द्वेष आणि हिंसा यापलीकडे...

    दिनांक  21-Jan-2019   आयुष्यभर काटेच टोचले तरी, दुसऱ्यांच्या आयुष्यात फुले उमलावी यासाठी प्रयत्नशील असणारे, वंचित समाजात जन्मूनही इतरांच्या आयुष्यात यशनिर्मितीसाठी झटणाऱ्या जनार्दन साळवे यांची ही जीवनकहाणी...


दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दुःखात गेले।

झोतभट्टीत शेकावे पोलाद

तसे आयुष्य छान शेकले।

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दुःखात गेले।

 

कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितेमधील हे शब्द जेव्हा जगण्याचे प्रारब्ध बनून जातात, तेव्हा आयुष्याचे गणित कसे मांडायचे? पण, म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नसतेच. तसेच काहीसे जनार्दन तुकाराम साळवे यांच्याबाबत म्हणता येईल. आज वंचित समाजाच्या घटकांना मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत करायला जनार्दन साळवे सदैव तयार असतात. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले जनार्दन सध्या पूर्णवेळ समाजप्रबोधनाचे कार्य करतात. समाजाकडून त्यांना हे प्रेम मिळते किंवा ते मुलांना इतके आपलेपण देऊ शकतात? का? तर याला कारण जनार्दन साळवे यांचे आयुष्य. बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील कोळ पिंप्रीच्या गावाबाहेरील वस्तीतील तुकाराम साळवे आणि शेवंताबाई साळवे हे एक दाम्पत्य. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी एक मुलगा जनार्दन. तुकाराम आणि शेवंताबाई दोघेही शेतमजूर म्हणून काम करत. साधारण ७० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एके दिवशी काम करून आल्यावर तुकाराम यांच्या पोटात दुखू लागले. वेदनेने ते तडफडू लागले. पण, खेडेगावात कुठला दवाखाना? तालुक्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बैलगाडीची शोधाशोध सुरू झाली. पण, वंचित वस्तीमध्ये बैलगाडी मिळवणे मुश्किलीचे काम. बैलगाडी मिळेपर्यंत तुकारामांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी जनार्दन अवघे वर्षभराचे होते. वयाची तिशी पार करेपर्यंतच शेवंताबाईंचे कुंकू पुसले गेले. ‘अखंड सौभाग्यवती’चा आशीर्वाद खरा ठरला नाही. मात्र, ‘अखंड दु:ख सहन कर,’ हा मंत्र मात्र तिच्या जीवनात पुरून उरला. चार मुलांना एकटीने सांभाळताना तिची कसरत होई. पण, कुणाकडे मदत मागणार? गावातल्या भावकीची परिस्थिती तिच्यासारखीच. दोन-तीन वर्षांनी जनार्दन यांचे भाऊही शेतमजूर म्हणून काम करू लागले. छोटा जनार्दन आईसोबत शेतावर जायचा. उपाशीपोटी उन्हातान्हात राबताना आईला तहान लागे, त्यावेळी एक घोट पाण्यासाठीही गयावया करताना त्यांनी तिला पाहिले होते. याचा फार मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला.

 
वयाच्या सहाव्या वर्षी ते एका शेतकऱ्याच्या तीन गाई राखण्याचे काम करू लागले. सकाळी ९ वाजता गाईंना रानात घेऊन जायचे, ते संध्याकाळी परत घेऊन यायचे. याचा मोबदला काय तर सकाळ-संध्याकाळची एक भाकरी आणि चमचाभर चटणी. ते दिवसच तसे होते. पण, जनार्दन यांचे दिवस बदलणार होते. गावात भाड्याने राहणाऱ्या दत्तात्रय तपशे या शिक्षकाने जनार्दन यांची आस्थेने विचारपूस केली. शिक्षणाचा मार्ग दाखवला. जनार्दन यांनी तिसरीपर्यंत न शिकता केवळ तपशे मास्तरांच्या शिकवणीच्या जोरावर चौथीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. पुढे जनार्दन वसतिगृहामध्ये शिक्षण घेऊ लागले. समज आलेल्या त्यांना संपूर्ण आयुष्य उन्हात घालवलेल्या आईची दया येई. वाटे की, शिक्षण सोडून कामधंदे करावे. पण, आई म्हणायची, “लेकरा, शिकलास तर तगशील नाय, तर आमच्यासारखा नुसता राबशील.” त्यामुळे ते मन लावून अभ्यास करत. ५० वर्षांपूर्वी खेडेगावात मॅट्रिक झाल्यावर नोकरी मिळे. पण, प्रयत्न करूनही जनार्दन यांना नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तेही मजूर म्हणून काम करू लागले. यातच एका वधुपित्याने ‘ऑफर’ दिली. “तू शिकलेला आहेस. मी तुला नोकरी मिळवून देईन. पण, माझ्या मुलीशी लग्न करावे लागेल.” घरच्यांनी होकार दिला. पण, लग्नानंतर नोकरी मिळवून द्यायच्या आतच सासरेबुवांचा मृत्यू झाला. अशातच दोन मुले झाली. लग्न होऊन पाच वर्षे उलटली. पण, नोकरी मिळत नव्हती. खेडेगावात मोलमजुरीशिवाय पर्याय नव्हता. आईचे आणि कुटुंबीयांचे हाल पाहून जनार्दन निराशेच्या गर्तेत गेले. दोनदा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने ते वाचले. त्यानंतर काही दिवसांत त्यांना सिंचन खात्यातील सरकारी नोकरीची संधी आली. अंधकारमय जीवनात पुन्हा प्रकाशाचा किरण आला. मुलाखतीचा दिवस उजाडला. ३० किलोमीटर चालत ते मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचले. अनुसूचित जमातीच्या वर्गातले ७० उमेदवार मुलाखतीसाठी आलेले. सगळेच तयारीने आलेले. जनार्दन मात्र जुने गुजरीचा शर्ट आणि ट्राऊझर घालून, अनवाणी, घामाजलेल्या अंगाने आणि उतरल्या चेहऱ्याने. पण मनात आग होती की, आज नोकरी मिळवायचीच. जनार्दन त्या मुलाखतीत उत्तीर्ण झाले. नोकरी मिळाली. पुढे साळवे कुटुंबीयांनी मागे पाहिले नाही. मात्र, जनार्दन हे दिवस विसरले नाही. हताश, लाचार विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांना स्वत:ची आठवण येई. असाहाय्य कष्टकरी स्त्रीला मदत करताना त्यांना अखंड कष्ट करत असणारी आई आठवे. यातूनच मग नोकरी करता करता ते समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी काम करू लागले. आंदोलन, मोर्चे यापेक्षा स्वत:चा विकास, कुटुंब आणि समाजाचा विकास करावा यासाठी युवकांना प्रेरित करू लागले. “द्वेष आणि हिंसा कोणताही धर्म शिकवत नाही. युवकांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता नीतिमत्तापूर्ण यश मिळवावे,” असे सांगत जनार्दन वस्ती-वस्तीत काम करत आहेत. जनार्दन साळवे यांचे प्रेरणादायी माणूसपण मोठे आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/