गुरेचराई : एक निरीक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
एखाद्या परिसरातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तिथल्या मोकाट गुरेचराईवर बंदी घालावी का? यावरून पर्यावरण अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. याबद्दलच्या चर्चेचा एक भाग म्हणून कोकणात सर्वसाधारणपणे होणाऱ्या मोकाट गुरेचराईचे हे एक ढोबळ निरीक्षण...
 

जैवविविधता हा जसा निसर्गाचा गुणधर्म तसाच विचारांची विविधता हा मानवी संस्कृतीचा गुणधर्म. सारखीच आवडनिवड असणाऱ्या आणि सारख्याच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन व्यक्तींचं लहान मुद्द्यावरून बिनसतं आणि त्या दोघांमध्ये होणारे वाद ऐतिहासिक ठरतात. टिळक-आगरकर वाद, गांधी-आंबेडकर वाद, रिकार्डो-माल्थस वाद, फडके-खांडेकर वाद ही काही उदाहरणं. हाडाचे निसर्गअभ्यासक आणि एकमेकांचे जिवलग मित्र असलेल्या डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. सलीम अली यांच्यात असाच एकदा वाद झाला होता. विषय होता गुरेचराई. हा प्रसंग डॉ. गाडगीळांनी एका भाषणात सांगितला आहे. (भाषणाची लिंक https://www.youtube.com/watch?v=६gYC१WLphN४) डॉ. गाडगीळ आणि डॉ. सलीम अली अनेकदा भरतपूर पक्षी अभयारण्यात एकत्र निसर्गनिरीक्षणासाठी जायचे. त्यावेळी तिथल्या दलदलीच्या प्रदेशात गुरांचे तांडे चरत असलेले दिसायचे. भरतपूरचा लोभसवाणा आणि जैवविविधतासंपन्न असा निसर्ग टिकवण्यासाठी इथली गुरेचराई बंद केली पाहिजे, असं डॉ. सलीम अली यांचं मत होतं. याउलट गुरेचराई हा तिथल्या परिसंस्थेचाच एक भाग असून ती बंद करण्याची काही गरज नाही, असं डॉ. गाडगीळांचं मत होतं. शेवटी १९८३ साली सरकारकडून इथल्या गुरेचराईवर बंदी घातली गेली. त्यावेळी स्थानिकांचा प्रचंड रोष झाला. त्यानंतर पुढील काही वर्षांमध्ये तिथे परिसरतज्ज्ञांकडून जे अभ्यास झाले त्यात असं आढळलं की, भरतपूरच्या दलदलीच्या प्रदेशात paspalum नावाचं गवत, जे गुरांकडून खाल्लं जात होतं, ते गुरेचराईबंदीनंतर अतिप्रमाणात वाढलं आणि त्याने तो अख्खा दलदलीचा प्रदेश व्यापून टाकला आणि तिथल्या परिसंस्थेवर विपरीत परिणाम झाला.

 

गुरेचराई हा पर्यावणअभ्यासकांसाठी नेहमीच मतमतांतराचा विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातल्या आमच्या अणसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) गावातल्या गुरेचराईचं एक ढोबळ निरीक्षण इथे मांडायला आवडेल. कोकणातल्या, विशेषकरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतल्या गावांची रचना, लोकजीवन आणि शेती-पशुपालनाच्या पद्धती या सर्वसाधारणपणे सारख्याच असल्याने कोकणातल्या बहुतांश गावांना हे निरीक्षण लागू पडणारं आहे. मोकाट गुरेचराईचे माणसांना, गुरांना आणि परिसराला होणारे काही फायदे या लेखात मांडले आहेत. अर्थात, ते सिद्ध करायला माझ्याकडे कुठलाही आकडेवारीयुक्त शास्त्रीय पुरावा नाही. पण म्हैस चरायला सोडणं आणि तिला आणायला जाणं हा लहानपणापासूनचा आवडता छंद असल्याने जे डोळ्याला दिसलं आणि त्यावरून जे मनाला वाटलं, ते इथे मांडलंय. वाचकांनी वाटल्यास हा एक ललित लेख वा एक लोकभावना समजावी. पण या विषयाच्या अभ्यासकांना पुढच्या चर्चेसाठी आणि संशोधनासाठी हे मुद्दे आधारभूत ठरतील एवढं मात्र नक्की.

