‘डीएनए’ संशोधन आणि मर्यादा

    दिनांक  20-Jan-2019   माणसाला कोणते आजार आहेत? व्यसने कोणती आहेत? येत्या काळात कोणत्या व्याधी जडू शकतात? त्याचे आयुष्य किती वर्षांचे आहे? कोणत्या आजाराने मृत्यू होण्याचा धोका आहे? हे सांगणे आता शक्य होणार आहे.


तूम्ही किती श्रीमंत होणार? तुम्ही पुढल्या वर्षी काय करणार? तुमचा जन्म कशासाठी झाला आहे आणि तुमचा मृत्यू कधी होणार, असे अनेक अॅप आणि गेम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी केवळ गंमत म्हणून अशा गोष्टी सोशल मिडियावरील स्टेट्स म्हणून ठेवले. मग त्यातून होणाऱ्या डेटाचोरीवरही टीका होऊ लागली, मात्र अजूनही अशा अॅप्सचा धुमाकूळ फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर सुरूच आहेच की, पण विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या आधारे तुमच्या मृत्यूची तारीख तुमचा डीएनए सांगू शकतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. माणसाला कोणते आजार आहेत? व्यसने कोणती आहेत? येत्या काळात कोणत्या व्याधी जडू शकतात? त्याचे आयुष्य किती वर्षांचे आहे? कोणत्या आजाराने मृत्यू होण्याचा धोका आहे? हे सांगणे आता शक्य होणार आहे. ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठात केलेल्या संशोधनात अनुवंशिक बदलांनुसार होणाऱ्या परिणामांचा विचार करून एक रचनात्मक प्रणाली तयार केली. या प्रणालीनुसार डीएनएच्या तपासणीवरून मानवाच्या आयुष्याचा अंदाज घेतला जातो. संशोधकांच्या मते, सुमारे शंभर जणांच्या डीएनएचे दहा-दहाचे गट आम्ही तयार केले. त्यात सर्वात शेवटी राहणाऱ्या गटाचे सर्वात वर येणाऱ्या गटापेक्षा वय पाच वर्षांनी कमी असेल, असा दावा केला आहे. या संशोधनासाठी एकूण पाच लाख जणांच्या डीएनएचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. अनुवंशिक डेटासह त्यांच्या आई-वडिलांचेही डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले होते. या संशोधनातून आलेल्या माहितीनुसार, मेंदू आणि हृदयावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांचा जीवनमानावर परिणाम होतो.

 

डिओक्सीरिबोन्यूक्लिक अॅसिड म्हणजे डीएनए, साधारणतः स्त्री-पुरुष आदी लिंग चाचणी पडताळण्याशिवाय अनुवंशिकता, मृतदेहाची ओळख पटवणे आदीं गोष्टींसाठी केला जातो, अशी समज आहे. पण एकविसाव्या शतकात डीएनए आणि त्यावरील संशोधनाने यापुढे जाऊन नवनवीन टप्पे गाठले आहेत. शरीरात होणारे बदल, संभाव्य आजारांची माहिती आणि त्यावर तातडीने उपचार करून आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. इतकेच नाही तर तुम्ही कोणत्या आजारावर कोणता इलाज कराल? जी औषधे घ्याल त्यांचा तुमच्या शरीरावर कितपत परिणाम होईल, याचीही माहिती तुम्हाला अशा चाचणीमधून मिळू शकते. जेम्स रॅन्डर्सन यांच्या अहवालानुसार, डीएनए आणि अनुवंशिक चाचणीमधून संबंधित मनुष्य काय आहे, याची प्रचिती येते. रुग्णाने काय आहार घ्यायला हवा याचीही माहिती देता येते. डीएनएतून केसांचा रंग कोणता असेल आणि त्यातील अंतर्भूत आठ घटक आदी गोष्टींचा सामावेश असलेली माहितीही कळते. डोळ्यांचा रंग, मानवाची एकाग्रता, मानवी घड्याळ, हृदयविकार आणि पक्षाघात, रोमांचक गोष्टी करण्याची इच्छा, लठ्ठपणा, मेंदूचे इतर आजार, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसातील गाठी आदी आजारांचे निदान आणि पूर्वानुमान करण्यास डीएनएची मदत होते, असा दावा रॅन्डर्सन करतात.

 

गुन्हेगारी विश्वातील मोठमोठ्या प्रकरणांचाही सुगावा घेण्यात आजवर डीएनए चाचणीची मदत झाली आहे. चित्रपटातील कथेत गुन्हेगाराच्या एका केसावरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश येते, अशी दृश्ये दाखवली जातात. यात चुटकीसरशी तिथले डॉक्टर किंवा तपासणी केंद्रातील संशोधक अशा प्रकरणांचा सुगावा लावतात. मात्र, वास्तवात अशी प्रकरणे सहजासहजी तडीस जात नाहीत. बऱ्याचदा एकाच डीएनएतील अहवाल हा दोन्ही व्यक्तींच्या डीएनएशी मिळताजुळताही असू शकतो. तपासणीची प्रक्रियाही तितकीच गुंतागुंतीची असते. त्यातील मापदंडही तितकेच बदललेले असतात. सामान्यतः मूलाच्या जन्मापूर्वी अशा चाचण्या केल्या जातात. मातेला कोणता आजार असेल, त्यापासून बाळाला वाचविण्यासाठी अशा चाचण्या करणे आवश्यक असते. भ्रूणातील आजाराची तपासणीही डीएनए चाचणीद्वारे केली जाते. विज्ञान इतके पुढे गेले असले तरीही काही आजारांचे योग्य निदान झाल्यावरही उपचारानंतर रुग्ण दगावतो. गुंतागुंतीच्या उपचारात रुग्णाला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात. मृत्यूची तारीख सांगणारी डीएनए चाचणी जरी असली तरीही उपचाराबाबतच्या संशोधन मर्यादाही आल्याच, याचाही विचार, याचेही संशोधन व्हायला हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/