धक्कादायक! मेहुल चॉक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले

21 Jan 2019 11:32:58

 

 
 
 
 
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करून भारतातून पळून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात परत आणणे, आता आणखी कठीण होणार आहे. मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले असल्याचे वृत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार असे कळते की मेहुल चोक्सीने एंटीगुआ येथील उच्च आयोगामध्ये भारतीय पासपोर्ट जमा केले आहे.
 

मेहुल चोक्सी याने त्याचा पासपोर्ट क्रमांक Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी मेहुल चोक्सीने १७७ डॉलरचा ड्राफ्टदेखील जमा केला आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला दिली. भारतीय नागरिकत्व सोडण्याच्या फॉर्ममध्ये मेहुल चोक्सीने त्याचा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा दिला आहे.

 

आपण आवश्यक नियमांसह भारतीय नागरिकत्व सोडून एंटीगुआचे नागरिकत्व स्वीकारत असल्याचे मेहुल चोक्सीने उच्च आयोगाला सांगितले. प्रत्यार्पणापासून वाचता यावे याकरता मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याप्रकरणाची सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडल्याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि चौकशी एजन्सीकडून प्रगती अहवाल मागविला आहे.

 

२०१७ मध्ये मेहुल चोक्सीने एंटीगुआचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्याबाबत भारताने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. मुंबई पोलीसांनी हिरवा कंदील दाखविल्याने मेहुल चोक्सीला एंटीगुआचे नागरिकत्व मिळाले होते. पीएनबी बँकेचा घोटाळा सर्वांसमोर येण्यापूर्वीच मेहुल चोक्सी आणि याप्रकरणात साथीदार असलेला त्याचा भाचा नीरव मोदी देश सोडून पळून गेले होते. सीबीआय आणि ईडी याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत या दोघांची चार हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. आर्थिक फरार अधिनियमांतर्गत या दोघांवर कारवाई केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0