 

ढोबळ अंदाज केला, तर आमच्या गावात साधारणत: दोनशे-अडीचशे गुरं असतील. पावसाळ्याचे चार महिने गावात भातशेतीमुळे मोकाट गुरेचराई होत नाही. हा गेल्या पिढ्यान्पिढ्या परंपरेने चालत आलेला अलिखित नियम आहे. पावसाळ्यात लोक आपापल्या परिसरात गुरं चरवतात अथवा चार कापून गोठ्यात आणून घालतात. बाहेर गुरं नेलीच, तर बरोबर राखणदार असतो आणि दोन-तीन तास चरवून ती पुन्हा गोठ्यात आणली जातात. भातकापणी झाल्यावर पुढच्या पेरणीपर्यंत म्हणजे साधारणत: नोव्हेंबर ते जून या सात-आठ महिन्यांच्या काळात गुरं उनाड सुटतात. ती कोणी राखायला जात नाही. गोठ्यात वासरू असलेल्या दुभत्या गाई-म्हशी कितीही लांब गेल्या तरी, संध्याकाळी आपणहून परत येतात. भाकड गुरं आठ-पंधरा दिवस बाहेरच फिरत राहतात आणि अधूनमधून ती घरी येतात. अशा उनाड गुरेचराईचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुरांच्या खाण्यापिण्याचा खर्च आणि श्रम निम्म्याहून कमी होतात. आमच्या सुमारे चार चौ. किमीच्या गावात चारा हा जिकडेतिकडे विखुरलेला आहे. ज्यांची स्वत:ची शेती नाही पण गुरं आहेत, त्यांना सध्याच्या रोजानुसार एक गवताची पेंडी कापून गोठ्यात आणेपर्यंतचा खर्च सुमारे १०० रुपये येतो. (गवताच्या प्रकारानुसार आणि अंतरानुसार यात थोडासा बदल असेल) ती एका म्हशीला (गावठी म्हशीला) सुमारे दोन दिवस पुरते. म्हणजे ३६५ दिवस एका म्हशीला गोठ्यात गवत घालण्याचा खर्च सुमारे सुमारे १८ ते २० हजार रुपयांपर्यंत जातो. आता ३६५ दिवसांपैकी किमान २०० दिवस गुरं उनाड सोडली जात असल्याने त्यांना गोठ्यात खाऊ घालण्याचा दर म्हशीमागे सुमारे १० हजार रुपये खर्च वाचतो. म्हशीच्या तुलनेत बैल आणि रेड्यांना खाणं जास्त लागतं आणि गाईंना कमी लागतं. त्यामुळे गुरांच्या जातीनुसार वर मांडलेल्या हिशोबात किंचित फरक पडू शकेल. शेतकऱ्यांना भाताचं गवत विकत घ्यावं लागत नाही, पण त्यांच्याकडचीही गुरं मोकाट सोडल्यामुळे वाचलेलं गवत ते शेती नसलेल्यांना विकतात आणि उत्पन्न मिळवतात. अशाप्रकारे मोकाट गुरेचराई ही गावकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याची आहे.

 

मोकाट गुरेचराईचे गुरांना होणारे काही फायदे निरीक्षणातून निदर्शनास आले आहेत. पहिला म्हणजे उनाड सुटलेली गुरं सुमारे चार चौरस किलोमीटरच्या प्रदेशात हिंडतात आणि चरतात. यात विविध प्रकारच्या वनस्पती त्यांच्याकडून खाल्ल्या जातात. बांबूचा पाला, ऐनाचा पाला, कारीट, गुळवेल, शिवणीची फळं, उंबराची फळं, कांदळ, तिवर अशा पुष्कळ प्रकारच्या वनस्पती त्यांच्या पोटात जातात, ज्यांचा त्यांना काही ना काही औषधी उपयोग असतो. जसा दुर्वांचा मांजरांना असतो तसा. या औषधी उपयोगाचं पारंपरिक ज्ञान लोकांना आहे. उदा. पेडगुळीचा पाला गुरांच्या पचनसंस्थेला चांगला असतो. गुरं मोकाट फिरल्यामुळे त्यांच्यात आहारवैविध्य जपलं जातं. याचा फायदा निश्चितपणे त्यांच्या आरोग्याला होत असावा. दुसरं म्हणजे गुरं मोकाट फिरल्यामुळे त्यांच्या अंगावर गोचिडीचं प्रमाण कमी राहतं. कारण कावळे, बगळे, मैना, असे अनेक पक्षी गुरांच्या पाठीवर बसून गोचिड्या खातात. तसंच थंडीच्या दिवसात रात्री पडणाऱ्या दवामुळे गुरांच्या अंगावरची गोचीड उतरते हा इथल्या लोकांचा अनुभव आहे. आणखी एक फायदा म्हणजे मोकाट गुरेचराईमुळे गुरांचं नैसर्गिक प्रजनन होतं, ज्यामुळे जन्माला येणारं वासरू सुदृढ असतं. (हल्ली इंजेक्शन देऊन गाई-म्हशीचं कृत्रिम रेतन करतात ते सोडा) पण नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Natural Selection) मान्य करायचा झाला, तर मोकाट गुरेचराईचा हा एक निश्चित फायदा आहे. मोकाट गुरेचराईमुळे अनेक भागांतली गुरं एकत्र येतात, नैसर्गिक निवडीने त्यांच्यात गाई-बैल आणि म्हशी-रेड्यांची लग्नं लागतात आणि पुढे प्रजोत्पादन होतं.

