांच्या प्रत्येक वागण्यात, बोलण्यात हे विष सहज येते. मात्र, आपल्या विषाला ते न्यायाचा आवाज, माणुसकीचा संदेश, यल्गार आणि सत्याची निष्पक्ष भूमिका वगैरे सांगतात. प्रेमानंद गज्वी जेव्हा म्हणतात की, “नकार, विद्रोह आणि अंत्योदयाचा विचार असलेल्या नाटकांना लोकाश्रय लाभत नाही” तेव्हा वाटते की, गज्वीही कोणत्या तरी ‘इझम’चा पुरस्कार करत आहेत. “बाबरी ते दादरीला लोकाश्रय मिळाला नाही,” असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा वाटते की, सच्च्या भावना आणि विचारांना जागून कुणाचाही तिरस्कार न करता सहजपणे अभिव्यक्त होणाऱ्या कलाविष्काराला समाज स्वीकारतोच. पण, ‘मी म्हणतो तेवढेच काय नीतिमत्तापूर्ण, खरे बाकी सगळे फालतू, अविवेकी असे मानणे म्हणजे सर्जनशील कलाकृती असणे,’ हा जो काही तर्कहीन विचार आहे ना, तो आता बाद होत आहे. जर कलाविष्कारामधून व्यक्त होणारा नकार विद्रोह हा समाजाच्या अंत्योदयासाठी असेल तर ठीक आहे. मात्र, समाजात मुद्दाम अविश्वास, फूट पाडणाऱ्या आणि देशातली सगळी सकारात्मकता डावलून प्रत्येक गोष्टीत जातीयतेची विषवल्ली शोधू पाहणाऱ्या आणि वर स्वतःला नकार देणारे, विद्रोही वगैरे समजणाऱ्यांना समाजाने का सहन करावे? आताही अखिल भारतीय नाट्यसंमेलनात खूप काही चांगले होईल, मात्र त्या सर्व सकारात्मक बाबींपेक्षा गज्वींना चिंता आहे ती पगडीची. या पगडीखाली काय दडलंय देव जाणे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/