विराट एके विराट

    दिनांक  23-Jan-2019   

 


 
 
 
क्रिकेटविश्वात एक काळ असा होता, जेव्हा भारतीय फलंदाज हे फक्त भारतातच चांगली कामगिरी करू शकतात, अशी टीका व्हायची. अर्थात त्याला अनेक अपवाद होते, त्यातले एक म्हणजे सुनील गावस्कर. त्यानंतर गावस्कर यांची जागा आळीपाळीने अनेक फलंदाजांनी घेतली, मात्र नंतर ९० च्या दशकात सचिन तेंडुलकर यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आणि एक पायंडा घालून दिला आणि आज भारताकडे एक असा खेळाडू आहे, ज्याने ते सारे पायंडे मोडून आपलं स्वत:चं अधिराज्य गाजवलंय. तो म्हणजे विराट कोहली. २००८ मध्ये १९ वर्षांखालच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत तो प्रकाशझोतात आला आणि भारतीय संघाला अनेकवेळा विजयाची चव चाखायला मिळाली. पण, २०१८ हे विराट साठी खास ठरले. तेही विविध कारणांसाठी. ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यातही क्लिन स्वीप देत, कोहलीने जणू एका विक्रमाला गवसणीच घातली. आता या भारतीय संघाच्या अवलिया कर्णधाराने २०१८ सालचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सर्व पुरस्कार आपल्या खिशात घातले. आयसीसीतर्फे दरवर्षी क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिले जातात. यात सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असेही तीन पुरस्कार असतात आणि कोहलीने आपल्या विराट कामगिरीच्या जोरावर यंदाचे मानाचे हे तिन्ही पुरस्कार पटकावले. कोहलीने २०१८ सालात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३३.५५ च्या सरासरीने १ हजार २०२ धावा केल्या. यामध्ये सहा शतकं आणि ३ अर्धशतकांचाही समावेश आहे. एकाच वर्षात आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावणारा विराट हा पहिला खेळाडू ठरला. एवढंच नाही तर, आयसीसीच्या वतीने दरवर्षी कसोटी आणि एकदिवसीय संघ घोषित केले जातात. या संघात विराटचा समावेश तर आहेच, पण या दोन्ही संघांचे नेतृत्वही विराटकडेच आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटविश्वात ‘विराट एके विराट’ असेच चित्र दिसते आणि याच वर्षात या पठ्ठ्यानं सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रमही आपल्या नावे केला. विराट कोहलीच्या नावावर सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३९ शतकांची नोंद आहे. सचिनच्या ४९ शतकांपासून तो आता १० शतकं दूर आहे. त्यामुळे २०१९ मध्ये विराट आपल्या शतकांचे अर्धशतक नक्कीच करेल.
 

नेपियारमध्येही भारतच शेर

 

ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित करीत अगदी सिंहासारखा क्रिकेटजगतात आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाने आणखी एका संघाची शिकार केली. भारतीय संघ जणू एका देशात अगदी आरामात आपली शिकार करत सुटला आहे. बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही भारताने तेच केले. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला डोकं वर काढायची संधी दिली नाही. दहा वर्षांनंतर न्यूझीलंडला मायभूमीत नमवायची किमया भारताच्या शिलेदारांनी केली आणि पाच सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेतलीनाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, कदाचित त्यांनी नेपियार मैदान हे फलंदाजांसाठी उत्तम असल्यामुळे हा निर्णय घेतला असावा, मात्र हा निर्णय त्यांचाच अंगाशी आला. सलामीवीर मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुन्रो अवघ्या १८ धावांतच शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. एकामागोमाग एक पत्त्याच्या घरांसारखे सगळे फलंदाज तंबूत परतले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. मात्र, दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही आणि अवघ्या १५७ धावांत न्यूझीलंडच्या संघाचा गाशा गुंडाळला. भारताने हे आव्हान केवळ ३५ षटकांत पूर्ण केले. या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने ७५ धावा करीत एकदिवसीय क्रिकेटमधला ५००० धावांचा पल्ला ओलांडला आणि वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. या सामन्यात भारतासाठी मुख्य आकर्षण ठरला तो मोहम्मद शमी. नेपियारची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी खडतर मानली जाते, कारण या खेळपट्टीवर चेंडू विशेष उसळी घेत नाही, मात्र शमीने भेदक मारा करत न्यूझीलंडच्या संघाला उडायची संधीच दिली नाही. २००९ नंतर भारताने कधीच न्यूझीलंडला मायभूमीत नमवले नव्हते, हा इतिहासही विराटसेनेने कोरला. न्यूझीलंड विरुद्धचा पुढचा सामना दि. २६ जानेवारी रोजी बे ओव्हल या मैदानावर होणार आहे. याही सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी, भारताला मार्टिन गप्टील आणि कर्णधार केन विल्यमसन यांचा धोका असणार आहे. त्यामुळे पुढील सामन्याकडे विशेष लक्ष असले तरी, २०१८ प्रमाणे २०१९ हे सुद्धा भारतीय संघाकरिता ऐतिहासिक वर्ष ठरो, एवढीच इच्छा!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/