 

आता मुख्य मुद्दा येतो तो गुरेचराईचा परिसंस्थेवर होणारा परिणाम. इथे मतमतांतरं आणि वाद सुरू होतात. कोकणात सडेजमिनी भरपूर आहेत, जिथे मुख्यत: गवत उगवतं आणि गुरं चरतात. गेल्या पावसाळ्यात रत्नागिरीच्या एका सड्यावर रानफुलांची माहिती घेण्यासाठी एक छोटीशी सहल आयोजित केलेली होती. त्यावेळी तिथे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्राचे प्राध्यपक शरद आपटे यांना अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की, गुरेचराईचा सड्यावरच्या वनस्पतीवैविध्यावर काही परिणाम होतो का? त्यावर आपटे सरांनी सांगितलं होतं की, गुरेचराईमुळे सड्यांवरच्या गवताचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि त्यामुळे रानफुलं आणि इतर वनस्पतींना वाढायला वाव मिळतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे गुरेचराईमुळे सड्यावरची परिसंस्था राखली जाते! निरीक्षणातून हे सहज लक्षात येईल की, गुरेचराई होत असूनसुद्धा कोकणातले सडे पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेले दिसतात. मग सड्यांवरची परिसंस्था जपण्यासाठी कुंपण घालून तिथली गुरेचराई बंद करणं (कास पठारासारखं) कितपत योग्य? हा प्रश्न पडतो.

 

‘चराऊ क्षेत्राचं व्यवस्थापन करावं’ असं अनेक पर्यावरणतज्ज्ञांकडून सुचवलं जातं. म्हणजेच गुरं मोकाट न सोडता चराऊ जमिनीचे दोन-तीन भाग करायचे आणि दरवर्षी आळीपाळीने एकेका भागात गुरं चरवायची, जेणेकरून जैवविविधतेला काही बाधा पोहोचणार नाही. अनेक आदिवासी भागांत अशा पद्धतीने गुरेचराईचं परंपरागत व्यवस्थापन केलेलंही आढळतं. एक तर्कशुद्ध विचार असा की, ज्या भागांत गुरेचराईची जी पद्धत गेल्या पिढ्यानपिढ्या (आमच्या गावाच्या बाबतीत गेली सुमारे ७००-८०० वर्षं) सुरू आहे ती गावच्या परिसंस्थेचा भाग बनून गेलेली आहे. मग काही भागांत ती मोकाट असेल, वा काही भागांत ‘सेमी-मोकाट’ असेल. याबाबतीत माझे रत्नागिरीचे पर्यावरणगुरू प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्याशी चर्चा करताना एक वेगळाच मुद्दा समोर आला, जो निरीक्षणातून पटतो. मोकाट गुरेचराईमध्येसुद्धा गुरांकडून Managed Grazing आपोआप होत असतं. कारण, गुरं कधीच एका जागी उभं राहून तासनतास चरत नाहीत. ती सतत फिरत असतात. गवत हाच त्यांचा मुख्य आहार असतो आणि वाटेत ज्या ज्या इतर वेलवर्गीय आणि झुडूपी वनस्पती येतील त्यांचा एक चावा घेऊन ती पुढे जातात. याचं कारण ती मोकाट असतात! म्हणजेच मोकाट गुरेचराईमुळे वनस्पतींची अंशतः तोड होते. हेच चराईचं क्षेत्र जर मर्यादित केलं, तर त्या मर्यादित जागेतच गुरं सतत चरत राहतील, तिथल्या वनस्पती सगळ्या खाऊन टाकतील आणि तिथलं जैववैविध्य नष्ट होईल, ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. पण याबाबत नेमका निष्कर्ष काढण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे.

