‘तालमणी’ आदित्य कल्याणपूर

    दिनांक  23-Jan-2019

 

 
 
 
आघाडीचे संगीतकार आणि तबलावादक आदित्य कल्याणपूर हे पंजाब घराण्याची परंपरा पुढे चालवत आहेत. आदित्य यांच्याकडे उस्ताद झाकीर हुसेन यांचा वारसदार म्हणूनही पाहिले जाते. संगीतासोबतच समाजकार्याचा वसा घेतलेल्या या तालमणीचा हा प्रवास...
 

ब्रूकबॉण्ड चहाची जाहिरात तुम्हाला आठवते का? ज्यामध्ये उस्ताद झाकीर हुसेन आणि एका मुलाची तबल्यावर जुगलबंदी रंगत जाते. दोघांचीही बोटं अगदी ताकदीने तबल्यावर थिरकतात. कुणीही मागे हटायला तयार होत नाही. अखेर समाधानी चेहऱ्याने झाकीर हुसेन म्हणतात, “वाह उस्ताद!” आणि त्यावर तो मुलगा म्हणतो, “अरे हुजूर, वाह ताज बोलिये!” या जाहिरातीतील तो लहान मुलगा म्हणजेच आजचे आघाडीचे संगीतकार आदित्य कल्याणपूर होय. आदित्य यांनी आत्तापर्यंत उस्ताद झाकीर हुसेन, पंडित जसराज, उस्ताद अमजद अली खान, डॉ. प्रभा अत्रे, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, ए. आर. रेहमान अशा अनेक दिग्गजांबरोबर काम केले आहे. आदित्य म्हणतात की, “माझ्या गुरूंनी मला केवळ तबला शिकवला नाही, तर एक चांगला माणूस म्हणून जगायलाही शिकवले.” घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शास्त्रीय संगीताची कास धरून आदित्य यांनी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपला ठसा उमटवला. त्यांचे वडील मेकॅनिकल इंजिनिअर, तर आई बालमोहन शाळेत संगणक विभागाची विभाग प्रमुख. मात्र, आपल्या मुलाला संगीताची, विशेषत: तबल्याची आवड आहे, हे त्यांनी वेळीच जाणले. “मी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, अशी अपेक्षा माझ्या आई-वडिलांनी कधीच केली नव्हती आणि ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होते,” असे आदित्य अभिमानाने सांगतात.

 

साधारणपणे आदित्य तीन वर्षांचे असताना एकदा चुकून त्यांचा पाय तबल्याला लागला. तेव्हा त्यांची आई त्यांना ओरडली व तबल्याला नमस्कार करायला सांगितले. “तबल्यात देव असतो,” असेही सांगितले. त्यावर त्यांनी आईला विचारले, “कुठे आहे देव?” ती म्हणाली, “तो तबल्याच्या आत असतो. दिसत नाही.” मग आदित्य यांनी देवदर्शनासाठी चक्क तबलाच फोडला. फुटलेल्या तबल्याविषयी आईने विचारले असता “मला देव बघायचा होता ना म्हणून मीच तबला फोडला,” असे अगदी निरागसपणे त्यांनी उत्तर दिले. तेव्हापासून तबल्याशी आदित्य यांचे जे नाते जुळले, ते आजतागत... वयाच्या सातव्या वर्षी आदित्य यांनी उस्ताद अल्लार खाँ यांच्याकडे तबला शिकण्यास सुरुवात केली. 'वाह ताज’च्या जाहिरातीसाठी त्यांनीच आदित्य यांचे नाव सुचवले. शाळा, महाविद्यालयीन काळात त्यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. शाळा-महाविद्यालयामध्येही ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेत. महाविद्यालयातील समवयस्क जेव्हा मजा करत होते, तेव्हा आदित्य दिवसाचे किमान आठ ते दहा तास रियाजात गुंग होते. कॉन्सर्ट्समध्ये रमले होते.

 

शास्त्रीय संगीतात करिअर करणाऱ्या तरुणांची संख्या आजही खूप कमी आहे. पण, आदित्य यांनी मात्र ते धाडस केले. तबलावादनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत 'न्यू इंग्लंड स्कूल ऑफ म्युझिक’ची स्थापना केली आहे. आजवर हार्वर्ड, एमआयटी, कॉनेर्ल, कोलंबिया, येल, बोस्टन अशा अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. हार्वर्ड विद्यापीठातील ‘म्युझिक स्कूल’ आणि बोस्टनमधील ‘रंगांजली स्कूल ऑफ म्युझिक’मध्ये त्यांना शिकवण्याचीही संधी मिळाली. एस्टोनियातील नावाजलेल्या ’ओरिएण्ट आर्ट फेस्टिव्हल’मध्ये तबलावादन करणारे आदित्य हे पहिले कलाकार ठरले. जगभरातील नावाजलेल्या फेस्टिव्हल्समध्ये आदित्य यांनी सादरीकरण केले आहे. पण हे सगळे करताना रियाज, नवनवीन गोष्टी शिकणे, प्रयोग करणे या गोष्टी त्यांनी सुरूच ठेवल्या. कर्करोगामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मुंबईत 'शामल म्युझिक फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. कर्करोगग्रस्तांसाठी ही संस्था विविध उपक्रमांद्वारे निधी संकलन करते.

 

भारतीय कलांची परंपरा अतिशय समृद्घ आहे. अनेक दशकांपूर्वी होऊन गेलेल्या कलाकारांना आजही आपण ऐकतो, म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी 'ग्रेट’ केले आहे. पण, त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे ती महान परंपरा तरुणांनीच जपली पाहिजे. शास्त्रीय संगीतात करिअर करायचं असेल, तर त्यासाठी रियाजाला वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. संगीत आदारित रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांविषयी बोलताना ते म्हणतात की, “अशा कार्यक्रमांमधून संगीत शिकता येणार नाही. ते केवळ दिखाऊ आहे. खरोखर संगीत शिकायचं असेल, तर त्यासाठी साधना केली पाहिजे. शास्त्रीय संगीत जगवायचं असेल, तर तरुणांनी आधी ते ऐकलं पाहिजे,” असंही ते सांगतात. तबलावादनाबरोबरच सामाजिक कार्यातही आदित्य कल्याणपूर पुढाकार घेतात. त्यांच्या ‘शामल म्युझिक फाऊंडेशन’ आणि ‘करेज इंडिया कॅन्सर फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगग्रस्तांसाठी ‘दिशा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामधून उभा राहणारा सर्व निधी कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जातो. 'सूर सिंगार समिती’ने आदित्य यांना 'ताल मणी’ हा किताब बहाल केला आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. संगीताला आयुष्य समर्पित केलेल्या आणि गुरूंची शिकवण जपणाऱ्या आदित्य यांना पुढच्या प्रवासासाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.

 
 
 - नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/