 

 
 
म्हशीच्या पाठीवर बसलेले बगळे गोचीड खातात. 
 

मोकाट गुरेचराईचा एक तोटा मात्र निश्चित होतो. वड, पिंपळ, रायवळ आंबा, शिवण, फणस अशा मोठ्या वाढणाऱ्या जंगली झाडांची पक्ष्यांच्या विष्ठेतून रुजून आलेली रोपं, तसंच बांबूचे कोंब गुरं फस्त करतात. पण अशी रोपं शोधून त्यांना पिंजरे लावणं हा यावरचा उपाय निश्चितपणे होऊ शकतो. नाहीतरी वृक्षलागवडीवर खर्च केला जातोच! त्याऐवजी प्रत्येक ग्रामपंचायतीने दर पावसाळ्यात अशा झाडांची नैसर्गिकरित्या रुजलेली रोपं शोधून त्यांना पिंजरे लावण्याचा उपक्रम केला, तर गुरेचराई सुरू राहूनसुद्धा जैवविविधता जपली जाईल. त्यासाठी पूर्ण प्रदेशच संरक्षित करायची जरूर नाहीये, असं मला वाटतं. गुरांच्या मानसशास्त्राचं थोडं निरीक्षण केलं तर कळतं की, मोकाट हिंडणं हा त्यांचा स्वभावधर्म आहे. कारण, बंदिस्त जागेत जेव्हा म्हैस सोडली जाते तेव्हा ती सतत पळवाटा शोधत असते. स्वत:च्या ताकदीने कुंपण तोडून अनेकदा गुरं पलायन करतात. पण हीच गुरं त्यांच्या ठराविक प्रदेशात फिरून पोट भरल्यावर आपणहून घरी येतात! आणखी एक निरीक्षण मला इथे केवळ गंमत म्हणून मांडावंसं वाटतं. ‘मानवी विष्ठा’ गुरं अत्यंत आवडीने खातात! हे मी स्वनेत्रांनी पाहिलेले आहे. आता सगळ्यांच्या घरी शौचालये आहेत, पण पूर्वी लोक जेव्हा उघड्यावर जायचे तेव्हाचे जे एकेक अनुभव लोक सांगतात ते फार गंमतीशीर आहेत. मोकाट गुरं उघड्यावर पडलेली सगळी मानवी विष्ठा साफ करायची! त्याच्यामुळे परिसर घाण होऊन रोगराई वगैरे पसरण्याचा प्रश्नच नव्हता!

 

साधारणतः ४०-५० वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा कोकणात शहरीकरणाचे वा बागायतीकरणाचे वारे वाहू लागले नव्हते, तेव्हापर्यंत गुरं आणि त्यांना उपलब्ध असलेली चराऊ जमीन यांचं एक ठराविक प्रमाण राखलं गेलं होतं. आजच्या तुलनेत गुरांना मुबलक प्रमाणात चराऊ जमीन उपलब्ध होती. जमिनी सगळ्या खासगी असल्या तरी त्या वापरात नसल्यामुळे गुरांना चरण्यासाठी मोकळ्या होत्या. आता मात्र शहरीकरणाचे वारे वाहू लागल्यामुळे आपापल्या जमिनींना तारेचं कुंपण घालणं, त्याचे प्लॉट्स पाडून विकणं, शहरातल्या लोकांनी इथल्या जमिनी घेऊन फार्महाऊसेस बांधणं, बागा करणं, हे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे मर्यादित जमिनीत जास्त प्रमाणात गुरं चरवली गेल्यामुळे त्याचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणं, हा प्रश्न याच्यापुढे कदाचित निर्माण होऊ शकतो. सध्या ज्या गतीने मोकळ्या चराऊ जमिनी बंदिस्त करून अन्य उपयोगांसाठी वापरल्या जातात, ते पाहता नुसत्या दुधासाठी आणि शेणासाठी जरी एखादी गाय वा म्हैस बाळगायची झाली तरी, ती चरवायची कुठे? हा प्रश्न भविष्यकाळात कोकणवासियांसाठी गंभीर होणार आहे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@